आम्हा आहारतज्ज्ञांचा कट्टा जमला की एक पदार्थ हमखास आहारात समाविष्ट केला जातो तो म्हणजे हिबिस्कस इन्फ्युजन किंवा जास्वंदी चहा ! अलीकडेच आम्हा सगळ्यांचं जास्वंद आणि त्याच्या उपयुक्ततेबद्दल चर्चा सुरु होती. अनेकांना केस गळती थांबणे , उत्तम झोप लागणे असे परिणाम मिळाले होते .विशेषतः रजोनिवृत्ती जवळ आलेल्या स्त्रियांना यापासून खूप चांगले परिणाम दिसून आलेले लक्षात आले. खवय्यांच्या यादीत वरचा क्रमांक असणारे भारतीय चहाच्या बाबतीत बऱ्यापैकी प्रयोगशील आहेतच . त्यात जास्वंदीचा चहा हा रंगाने आणि गंधाने मोहक असतो त्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे . गणपतीच्या दिवसात गणपतीच्या विविध मूर्तींसारखे प्रसादात देखील वैविध्य असते . गणपती उत्सवाच्या निमित्ताने गणपती वाहिलं जाणारं दुर्वा , जास्वंद , मोदक अशी एक साग्रसंगीत तयारी असते.गणपतीचे दिवस म्हटले की जास्वंदाचे फूल, दुर्वा मूड यांसारख्या वेगवेगळ्या प्रसादाच्या पदार्थांचे आणि नैवेद्याचे दिवस! यातलं जास्वंदाचे फूल म्हणजेच गडद रंग असूनही एकाच वेळी प्रसन्न, लोभस आणि ठाम असं रुपडं लाभलेलं पूजेतील मानाचं फूल.आहार शास्त्रामध्ये जास्वंदाच्या पाकळ्या आणि पाने याबाबत अनेक वर्ष संशोधन सुरु आहे. जास्वंदाच्या पाकळ्यांमध्ये कर्बोदके, कॅल्शियम ,मॅग्नेशियम ,पोटॅशियम ,जीवनसत्व क आणि ब यांचे मुबलक प्रमाण आढळते. यातील बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड शरीराला अत्यंत पूरक असतात. आणखी वाचा: Health Special: 'हा' आहे हॅपी डाएटिंगचा फंडा हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाच्या फुलात अंथोसायनीन नावाचा घटक आढळतो. अँथोसायनिन जास्वंदाच्या फुलाला एक गडद रंग बहाल करतात. या गडद रंगामुळे त्यात असणारे फिनोलिक आम्ल , फायटिक आम्ल यांसारखे पदार्थ अँटिऑक्सिडंट म्हणून शरीरात काम करतात. या अँटिऑक्सिडंटमुळे शरीरामध्ये उच्च रक्तदाब तयार न होणे, कर्करोगापासून रक्षण होणे, मधुमेह किंवा मधुमेह किंवा हृदयरोगांपासून रक्षण होणे यांसारखे फायदे मिळतात. जास्वंदाचा चहा किंवा जास्वंदाच्या फुलाचा चहा प्यायल्यामुळे उत्तम झोप लागू शकते. शिवाय मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण देखील कमी झालेले आढळून येते. संशोधनाअंती असे आढळून आले आहे की महिनाभर किमान दोन कप जास्वंदाचा चहा प्यायल्यामुळे उच्च रक्तदाब उत्तमरीत्या कमी होऊ शकतो. तसेच त्यामुळे औषधांचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. आणखी वाचा: Health Special: गणपती बाप्पाच्या लाडक्या मोदकाचं कॅलरी गणित शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्यांसाठी हिबिस्कस पावडर म्हणजे जास्वंद पावडर अत्यंत गुणकारी आहे. जास्वंदीच्या पानाचा पाला किंवा जास्वंदीच्या पानाची पावडर योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट केल्यास बारा ते पंधरा आठवड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. ज्यांना बद्धकोष्ठ आहे किंवा ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांच्यासाठी देखील जास्वंदाचे फूल किंवा जास्वंदाच्या पानांचा पाला अत्यंत गुणकारी आहे. चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी जास्वंदीचा चहा किंवा जास्वंद आहारात समाविष्ट केल्यामुळे उत्तम परिणाम मिळू शकतात. गर्भार स्त्रियांसाठी मात्र जास्वंदाचे नियमित सेवन अत्यंत हानीकारक मानले जाते . त्यामुळे शक्यतो गर्भार स्त्रियांनी जास्वंदीच्या चहापासून किंवा कोणत्याही प्रकारच्या पाल्यापासून दूर राहावे .ज्यांना स्थूलपणा किंवा लठ्ठपणा आहे त्यांच्यासाठी लठ्ठपणा कमी करण्याकरता जास्वंदीचा चहा किंवा जास्वंदीच्या वाळलेल्या पाकळ्या आहारात समाविष्ट केल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते ज्यांच्या शरीरात चे प्रमाण जास्त आहे किंवा यकृताच्या आरोग्यासाठी जास्वंदीच्या पाल्याचा आणि जास्वंदीच्या फुलांचा होणारा परिणाम अजूनही यावर अजूनही संशोधन सुरु आहे. कर्करोग कमी होण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा अत्यंत चांगला उपयोग होतो शिवाय ज्यांना कर्करोगासाठी उपचार सुरु आहेत त्यांना जास्वंदीच्या फुलांचा चहा किंवा जास्वंदीच्या कोरड्या फुलांचा पाला आहारात समाविष्ट केल्यामुळे उत्तम फायदे मिळू शकतात. अशा बहुगुणी जास्वंदीचा उपयोग केवळ गणपती बाप्पासाठीच नव्हे तर चहा म्हणून, पावडर म्हणून तुम्ही जर घरगुती लाडू तयार करत असाल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही करू शकता. शिवाय कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ तुम्ही खात असाल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सकाळी जर ओट्सची पेज करत असाल किंवा तुम्ही कधी दलियाची पेज करत असाल ;तर त्यामध्ये किमान एक चमचा जास्वंदाचा पाला कायम कायम वापरायला हरकत नाही. अनेकदा कोणतेही आजार कमी करण्यासाठी आपण अतिरेकी प्रमाणामध्ये एखादा पदार्थ वापरतो आणि त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसान जास्त होते आणि त्याला जास्वंदीचा चहा किंवा जास्वंद देखील अपवाद नाही. त्यामुळे कितीही गुणकारी असलं तरी जास्वंद आहारात अतिरेकी प्रमाणात वापरू नये .म्हणजे नक्की कसं तरजास्वंद चहा- किमान १ कप , जास्वंद पावडर - ५ग्राम , जास्वंद रस - १०० मिलीइतक्याच प्रमाणात आहारात सामाविस्ट करा आणि या गणेशोत्सवात या खास फुलाचे तितकेच खास परिणाम अनुभवा.