Food Adulteration Detection: बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पण रोजच्या आहारात वापरले जाणारे दूध, मध, तूप, हळद, मिरची आणि तांदूळ शुद्ध आहेत की भेसळयुक्त, हे ओळखणे आता कठीण राहिले नाही. त्याच्या या घरगुती टिप्स अवश्य जाणून घ्या.
खवय्यांना दिसताहेत खरे रंग
शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीचा पूर्ण नायनाट करण्याचा जणू विडाच उचलल्यासारखा दिसतोय. अगदी वेगवगेळी हॉटेल्स, छोट्यामोठ्या इटरीज्, प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांवर धडाकेबाज कारवाई होतेय. फूड प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या कंपन्या, रुचकर पदार्थांच्या नावाखाली भेसळभरल्या प्लेट्स ग्राहकांसमोर ठेवणाऱ्या हॉटेलांना बेपर्वाईची शिक्षा होतेय, तर दुसऱ्या बाजूला आकर्षक-रुचकर पदार्थांचे शब्दशः खरे रंग खवय्यांना दिसू लागलेत… ही चांगलीच गोष्ट आहे, कारण बाहेरचे पदार्थ का खाऊ नयेत हे वारंवार सांगणाऱ्या माझ्यासारख्या आहारतज्ज्ञाला यातून खरोखर दिलासा मिळतोय!
एक्सपायरी झालेले पदार्थ जातात कुठे?
गेली कित्येक वर्षे दूषित पाणी, खाद्यपदार्थांची अस्वच्छ हाताळणी आणि अयोग्य साठवणूक केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वेगवेगळे आजार होत असल्याचं आपण वाचत आलोय. पण त्याची कारणं शोधण्याच्या फंदात फारसं कोणी पडलेलं नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रिल्स मधून कोणालातरी पदार्थात मेलेलं झुरळ किंवा पाल सापडल्याचं दिसतं, चॉकलेटमध्ये अळ्या सापडतात. किंवा कधी एक्स्पायरी झालेले पदार्थ दिले जातात. तेव्हा तात्पुरता गदारोळ उठतो. पण अनेकदा एक्सापायरी डेट संपलेल्या पदार्थाचं पुढे काय होतं ? ते कुठे जातात ? त्यावरचं लेबल बदलून दुसरीकडे पुरवलं जाताहेत का, हे आपल्या खिजगणतीतही नसतं.

ग्राहकाला जेव्हा जाग येते…
पण नुसतं सांगून पटत नसतं. त्यासाठी पुरावा द्यावा लागतो. तो अन्न व औषध प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे जनतेसमोर येतो आहे. त्यामुळे घडलंय असं की, आपण पितोय ते दूध खरंच गायीचं आहे किंवा म्हशीचं आहे की तत्सम पदार्थांपासून तयार केलेलं आहे? आपण खातोय ते पावडरयुक्त दही आहे की, नक्की कोणत्या प्रकारच्या भेसळीचा परिणाम आहे; याचं ग्राहकभान जागृत होतंय. तेल, मसाले, मिरचीचं तिखट, वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार होणारे सॉस, आईस्क्रीम, मिठाई यांचा दर्जा, गुणवत्ता, स्वच्छता याची वेळोवेळी योग्य तपासणी होणं गरजेचं आहे, हे आता ग्राहकांना कळू लागलंय. कारण, शेवटी आपल्याच जिवाशी खेळ सुरू आहे, हे सगळ्यांनी ओळखलंय.
भेसळयुक्त पदार्थांना पर्याय काय?
पाम तेलाला एडिबल ऑईल असं नाव लेबल देऊन त्यावर हेल्दी स्नॅकिंग असं सर्रास लिहिलेलं असतं. निकृष्ट दर्जाचं तेल ग्राहकाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, याचा विचार फार कमी वेळा केला जातो. “तुम्ही कितीही हेल्दी म्हणालात, तरी चटपटीत पदार्थ तयार करायला आर्थिक फायदा आणि चव हे दोन महत्वाचे घटक आहेत. आणि त्यासाठी पामतेलाला पर्याय नाही” हे ग्राहकांच्या जिवावर बेतणारं घातक सत्य चकचकीत स्नॅक्स विकणाऱ्या दुकानदाराने मला एकदा अत्यंत समजुतीच्या सुरात सांगितलंय. या सगळ्या बाबी लक्षात घेता ग्राहक म्हणून आपण भेसळयुक्त पदार्थ ओळखणं आणि खाणं कमी नक्कीच करू शकतो. पण कसं?
भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं?
खरंतर सुसज्ज प्रयोगशाळेतच पदार्थांमधली भेसळ शोधता येऊ शकते. पण, घरी आणलेला पदार्थ दरवेळी प्रयोगशाळेत पाठवणं आणि निष्कर्षाची वाट पाहात राहणं प्रॅक्टिकल ठरतं नाही. तेव्हा, घरच्या घरी काही ठराविक पद्धतीने भेसळीचा शोध येऊ शकतो. दुधात पाणी मिसळलं असेल, तर आपल्याकडचं दूध उतरत्या पृष्ठभागावर टाकलं तर ते पटकन वाहून जाताना दिसेल. दुधात स्टार्च मिसळला असेल, काही थेंब आयोडिन टाकल्यानंतर ते एकत्र केलं तर दुधाला निळा रंग आल्याचं लक्षात येईल. जर डिटर्जंट मिसळले असेल तर समप्रमाणात पाणी टाकून दूध एकत्र करताना भरपूर फेस तयार होईल. दुधात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर डाळीची पूड एकत्र करून त्यात लिटमस पेपर धरला की, लिटमस पेपर निळा झाल्यास युरियाची भेसळ आहे हे सिद्ध होईल.
शुद्ध मध कसा ओळखावा?
घरच्या घरी भेसळ तपासताना एखादा पदार्थ पाण्यात मिसळून पाहणं ही सगळ्यात सोपी टेस्ट आहे. मधातली भेसळ ओळखायची असेल, तर १ कप पाण्यात मधाचे काही थेंब सोडावेत, भेसळयुक्त मध पाण्यात पटकन विरघळतो. शुद्ध मध तळाशी थेंबासह साठून राहतं. एखाद्या कापडावर मधाचा थेंब टाकला तर शुद्ध मध डाग सोडत नाही.
हळद आणि मिरची किती खरी?
हळदीमध्ये अनेकदा भेसळ करणारे लोक मेटॅलिक येलो कलर टाकतात. तो ओळखण्यासाठी हळदीवर काही थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड किंवा लिंबाचा रस टाकावा. हळदीचा रंग लगेच जांभळा गुलाबीसर झाल्यास त्यात भेसळ आहे असं समजावं. मिरची पूड भेसळयुक्त असेल तर ती पूड पाण्यात टाकल्यास तळाशी जाऊन बसते. अस्सल पूड पाण्यावर वरचेवर तरंगते. तेलात जर रंगाची भेसळ असेल तर एक रंगीत तवंग पाण्यावर तरंगत राहतो.
साखर- मीठ व चहातील भेसळ
साखरेत असणारी खडूची पूड तळाशी साठून राहते. हाच नियम मिठासाठी देखील लागू आहे. शुद्ध मीठ आणि साखर पाण्यात लगेच विरघळून जाते. चहा किंवा कॉफी पावडरमध्ये आधी वापरलेल्या पावडरचा समावेश असेल तर ही पूड पाण्यात मिसळल्यास वरचेवर तरंगत राहते. ओल्या फिल्टर पेपरवर चहा किंवा कॉफी पावडर घेतली आणि त्यावर पाणी टाकून पाहिलं, तर पावडरचा रंग पेपरवर उतरतो.
प्लास्टिकचा तांदूळ खाताय?
भेसळ करणारे लोक महाकरामती असतात. ते तांदळात प्लास्टिकची भेसळही करू शकतात. ती ओळखायची तर थोडा तांदूळ भाजून पाहावा. प्लास्टिकसारखाच लगदा तयार होतो. तांदूळ जळताना प्लास्टिकचा वासदेखील येतो.
तुपामध्ये भेसळ कशाची?
तुपाच्या शुद्धतेबद्दल जाणून घेताना घरगुती चाचणी थोडी जपून करावी लागते. तुपात नायट्रिक अॅसिडचे थेंब टाकून पाहा. तुपाला जर लाल तांबडा रंग आला, तर त्यात आर्जेमोनची भेसळ आहे, असं समजावं. थोडक्यात, घरगुती चाचण्या करून अन्नपदार्थांमधली भेसळ ओळखता येते. पण, जागरुक ग्राहक म्हणून बाहेरचे खाद्य पदार्थ खरेदी करताना भेसळ ओळखण्याचं आणखी एक चॅलेंजही नेहमी आपल्या समोर असतं.
