कच्च्या भाज्या आणि फळं ही आहाराचा विशेष भाग असायला हवीत. हिवाळ्यातील जेवण हे नेहमीच गरम आणि भूक शमवणारे असायला हवे. गार सॅलड्स खायला नको वाटतात. हिवाळ्याच्या दिवसात पालेभाज्या आणि फळभाज्यांची रेलचेल असते. तापमान थंड असल्यामुळे भूकदेखील उत्तम लागते. आजच्या लेखात आपण काही विशेष आणि वेगळ्या कोशिंबिरींबद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवातील काही पालेभाज्या आणि त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कोशिंबिरींबद्दल जाणून घेऊया
दही- मेथी कोशिंबीर
मेथीची पाने खुडून ती मध्यम आचेवर परतून घावी. आणि परतताना त्यात थोडे जिरे आणि की हिरवी मिरची एकत्र करावी. मेथी परतून झाली की, ताज्या दह्यामध्ये गरम मेथी एकत्र करावी. यात थोडे मीठ घालावे. ही कोशिंबीर पराठा किंवा थालीपीठ सोबत खायला उत्तम! लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरभरून असणारी ही कोशिंबीर हिवाळ्यात करायला सोपी आणि खायलाही चविष्ट आहे.
गाजर- बीट- कोशिंबीर
अ जीवनसत्त्व , नायट्रेट आणि तंतुमय पदार्थ यांनी भरपूर असणारी ही कोशिंबीर दोन प्रकारे तयार करता येते.
१) १ गाजर आणि १ बीट (बीटाचे आवरण वेगळे करावे) गोलाकार तुकड्यात चिरून घ्यावे आणि त्या प्रत्येक भागाचे ४ भाग करावेत. हे तुकडे एकत्र करावेत. यात सैंधव मीठ आणि धने पूड एकत्र करावी. हे मिश्रण १ चमचा तुपावर परतून घ्यावे आणि जेवणासोबत खावे.

२) गाजर बीट कोशिंबिरीचा आणखी एक प्रकार म्हणजे १गाजर आणि १ बीट गोल तुकड्यात कापून त्याने लांब आयताकृती पातळ तुकडे करावेत. एक चमचा तुपामध्ये १ चमचा जिरे, एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा किसलेले आले परतून घ्यावे. यात ६-० कढीपत्त्याची पाने टाकावीत. आणि आता पातळ चिरलेले गाजर आणि बीट यात खमंग होईपर्यंत परतून शिजवावे.
- ही गरम कोशिंबीर पचायला हलकी आणि पोळी किंवा भातासोबतदेखील खाता येते.
- काहीजण हे गरम मिश्रण दह्यासोबत एकत्र करतात.
- काही जण खिचडीसोबत ही कोशिंबीर खातात.
- ही गरम कोशिंबीर- पोळीचा रोल करून खायला सोपी आणि पोषक आहे
बीट- पनीर कोशिंबीर
शरीरातील रक्तभिसरणासाठी बीट अत्यंत गुणकारी आहे. बीट आणि पनीर कोशिंबीर खायला चविष्ट आहे आणि प्रथिने, लोह, नायट्रेट्स यांनी युक्त आहे. १ माध्यम आकाराचे बीट सोलून किसून घ्यावे. १०० ग्राम पनीर घ्यावे. हे पनीर देखील किसून घ्यावे. एका लहान भांड्यात १ चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा दाण्याचे तेल किंवा तूप घ्यावे. त्यात १ चमचा जिरे आणि ४-५ कढीपत्त्याची पाने एकत्र करावीत. यात किसलेले बीट आणि पनीर परतून घ्यावे, चवीपुरते मीठ टाकावे आणि चिमूटभर मीरपूड टाकावी. वरून कोथिंबीर चिरून टाकावी आणि हे गरम सलाड जेवणासोबत खावे. या मिश्रणाचे पराठे देखील उत्तम होतात.
मुळा -बीट कोशिंबीर
डोळ्यांच्या आणि पोटाच्या आरोग्यसाठी उत्तम असणारी ही कोशिंबीर भाकरीसोबत खायला उत्तम आहे . मुळा आणि बीट बारीक किसून घ्यावे. आणि तूप किंवा तेलावर तीळ आणि जिरे एकत्र करवून परतून घ्येव. हे सगळे मिश्रण एकत्र शिजवावे. सगळ्यात शेवटी त्यात लिंबू पिळून घ्यावे.
भोपळा-जवस कोशिंबीर:
१०० ग्राम भोपळा सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. एक चमचा तुपावर कोथिंबीर आणि कढीपता एकत्र करून परतून घ्यावे. त्यावर १ चमचा जिरे आणि १ चमचा जवस परतून घ्यावे. शेवट भोपळ्याचे तुकडे परतून घ्यावे. ही गरम चविष्ट कोशिंबीर आमटी भात किंवा पोळीसोबत उत्तम आहे.
कोबी-सफरचंद कोशिंबीर
नेहमी आपण कोबीची भाजी तयार करतो. मात्र भूक शमवणारी आणि चवीला उत्तम अशी तंतुमय पदार्थानी युक्त कोशिंबीर किमान आठवड्यातून एकदा खायलाच हवी.
- कोबी किसून घेऊन त्यात थोडे मीठ टाकावे आणि तो चुरून घ्यावा. सफरचंद लांब भाग होतील असे किसून घ्यावे. सफरचंद आणि कोबी एकत्र करावेत.
- एका भांड्यात १ चमचा तूप किंवा तेल , १ लाल मिरची, १चमचा जिरे , १ चमचा तीळ आणि १चमचा दाण्याचं कूट एकत्र करून त्याची फोडणी करावी. चिरलेल्या कोबीवर ही फोडणी वरून एकत्र करावी.
- यात १ चमचा लिंबाचा रस एकत्र करावा. चवीपुरते सैंधव मीठ टाकावे.
- आंबट गोड़ अशी ही कोशिंबीर हिवाळ्यात जेवणासोबत किंवा मधल्या वेळात खायला उत्तम आहे.
