Fridge Cleaning Hacks : पावसाळ्यात उष्णतेपासून आराम आणि थंडावा मिळतो, पण दुसरीकडे वाढत्या आर्द्रतेमुळे संसर्गाचा धोकाही वाढतो; त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पण, आरोग्याबरोबर अन्नपदार्थांचीही विशेषत: काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये थोड्याशाही निष्काळजीपणाने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. या संदर्भात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पावसाळ्यात अन्न सुरक्षेबाबत काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रिज स्वच्छ करणे.
प्रत्येक स्वयंपाकघरात फ्रिज एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे अन्नाचे बॅक्टेरियापासून संरक्षण करता येते आणि अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्यास मदत होते. यावर एफएसएसएआयने नमूद केले की, स्वयंपाकघरातील फ्रिज आतून बाहेरून दर दोन आठवड्यांनी स्वच्छ करा आणि डीफ्रॉस्ट करा.
पण, विशेषत: पावसाळ्यातचं फ्रिज दर दोन आठवड्यांनी स्वच्छ का करावा हे समजून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरेंद्र सिंघला यांच्याशी चर्चा केली.
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे तुमच्या आरोग्यावर जसा परिणाम होतो तसा अन्न पदार्थ साठवण्यावरही त्याचा परिणाम होत असतो, त्यामुळे डॉ. सिंघला यांनीही पावसाळ्यात नियमितपणे फ्रिज स्वच्छ करण्यावर भर दिला आहे.
डॉ. सिंघला म्हणाले की, पावसाळ्यात वाढत्या आर्द्रतेमुळे फ्रिजमध्येही मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल वाढीस पोषक वातावरण निर्माण होते, ही बाबत आरोग्यासाठी चिंताजनक आहे, कारण यामुळे साठवलेल्या अन्नात बॅक्टेरिया जमा होत अन्न दूषित होऊ शकते.
नियमित स्वच्छता आणि डीफ्रॉस्टिंगमुळे फ्रिजमधील बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देणारी आर्द्रता कमी होते. फ्रिज आतून स्वच्छ राहिल्यास अन्न दूषित होत नाही आणि यामुळे विविध आजारांचा धोकाही कमी होतो, यामुळे अन्न वापरण्यायोग्य राहते.
तसेच डीफ्रॉस्टिंगमुळे फ्रिजची कार्यक्षमता राखण्यास मदत होते, ज्यामुळे कुलिंग सिस्टमला अडथळा निर्माण करणाऱ्या फ्रॉस्ट बिल्ड अपला रोखण्यास मदत होते.
पावसाळ्यात तुमचा फ्रिज नियमितपणे स्वच्छ आणि डीफ्रॉस्ट न केल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. फ्रिजमधील वाढलेली आर्द्रता आणि उष्ण तापमान यांच्या मिश्रणामुळे अन्न लवकर खराब होऊ शकते. फ्रिजमध्ये अन्न खराब झाल्यास त्यातून उग्र, घाणेरडा वास येतो, पदार्थाची चव बिघडते. तसेच बॅक्टेरिया, बुरशीसाठी तिथे पोषक वातावरण तयार होते, असेही डॉ. सिंघला यांनी स्पष्ट केले.
दूषित अन्न खाल्ल्याने विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये पचनासंबंधित समस्या, संसर्ग आणि अगदी अन्नातून विषबाधादेखील होऊ शकते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो, त्यामुळे फ्रिज नेहमी स्वच्छ ठेवा.
स्वच्छ फ्रिज ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते, परंतु पावसाळ्यात वाढत्या आर्द्रतेमुळे आणि दूषित होण्याच्या धोक्यामुळे ते विशेषतः महत्त्वाचे बनते.