Vitamin B12 Deficiency: आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीचा लोकांवर अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. अनेकांना अकाली काही आजारांच्या समस्या सुरू झाल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे काही जणांना हात थरथरण्याचा अनुभव येत आहे. अनेकांना असे वाटते की हे ताणतणावामुळे होते. मात्र नेहमीच असे होत नाही. तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये, व्हिटॅमिन बी १२ आणि काही खनिजांच्या कमतरतेमुळे देखील हे होऊ शकते. या पौष्टिक तत्वांच्या कमतरतेमुळे मज्जासंस्था कमकुवत होते आणि त्यामुळे हात थरथरतात. योग्य आहार आणि वेळेवर उपचार करून ही समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.

मज्जातंतूंचे नुकसान

व्हिटॅमिन बी१२ हे मज्जासंस्थेसाठी म्हणजेच आपल्या नर्व्हस सिस्टिमसाठी आवश्यक मानले जाते. ते मज्जातंतूंना मजबूत ठेवण्यास आणि मेंदूपासून शरीराच्या इतर भागात सिग्नल योग्यरित्या प्रसारित करण्यास मदत करते. अनेक लोकांना बी१२ची कमतरता जाणवते, त्यामुळे त्यांच्या नसा कमकुवत होतात. याचा परिणाम अनेकदा हात आणि पायांवर होतो. हातांमध्ये सौम्य थरथरणे, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात आणि या समस्येचे लवकर निराकरण केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

नसा आणि स्नायूंसंबंधित समस्या

बऱ्याचदा लोकांना असे वाटते की हात थरथरणे हे केवळ कमकुवतपणा किंवा वयामुळे होते. मात्र जर ही समस्या कायम राहिली तर ते हलक्यात घेणे योग्य नाही. जर बी१२ ची कमतरता दीर्घकाळ राहिली तर चालताना संतुलन बिघडू शकते आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांना वस्तू हातात धरण्यास त्रास होऊ लागतो किंवा लिहिताना त्यांचे हात थरथरायला लागतात. काही खनिजांची कमतरता देखील हात थरथरण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता देखील स्नायूंमध्ये कमकुवतपणा आणि थरथर निर्माण करू शकते. जेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते तेव्हा नसा आणि स्नायू योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.

तुमचा आहार सुधारा

आजकाल शाकाहारी लोकांमध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे. तसंच योग्य आहार आणि वैद्यकीय सल्ल्याने ती सुधारली जाऊ शकते. दूध, दही, चीज, अंडी, मासे आणि मांस यांसारखे बी१२ समृद्ध पदार्थ खाल्ल्याने या समस्येत मदत होऊ शकते. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाइड तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. याव्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ पूरक आहार घेता येईल.