Lukewarm Water For Fever: ताप आला की शरीराला शक्य तितकं लवकर थंड करण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया अनेक जण करतात. कधी कधी थंड पाण्याचा वापर करून. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा उपाय उलट परिणाम करू शकतो. आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या जेरियाट्रिक मेडिसिन तज्ज्ञ डॉ. मीनल ठकराल यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, रूम टेम्परेचर किंवा कोमट पाण्याचा वापर अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतो.

तापामध्ये थंड पाणी का टाळावे?

“रूम टेम्परेचर किंवा कोमट पाणी शरीराला हळूहळू थंड करते आणि शरीरावर ताण येऊ देत नाही,” असे डॉ. ठकराल सांगतात. तापाच्या वेळी शरीराचे अंतर्गत तापमान आधीच वाढलेले असते. “थंड पाणी त्वचेला अचानक शॉक दिल्यासारखे आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि थरथर कापणे सुरू होते. त्यामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते,” असे त्या सांगतात.

याउलट, कोमट पाणी शरीरासोबत समन्वय साधते. “हे त्वचेद्वारे हळूहळू उष्णता बाहेर जाऊ देते, त्यामुळे ताप नैसर्गिकरित्या कमी होतो,” असे त्या म्हणतात. विशेषतः मुलांसाठी हा उपाय अधिक आरामदायी असून संपूर्ण प्रक्रिया शांत आणि प्रभावी बनते.

थंड पाण्यामुळे ताप वाढू शकतो का?

“खूप थंड पाणी लावल्यावर शरीर उष्णता जपण्याचा प्रयत्न करते,” असे डॉ. ठकराल सांगतात. “यामुळे थरथर कापणे आणि रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते, त्यामुळे उष्णता बाहेर जाणे थांबते.” याचा परिणाम असा होतो की थंडावा फार काळ टिकत नाही. “ताप लवकर परत येऊ शकतो आणि रुग्णाला अधिक अस्वस्थता व ताण जाणवू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काळजी का आवश्यक?

“मुलं आणि वृद्ध व्यक्तींमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी स्थिर असते,” असे डॉ. ठकराल स्पष्ट करतात. “मुलं पटकन थरथर कापू लागतात, त्यामुळे त्यांचा ताप आणखी वाढू शकतो. तर वृद्धांमध्ये रक्ताभिसरण कमी आणि प्रतिसाद मंद असतो. थंड पाण्याने स्पंज बाथ दिल्यास त्यांना अशक्तपणा, थंडी वाजणे किंवा तब्येत बिघडल्यासारखे वाटू शकते.” त्यामुळे सौम्य आणि नियंत्रित पद्धतीने शरीर थंड करणे गरजेचे आहे.

सुरक्षित स्पंज बाथ कसा द्यावा?

योग्य पद्धतीने स्पंज बाथ देणे सोपे असले तरी तंत्र महत्त्वाचे असल्याचे डॉ. ठकराल सांगतात. “मऊ कापड आणि नळाचे कोमट पाणी वापरा. कपाळ, मान, बगल आणि पाठ यांसारख्या भागांवर हलक्या हाताने पुसा, कारण या ठिकाणांहून उष्णता सहज बाहेर पडते.”

स्पंज बाथ अतिप्रमाणात करणेही योग्य नाही. “खूप थंड पाणी वापरू नका किंवा संपूर्ण शरीर भिजवू नका. खोलीचे तापमान आरामदायी ठेवा आणि व्यक्तीला थरथर सुरू झाली तर लगेच थांबा.” तज्ज्ञांच्या मते, उद्दिष्ट जलद थंड करणे नसून रुग्णाला आराम देणे हे असावे. “यासोबत पुरेसे पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉलसारखी औषधे घेणेही महत्त्वाचे आहे.”