Fetal Heart Rate Baby Gender Prediction : गर्भावस्थेत बाळाची धडधड (हार्टबिट) ऐकून बाळाच्या लिंगाचा अंदाज लावला जाऊ शकतो, असा दावा अनेकदा केला जातो. परंतु या दाव्यात किती सत्यता आहे? डॉक्टरांचा यावर काय सल्ला आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
गर्भावस्थेदरम्यान गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे हा पालकांसाठी अत्यंत खास आणि आनंदाचा क्षण असतो. याच काळात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, बाळाच्या हार्टबिटवरून पोटात मुलगा आहे की मुलगी, हे ओळखता येऊ शकतं का?
गेल्या अनेक वर्षांपासून असा दावा केला जातो की, जर बाळाचे ठोके प्रति मिनिट १४० (BPM) पेक्षा जास्त असतील तर मुलगी आणि १४० पेक्षा कमी असतील तर मुलगा होतो. पण खरंच असं असतं का? जाणून घेऊया या दाव्यामागील वैद्यकीय सत्य.
हार्टबिट आणि लिंगाबाबत काय दावा केला जातो?
अनेक लोकांचा असा समज आहे की:
१४० BPM पेक्षा जास्त हार्टबिट = मुलगी
१४० BPM पेक्षा कमी हार्टबिट = मुलगा
मात्र, वैद्यकीय शास्त्रात हा फॉर्म्युला लिंग ओळखण्याचा विश्वासार्ह मार्ग मानला जात नाही.
बाळाचे ठोके का बदलतात?
गर्भातील बाळाचे हार्ट रेट (Fetal Heart Rate) संपूर्ण गर्भावस्थेत एकाच पातळीवर राहत नाहीत. गर्भावस्थेचा आठवडा, बाळाची हालचाल आणि बाळाची गर्भातील स्थिती यांमुळे या ठोक्यांमध्ये सतत बदल होत असतो. त्यामुळे तपासणीदरम्यान बाळाचे ठोके १५० किंवा १६० BPM आले, तर बाळ मुलगीच असेल असे नाही. तसेच १३० किंवा १४० BPM ठोके असणे हा मुलगा असण्याचा संकेत मानला जाऊ शकत नाही.
डॉक्टर हार्टबिटवरून काय तपासतात?
डॉक्टर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा वापर मुख्यत्वे त्याचे आरोग्य आणि गर्भावस्थेची स्थिती तपासण्यासाठी करतात. हार्ट रेटवरून बाळाच्या आरोग्याविषयी अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय माहिती मिळते, परंतु यावरून मुलगा की मुलगी याची पुष्टी केली जात नाही.
१४० BPM चा फॉर्म्युला किती योग्य?
हा गर्भावस्थेशी संबंधित एक अत्यंत लोकप्रिय गैरसमज आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. प्रत्येक बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा दर नैसर्गिकरीत्या वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे केवळ BPM पाहून लिंगाचा अंदाज लावणे पूर्णपणे चुकीचे ठरू शकते.
सत्य काय आहे?
गर्भावस्थेत जेव्हा तुम्ही बाळाचे ठोके ऐकता, तेव्हा त्याकडे बाळाच्या आरोग्याची माहिती घेण्याचा मार्ग म्हणून पाहा, लिंग ओळखण्याचा उपाय म्हणून नाही. हृदयाच्या ठोक्यांवरून मुलगा किंवा मुलगी असण्याचा कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही.
