मुंबई : मधुमेहाच्या निदानासाठी व नियंत्रणासाठी वापरली जाणारी एचबीए १ सी (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) चाचणी भारतात अनेकदा दिशाभूल करणारी ठरू शकते, असा गंभीर इशारा लॅन्सेट रिजनल हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात देण्यात आला आहे. भारतासह दक्षिण आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा अॅनिमिया, सिकल सेल, थॅलेसेमिया आणि जी ६ पीडी कमतरता यांचा एचबीए १ सी च्या निष्कर्षांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

फोर्टिस सी-डॉक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिसचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्र यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात एचबीए १ सी वर एकमेव निदान साधन म्हणून अवलंबून राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. हिमोग्लोबिनची मात्रा, रचना किंवा आयुष्य बदलणाऱ्या कोणत्याही आजारामुळे एचबीए १ सी मूल्ये बदलू शकतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेचा सरासरी अंदाज चुकीचा ठरू शकतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मुंबईतील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, भारतातील अनेक भागांत कुपोषण आणि लोहअभावी अॅनिमिया मोठ्या प्रमाणात आढळतो, जो एचबीए १ सी चाचणीच्या मूल्यांवर परिणाम करू शकतो. विशेषतः जी ६ पीडी कमतरता असलेल्या पुरुषांमध्ये मधुमेहाचे निदान चार वर्षांपर्यंत उशिरा होऊ शकते, ज्यामुळे गुंतागुंतींचा धोका वाढतो असा इशाराही त्यांनी दिला.

अभ्यासात टाइप-१ मधुमेह रुग्णांमध्येही एचबीए १ सी आणि प्रत्यक्ष रक्तातील साखर यांच्यातील संबंध नेहमी सरळ नसतो, असे नमूद करण्यात आले आहे. एचबीए १ सी ही मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाची चाचणी असली तरी निदानासाठी ती एकटी वापरता येत नाही, हे आता नवीन राहिलेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अॅनिमियावर उपचार केल्यावर एचबीए १ सी पातळी कमी होत असल्याचे भारतीय अभ्यासांतून दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहाचे निदान एका एचबीए १ सी अहवालावर आधारित असू शकत नाही तर संपूर्ण क्लिनिकल चित्र पाहणे गरजेचे आहे.अभ्यासकांनी ओजीटीटी (ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट), घरगुती रक्तशर्करा तपासणी, सतत ग्लुकोज मॉनिटरिंग आणि आवश्यक त्या रक्ततपासण्यांचा समावेश असलेली बहुआयामी, जोखीम-आधारित पद्धत अवलंबण्याची शिफारस केली आहे.

Award Banner

भारतात मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहे. आगामी काळात भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागातही मधुमेह व उच्च रुग्णांची संख्या वाढत असून शहरी भागात खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप तसेच वाढता ताणतणाव यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मधुमेह आढळून येत आहे. ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात अनिमियाच्या समस्येचा व मधुमेहाच्या चाचण्यांचा विचार करणे आता गरजेचे बनले आहे.एचबीए १ सी चाचणीचा वापर ॲनिमियाच्या रुग्णांसाठी करताना नेमके मधुमेहाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अन्य चाचण्यांचा विचार करणे आवश्यक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.