Flu Vaccine Benefits & Heart Attack Risk India: बदलत्या हवामानामुळे होणारा हंगामी फ्ल्यू (Seasonal Flu) अनेकदा सामान्य आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. भारतात फ्लू लसीकरणाबाबत अजूनही मोठी अनास्था दिसून येते. ही लस कोणी घ्यावी, किती वेळा घ्यावी आणि त्याचा नेमका काय फायदा होतो, याबाबत लोकांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.
हैदराबाद येथील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. “फ्लू व्हॅक्सिन: कोणाला गरज आहे, किती वेळा घ्यावी आणि ती खरोखर फायदेशीर आहे का?” या प्रश्नांची उत्तरे त्यांनी प्रभावीपणे मांडली आहेत.
लसीकरणाचा सल्ला कोणासाठी?
डॉ. कुमार यांच्या मते, खालील गटातील व्यक्तींनी दरवर्षी फ्लू लस घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- ज्येष्ठ नागरिक: ६० वर्षांवरील व्यक्ती.
- लहान मुले: ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतची मुले.
- गर्भवती महिला.
- गंभीर आजार असलेले रुग्ण: मधुमेह (Diabetes), दमा (Asthma) आणि हृदयाचे विकार असलेले लोक.
- आरोग्य कर्मचारी: डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी.
डॉक्टरांच्या मते, ही लस सर्वांसाठीच फायदेशीर आहे. मात्र वरील गटातील लोकांसाठी ती संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते.
ही लस वर्षातून एकदाच का?
फ्लूची लस एकदा घेऊन आयुष्यभर चालत नाही. डॉ. कुमार स्पष्ट करतात की, फ्लूचे विषाणू सतत स्वतःचे स्वरूप बदलत असतात (Mutate होतात) आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील काळानुसार कमी होत जाते. त्यामुळे वर्षातून एकदा ही लस घेणे अनिवार्य आहे.
भारतासाठी सर्वोत्तम वेळ: “भारतात फ्लू लस घेण्याची सर्वोत्तम वेळ एप्रिल ते मे ही आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी (पावसाळ्यातील फ्लूचा पीक येण्यापूर्वी) लसीकरण पूर्ण करणे सर्वात प्रभावी ठरते,” असे डॉ. कुमार यांनी नमूद केले.
लसीचे प्रकार आणि सुरक्षितता
बाजारात सध्या दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.
- ट्रायव्हॅलेंट (Trivalent): जे फ्लूच्या ३ स्ट्रेन्सपासून संरक्षण देते.
- क्वाड्रिव्हॅलेंट (Quadrivalent): जे ४ स्ट्रेन्सपासून संरक्षण देते.
तज्ज्ञांच्या मते, क्वाड्रिव्हॅलेंट लस अधिक चांगली आहे कारण ती व्यापक संरक्षण देते. ब्रँडपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर लसीकरण करणे. लसीचे दुष्परिणाम अत्यंत सौम्य असतात, जसे की इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे, हलका ताप किंवा अंगदुखी. लस घेतल्यामुळे फ्लू होत नाही, हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.
फ्लूकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते महागात
डॉ. कुमार सावध करतात की, फ्लू नेहमीच ‘सौम्य’ नसतो. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते, व्हेंटिलेटरची गरज भासू शकते किंवा आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागतात. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही असतो.
वैयक्तिक जोखमीचे मूल्यांकन कसे करावे?
‘एलिट केअर क्लिनिक’चे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. पल्लेटी शिव कार्तिक रेड्डी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, केवळ वय किंवा जुने आजार पाहूनच लस घेऊ नये, तर जीवनशैलीचाही विचार करावा.
त्यांनी सांगितले की, “शहरी भागात जिथे लोकसंख्या जास्त आहे, तिथे संसर्गाचा धोका वाढतो. जर तुमचा संपर्क जास्त लोकांशी येत असेल किंवा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक आणि मुले असतील, तर लसीकरण करणे हा एक जबाबदार निर्णय आहे.”
फ्लूची लस केवळ ताप टाळण्यासाठी नाही, तर भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस भारतीयांनी प्रामुख्याने एप्रिल-मे महिन्यात घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
