Steroids, Protein Powder Side Effects : तरुणांमध्ये फिटनेसची क्रेझ वाढताना दिसतेय. इतरांपेक्षा फिट अँड फाइन दिसण्यासाठी ते जिम आणि हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करतात. याशिवाय तगडी बॉडी बनवण्यासाठी जिमबरोबर स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडरचेही सेवन करतात. पण, याच गोष्टींवरून आता ऑर्थोपेडिकतज्ज्ञांच्या एका गटाने तरुणांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. २० वर्ष वयोगटातील अनेक तरुण जिमला जाण्याबरोबर स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडरचे अयोग्य प्रमाणात सेवन करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच याच गोष्टींमुळे तरुणांच्या कंबर आणि नितंबाला गंभीर नुकसान होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीत आयोजित ‘दिल्ली हिप ३६०’ परिषदेदरम्यान आरोग्यतज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे, ज्यात ऑर्थोपेडिकतज्ज्ञांनी म्हटले की, तरुणांमध्ये एव्हस्कुलर नेक्रोसिस (AVN) आणि लवकर हिप डिजनरेशनच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. ही स्थिती साधारणपणे वृद्ध प्रौढांमध्ये दिसून येते, पण तरुणांमध्येही आता ही स्थिती वाढत असल्याने काळजी घेणं गरजेचे आहे.

यावेळी परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. एल. तोमर म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये नितंबाशी संबंधित तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. माझ्या ओपीडीमध्ये दर आठवड्याला ३० वर्षांखालील दोन ते तीन रुग्ण नितंबाशी संबंधित तक्रारी घेऊन येतात. ज्यांपैकी बरेच जण २० वर्षांखालील असतात, जे जिम सुरू केल्यापासून सतत नितंब दुखत असल्याची तक्रार करतात. यावेळी तपासणीत अनेकदा एव्हस्कुलर नेक्रोसिसमुळे (AVN) हा त्रास होत असल्याचे दिसून येते. एव्हस्कुलर नेक्रोसिस हा अशाप्रकारचा त्रास आहे, ज्यात नितंबाच्या हाडांमध्ये योग्यप्रकारे रक्तपुरवठा होण्यास अडचणी येतात, ज्यामुळे हाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना अॅनाबॉलिक स्टिरॉइडचा वापर किंवा प्रोटीन पावडरच्या अतिसेवनामुळे हा त्रास वाढत असल्याचेही दिसून आले, अशी माहिती दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट युनिटचे प्रमुख डॉ. तोमर यांनी दिली.

अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले की, तरुणांमध्ये नितंबाशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे एव्हीएन होण्याचा धोका वाढतोय, ज्यास अल्कोहोल आणि स्टिरॉइडचा अतिवापर कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच महाराष्ट्र एफडीएने प्रोटीन पावडरवर राज्यव्यापी तपासणी सुरू केली, तेव्हा अनेक ब्रँडचे कार्यक्षमता वाढवणारे स्टिरॉइड्स आढळून आले. त्यापैकी बरेच ब्रँड योग्य लेबलिंग किंवा मंजुरीशिवाय ऑनलाइन किंवा जिममध्ये मोफत उपलब्ध होते. तसेच सोशल मीडियावरही त्याचे खूप प्रमोशन केले जाते.

पण तरुण अशाप्रकारे स्टिरॉइड्स, प्रोटीन पावडरचे सेवन करुन कमी वेळेत मजबूत बॉडी बनवण्याचा नादात नकळतपणे हाडांच्या आरोग्याचे नुकसान करत आहेत. विशेषत: यामुळे हिप जॉइंटच्या फेमोरल हेडला नुकसान पोहोचवत आहे, असे डॉ. तोमर यांनी निदर्शनास आणून दिले.

हे गंभीर परिणाम माहिती असूनही भारतात शारीरिक कार्यक्षमता वाढवणारे स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडर ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजीव जैन म्हणाले की, स्टिरॉइड्सचा गैरवापर किंवा प्रोटीन पावडरच्या अतिसेवनाने हाडांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर थेट परिणाम होतो. यामुळे (AVN) नितंबात वेदना, कडकपणा आणि बधीरपणा येतो, बऱ्याच प्रकरणांमध्ये हिप जॉइंटचे पूर्णपणे नुकसान होऊ शकते. अशावेळी ज्या रुग्णांच्या स्थितीवर औषधोपचार करून उपचार करता येऊ शकतात, त्यांच्यासाठी हिप रिप्लेसमेंट एक चांगला पर्याय असतो, असे डॉ. जैन म्हणाले.

AVN ही स्थिती केवळ वेदनादायकच नाही तर लवकर निदान न झाल्यास ती बरी होण्यासही वेळ घेते. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये एकमेव उपचार म्हणजे हिप रिप्लेसमेंट. ही एक जटिल प्रक्रिया आहे, जी सामान्यतः वृद्ध रुग्णांसाठी केली जाते. ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील शहरी भागात राहणाऱ्या तरुणांमध्ये हा त्रास सामन्यतः वाढतोय.

परिषदेत ऑर्थोपेडिक संशोधकांनी सादर केलेल्या आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले की, गेल्या तीन वर्षांत दिल्लीच्या तृतीयक रुग्णालयांमध्ये आढळलेल्या AVN प्रकरणांपैकी ३० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचा समावेश होता आणि यामागे स्टिरॉइड इंजेक्शन, स्टिरॉइडचा गैरवापर किंवा अयोग्य आहार हे कारण आहे.

परिषदेचे वैज्ञानिक अध्यक्ष आणि वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शरद अग्रवाल म्हणाले की, भारतात फिटनेस हा एक ;चांगली कमाई करण्याचा उद्योग बनला आहे, परंतु तो योग्य दिशेने असणे गरजेचे आहे. जिम करून बॉडी बनवणे हेच ध्येय ठेवले जाते, पण असे करताना नकळत तरुण स्नायू आणि हाडांचे आरोग्य खराब करत आहेत. यामुळे आपल्याला तातडीने जागरूकता मोहीम, पूरक बाजारपेठांचे नियमन आणि जिममध्ये मूलभूत ऑर्थोपेडिक स्क्रीनिंगची आवश्यकता आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांनी फिटनेस प्रशिक्षक आणि जिम मालकांना त्यांच्या क्लायंटना स्टिरॉइड सायकल आणि प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर किती प्रमाणात करणे गरजेचे आहे, तसेच त्याच्या सेवनानंतरच्या जोखमींबद्दल शिक्षित करण्याचे आवाहनही वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शरद अग्रवाल यांनी केले आहे.