Uddhav Thackeray Angioplasty : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (१४ ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. पण काही वृत्तसंस्थांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त दिले. त्यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातूनची चिंता व्यक्त करण्यात येत आली. पण उद्धव ठाकरे मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात नियमित तपासणासाठी नेण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे, तसेच उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी झाल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट देखील केली आहे. परंतु यामुळे अँजिऑप्लास्टी शस्त्रक्रियाविषयी लोक अधिक सर्च करताना दिसत आहेत.
यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पहिल्यांदा २० जुलै २०१२ रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या हृदयातील तीन मुख्य धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये आठ स्टेंट टाकले होते. पण, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया नेमकी कशाप्रकारे केली जाते आणि त्याचे फायदे, तोटे काय आहेत जाणून घेऊ….
अँजिओप्लास्टी म्हणजे काय? (What is the process of angioplasty?)
अँजिओप्लास्टीला कोरोनरी अँजिओप्लास्टी (Percutaneous Coronary Intervention, PCI) असेही म्हटले जाते. प्लेक/ रक्ताच्या गाठींमुळे धमन्या ब्लॉक होतात. त्यांना उघडण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला Angioplasty म्हणतात. या प्रक्रियेद्वारे ओपन-हार्ट सर्जरी न करता हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुरू होण्यास मदत होत असते. ज्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज आहे किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ उपचार म्हणून या पर्यायाचा अवलंब केला जातो.
ही प्रक्रिया सुरू असताना पातळ, लांब कॅथेटर ट्यूब रुग्णाच्या रक्तवाहिनीमध्ये टाकली जाते. कॅथेटर ट्यूबच्या सहाय्याने ब्लॉक झालेली जागा शोधता येते. ट्यूब तुमच्या शरीरात गेल्याचे जाणवू नये म्हणून औषधांचा वापर केला जातो. या ट्यूबच्या पुढच्या टोकाला लहान फुगा असतो. ब्लॉकेज शोधून काढल्यानंतर तो फुगा फुगवला जातो आणि त्याच्यामार्फत तेथील ब्लॉक दूर केला जातो, यामुळे रक्त प्रवाह पुन्हा सुरू होतो. हे करत असताना कार्डियोलॉजिस्ट एक्सरेचीदेखील मदत घेत असतात. याप्रकारच्या अँजिओप्लास्टीला बलून अँजिओप्लास्टी असेही म्हटले जाते.
स्टेंट (Stent) कशाला म्हणतात? (What Is Stent In Angioplasty)
धमन्यांमध्ये ब्लॉक होऊ नये यासाठी स्टेंटची मदत होते. अनेक कार्डियोलॉजिस्ट अँजिओप्लास्टी करताना स्टेंटचा वापर करतात. धातूच्या अतिसूक्ष्म, जाळीदार कॉइल्स म्हणजेच स्टेंट रक्तवाहिनीच्या उघडलेल्या भागामध्ये टाकल्या जातात. ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरू राहावे यासाठी स्टेंटचा वापर केला जातो.
अँजिओप्लास्टीचे फायदे काय आहेत ?
१) यात कमी जोखीम आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेपेक्षा कमी खर्च येतो.
२) रक्तवाहिन्यांमध्ये ज्या ठिकाणाहून कॅथेटर्स ट्यूब घातल्या जातात, तिथेच फक्त एक जखम होते.
३) अँजिओप्लास्टीदरम्यान डॉक्टर ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरू राहावे त्यामुळे स्टेंटचा वापर करतात.
हेही वाचा – पाठीच्या दुखण्याने हैराण झालात? रोज ४० मिनिटे करा डॉक्टरांनी सुचवलेल्या ‘या’ गोष्टी; दुखणं होईल एकदम कमी
अँजिओप्लास्टीचे तोटे
जरी ही सर्वात सामान्य आणि सुरक्षित प्रक्रिया असली तरीही अँजिओप्लास्टीशी संबंधित काही जोखीम घटकही आहेत.
१) हृदयविकाराचा झटका
३) हृदयाची असामान्य लय
३) स्ट्रोक
४) रक्तवाहिनी किंवा मूत्रपिंडासंबंधित समस्या
५) रक्ताच्या गुठळ्या होणे
६) छातीत दुखणे
७) रक्तस्त्राव
८) पुन्हा ब्लॉकेजची शक्यता
डॉक्टरांच्या मते, वृद्ध व्यक्ती ज्यांच्या हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत, किडनीचा आजार किंवा हार्ट फेलिअरची समस्या असलेल्या लोकांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी येतात.