फिटनेस, व्यायाम ही एक सतत बदलणारी आणि विकसित होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आरोग्य जपताना त्यामध्ये केल्या जाणाऱ्या चुका जाणून, त्यांना टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच त्या गोष्टींमध्ये सातत्य असणेही तेवढेच गरजेचे असते. फिटनेस इन्फ्ल्यूएंसर, नेहा परिहारने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून तंदुरूस्त जीवनशैलीत केल्या जाणाऱ्या चुकांबद्दल एका व्हिडीओमार्फत माहिती शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. वजन कमी करण्यासाठी स्त्रिया शक्य तितका कमी आहार घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्यावर “तुम्ही आवश्यक तितका आहार घेत नाही आहात, तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे.सडपातळ शरीरयष्टी आणि वजन कमी करायचे असल्यास शरीराला आवश्यक तेवढ्या शक्तीची गरज असते”, असे नेहाने तिच्या व्हिडीओमधून सांगितले आहे.

हेही वाचा : पदार्थांवर माश्या बसल्यावर नेमके काय घडते? हे वाचा, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाण्याआधी १० वेळा विचार कराल…

२. कार्डिओ व्यायाम प्रकारात सर्वाधिक कॅलरीज जाळल्या जातात, म्हणून वजन कमी करण्यासाठी, बारीक दिसण्यासाठी अनेकजणी केवळ कार्डिओ व्यायाम प्रकार करत असतात. मात्र, त्याऐवजी तुम्ही वजनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.”तुम्ही योग्य आहार घेतल्याने, चरबीपेक्षा कॅलरीज जाळण्यास मदत होईल. यामुळे तुम्ही बारीक तर दिसाल, मात्र मसल्सनासुद्धा त्याचा फायदा होईल, असे नेहाने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

३. तुम्ही सतत कॅलरीजची चिंता करत राहता. “जर तुम्ही ही चिंता करणे सोडून दिलेत, तर वजन वाढेल अशी भीती तुम्हाला वाटत असते. मात्र, तसे अजिबात होणार नाही.
४. इतकेच नाही तर काही आठवड्यांमध्ये तुम्हाला असलेला अपेक्षित बदल, फरक शरीरात किंवा वजनात जाणवला नाही तरीही तुमचा हिरमोड होतो. मात्र, सातत्य हीच गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवा”, असेही नेहाने म्हटले आहे.

आता वर सांगितलेल्या या चार चुका तुम्हीही करत आहात का?

स्त्रियांच्या शरीराची विशिष्ट रचना आणि घटकांचा विचार करता, महिलांनी त्यांच्या सर्वांगीण आरोग्यावर आणि तंदुरुस्तीवर लक्ष देणे खूपच महत्त्वाचे आहे, असे पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वाती गायकवाड सांगत असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.
सुरुवातीला जे मुद्दे फिटनेस इन्फ्ल्यूएंसर नेहा परिहारने तिच्या व्हिडीओमधून मांडले आहेत, त्यावर डॉक्टर स्वाती गायकवाड यांचे काय मत आहे ते थोडक्यात जाणून घेऊ.

हेही वाचा : ‘या’ पदार्थांमध्ये ५० पेक्षाही कमी कॅलरीज; आहारात आवर्जून समावेश करण्याचा आहारतज्ज्ञांचा सल्ला…

१. प्रमाणापेक्षा कमी खाणे

कमी कॅलरीज असणारा आहार केल्याने स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या मासिक पाळी चक्रावर आणि प्रजनन आरोग्यावर होतो. “पोषक आहाराच्या कमतरतेमुळे, शरीर आवश्यक ते हार्मोन्स निर्माण करू शकत नाही, ज्याचा परिणाम स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर आणि एकूणच आरोग्यावर होत असतो. त्यामुळे ज्या स्त्रियांना सडपातळ शरीरयष्टी हवी आहे, त्यांनी आहारातून हार्मोनल आरोग्याला आवश्यक पोषक घटक मिळत आहेत की नाही यावर लक्ष देणे गरजेचे असते“, असे डॉक्टर स्वाती म्हणतात.

२. कार्डिओवर अधिक भर देणे

हृदय आणि धमन्यांच्या आरोग्यासाठी कार्डिओ व्यायाम प्रकार [चालणे, धावणे, उड्या मारणे इत्यादी] जरी उपयुक्त असले तरीही, केवळ तेवढाच एक व्यायाम केल्याने, स्त्रिया शरीराला बळकटी देण्याकडे दुर्लक्ष करतात. “खरंतर वजन उचलून व्यायाम केल्याने त्याचा फायदा हाडांना होतो. विशेषतः वय वाढत असताना त्याचा उपयोग होतो. तसेच चयापचय क्रियेदरम्यान मसल मास संतुलित ठेवणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि हार्मोन्समध्ये समतोल साधण्यासाठी उपयुक्त असते.”

३. सतत कॅलरीजची चिंता करणे

आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यास त्याचा विपरीत परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होऊ शकतो. इतकेच नव्हे तर हार्मोनल असंतुलन होऊ शकते, मासिक पाळीच्या चक्रामध्ये अनियमितता किंवा अमेनोरिया असे त्रास होऊ शकतात. प्रजनन क्षमता आणि एकंदरीत उत्तम आरोग्यासाठी, आहार आणि त्यातील पोषक घटकांचे प्रचंड महत्व असते.

४. जिद्द सोडून देणे

उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी व्यक्तीकडे जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक असते. “अचानक आहारात, व्यायामात मोठे बदल केल्याने शरीराला सवय नसल्याने ताण येऊ शकतो. हार्मोनल असंतुल होऊ शकते. मात्र, व्यायामात आणि आहारात सातत्य असल्यास, त्याचा चांगला परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.”

हेही वाचा : बैठ्या कामामुळे पोटावरची चरबी वाढतेय? आहारतज्ज्ञांचा सल्ला ऐका, स्वतःला केवळ या तीन सवयी लावा…

Video credit- Instagram/@growithneha

सर्वात शेवटी थोडक्यात सांगायचे तर स्त्रियांनी फिटनेसचे जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे, त्यामध्ये आपल्या शरीराची गुंतागुंत, हार्मोनल आरोग्य, व्यायाम आणि आहार या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे. “आपले संपूर्ण आरोग्य आणि प्रजनन आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, व्यायाम आणि आरोग्य सेवेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप फायदेशीर ठरेल. स्त्रियांनी त्यांना मिळालेल्या शरीराच्या विशिष्ट रचनेचा विचार करून जर व्यायाम आणि आहार घेतला, तर त्याने केवळ शरीर आरोग्य उत्तम राहण्यासच नाही, तर सडपातळ शरीरयष्टी मिळवण्यासाठी फायद्याचे ठरते, असे डॉक्टर स्वाती गायकवाड म्हणतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Females should avoid making these 4 fitness and diet mistakes for healthy hormonal and overall lifestyle dha
First published on: 22-01-2024 at 16:25 IST