Chakraful benefits: ‘चक्रीफुल’ हा एक मसाला आहे, जो त्याच्या विशिष्ट स्टार आकार आणि सुगंधी चवीसाठी ओळखला जातो. जरी तो बर्याचदा पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जात असला तरी आता बरेच लोक त्यांच्या सकाळच्या दिनचर्येत समावेश करीत आहेत. ही जुनी पद्धत अनेक आरोग्यदायी फायदे देते, असे मानले जाते, ज्यामुळे नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांसाठी चक्रीफुलाच्या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
पण, या चक्रीफुलाचे नेमके फायदे काय आहेत? आणि ते एकूणच आरोग्यासाठी कसे योगदान देते? दररोज सकाळी हे चवदार पाणी पिण्याचे पाच प्रमुख फायदे जाणून घेण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आम्ही एका तज्ज्ञाशी बोललो.
दररोज सकाळी चक्रीफुलाचे पाणी पिण्याचे पाच प्रमुख फायदे
सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : चक्रीफुलामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
दाहकविरोधी फायदे : त्याचे दाहकविरोधी गुणधर्मदेखील फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे संधिवातासारख्या आजारांमुळे होणारी अस्वस्थता कमी होते.
पचनास मदत : चक्रीफुलाचे पाणी प्यायल्याने पाचन एंझाइम्स उत्तेजित होतात. पोटफुगी आणि अपचन कमी होते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकार शक्तीवाढीची क्षमता : नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणांमुळे चक्रीफूल तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकते; विशेषतः सर्दी आणि फ्लूच्या हंगामात.
त्वचेच्या आरोग्यात सुधारणा : चक्रीफुलामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक तेज मिळते.
चक्रीफुलाचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी त्याचे पाणी कसे बनवायचे?
१-२ चक्रीफुले, एक ग्लास पाणी व लिंबाचे तुकडे किंवा पुदिन्याची पाने यांसारखे पर्यायी पदार्थ एकत्र करा; जेणेकरून चांगली चव मिळून, फायदे वाढतील.
चक्रीफूल एका ग्लासात किंवा भांड्यात ठेवा. पाणी आणि कोणतेही पर्यायी साहित्य घाला. सर्वोत्तम परिणामांसाठी हे मिश्रण रात्रभर किंवा किमान २-४ तास भिजत ठेवा. त्यामुळे पोषक घटक त्यात मिसळतील आणि त्या द्रावणाला चांगली चवही येईल.
सकाळी रिकाम्या पोटी सर्वांत आधी चक्रीफुलाचे पाणी प्या. ही पद्धत तुमच्या चयापचयाला सुरुवात करण्यास मदत करते, पचनास मदत करते आणि तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्हाला ताजीतवानी करून होते.
कोमट पेयासाठी तुम्ही चक्रीफूल सुमारे १० मिनिटे पाण्यात उकळू शकता. नंतर ते द्रावण गाळून घेऊन, सेवन करू शकता.
चक्रीफुलाचे पाणी अशा प्रकारे तयार करून, तुम्ही “एकूण आरोग्यासाठी त्याचे अँटीऑक्सिडंट, दाहकविरोधी आणि पाचक फायदे प्रभावीपणे मिळवू शकता.”
संभाव्य दुष्परिणाम किंवा घ्यावयाची खबरदारी
तुमच्या दैनंदिन दिनचर्येत चक्रीफुलाचे पाणी समाविष्ट केल्याने आरोग्यासाठी खूप फायदे मिळू शकतात. परंतु, काही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. “प्रथम, तुम्ही चायनीज चक्रीफूल (इलिसियम व्हेरम) वापरत आहात ना याची खात्री करा. कारण- विषारी जपानी चक्रफूल (इलिसियम अॅनिसॅटम) आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. संभाव्य गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि न्यूरोलॉजिकल दुष्परिणामांमुळे लहान मुलांना चक्रीफूल देणे टाळणे योग्य ठरेल.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेषतः जर तुम्हाला आधीच आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही औषधे घेत असाल. अशा प्रकारे तुम्ही सुरक्षित आणि निरोगी राहून फायदे घेऊ शकता, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.