Health Multivitamin and Food: किरण- वय वर्ष ३२, गेली अनेक वर्षे धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेणारा, नियमितपणे व्यायाम करणारा, कॉर्पोरेट कल्चरमधला व्यग्र असणारा तरुण! त्याचे रिपोर्ट्स पाहताना वेडेवाकडे कोलेस्ट्रॉल , जीवनसत्त्वांशी साधारण कट्टी अशा स्वरूपाचं रिपोर्ट्स होते.
मी अधून मधून मेडिसिन्स घेत असतो.
म्हणजे कोणती मेडिसिन्स?
– हेच मल्टीव्हिटॅमिन्स, कधी डिटॉक्स गोळ्या. जीवनसत्त्व डी , बी१२ वगैरे. मला डॉक्टर पण म्हणालेत अधून मधून घ्यायचे.
-“डॉक्टरांनी लिहून दिलं असेल, असं अधुनमधून का घ्यायला सांगतील?”

मल्टिव्हिटॅमिनचा अतिरेक

“हो गेल्या वर्षी खूपच कमी झालं होतं – शॉट्स घ्यायला लागले दोन्हीचे!. म्हणून मग ते म्हणाले घेत राहा.”
आणि अलीकडे कसंय काहीही करा ; तुमचे रिपोर्ट्स असेच येणार. म्हणून म्हटलं एकदा डाएट नीट करून बघावं!
त्याच्या या वाक्यावर मी म्हटलं -डाएट करूच पण एकदा नवे रिपोर्ट्स करूया. हे एप्रिलचे रिपोर्ट्स आहेत. एव्हाना गोळ्यांचा फरक पडला असेलच.
त्यावर तो म्हणाला “छे, छे! मी यावेळी थोडं डाएट केलं माझं माझं. दिवसभरात एकवेळ जेवण आणि रोज तीन मल्टीव्हिटॅमिन! म्हटलं करून बघूया. पण गेले काही दिवस मला कॉन्स्टिपेशन होतंय! शिवाय कॉफी प्यायलो नाही तर पोटाचे बाराच वाजतायत. हाडं दुखू लागतायत आणि धावताना दम लागतोय.”

दोन वेळचं उत्तम जेवण महत्त्वाचं

“मल्टीव्हिटॅमिन्स कधी आणि कोणत्या घेताय?
“एकच घेतोय रोज ३! “
मला त्याची धावण्याची तयारी, त्याच्या यकृतावर आलेला ताण, आवश्यकतेहून कमी खाल्लेलं अन्न आणि त्यामुळे शरीराची झालेली अतिरेकी झीज हे सगळंच दिसू लागलं…
“मला असं वाटत आता प्रयोग पुरे! रिपोर्ट्स रिपीट करूया आणि आहार सांगते तसाच सुरु करू!”
मी किरणच्या आहारात दोन वेळचं उत्तम जेवण धावतानाचा आहार याच आरेखन केलं आणि मोर्चा त्याच्या मल्टीव्हिटॅमिन्स कडे वळवला.

Award Banner

जीवनसत्त्वाच्या गोळीसोबतचा आहारही तेवढाच महत्त्वाचा

ही अधुनमधून घ्यायची औषध नसून नियमित शिस्तीने घेण्याची औषध आहेत हे समजावून सांगितलं.
अनेकदा जीवनसत्त्वं अधुनमधून घेतली तरी चालतात, या गैरसमाजापायी अनेकजण कधीही गोळ्या घेतात किंवा घेत नाहीत. जेव्हा जीवनसत्त्वांची कमतरता असते, तेव्हा नियमितपणे ठराविक प्रमाणातच औषध घेणं आवश्यक असतं. काही गोष्टी हे करताना खूप महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ जेवणानंतर व्हिटॅमिन सी ची गोळी घेणे किंवा डी जीवनसत्त्वाचा गोळीसोबत आहार करताना त्यात स्निग्धांशाचे प्रमाण उत्तम असेल याची काळजी घेणे.

medicine-multivitamin
केवळ औषधं घेऊन उपयोग नसतो, जेवणही तेवढंच महत्त्वाचं असतं

औषधाबरोबर पाणी पिणं महत्त्वाचं

अनेकदा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेताना बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोळ्यांसोबत प्यायलं जाणारं पाणी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. गोळी घेतल्यावर पाणी पिण्याऐवजी काहीजण अशीच गोळी खातात. कोणतीही मल्टीव्हिटॅमिन किंवा जीवनसत्त्व विषयक गोळी घेताना पाणी न पिणे यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील एक म्हणजे किरणची समस्या बद्धकोष्टता! प्रत्येक मल्टीव्हिटॅमिन रक्तात त्याचा परिणाम साधण्यासाठी पाण्याचा माध्यम म्हणून थेट वापर करत असतं -आणि हे फक्त गोळ्यांसाठी नव्हे तर आपण खात असलेल्या अन्नालादेखील तेवढंच लागू होते.

अपुरा आहार हे अनेकदा असतं अनारोग्याचं महत्त्वाचं कारण

किरणच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्याचा व्यायाम आणि आहाराचं प्रमाण. नियमितपणे व्यायाम करणाऱ्या शरीरासाठी आहार म्हणजे इंधन! व्यायाम करताना शरीराला पुरेसं इंधन मिळणं आवश्यक असतं. तुमच्या प्रत्येक आहारात जेवढं प्रथिनांचं महत्त्व असत तेवढं आणि किंबहुना त्याहून अंमळ जास्तीच महत्त्व कर्बोदकांना असतं . उत्तम प्रतीचे कर्बोदक तुम्हाला ऊर्जेसाठी महत्वाचा स्रोत ठरतात. सातत्याने इंधनाचा पुरवठा उत्तमरित्या होत असेल तर हाडांची झीज होत नाही आणि थकवा येण्याचं प्रमाण कमी होतं. अनेकदा सांधेदुखी, थकवा याच मुख्य कारण अपुरा आहार असतं. धावपटूनसाठी आहारात उत्तम प्रतीची धान्य, कडधान्ये, भाज्या यांचा समावेश असणं अतिशय आवश्यक असतं.

व्यायामानंतरचा आहारही तेवढाच महत्त्वाचा

व्यायाम झाल्यानंतर खाल्ली जाणारी प्रथिनं -त्यांचं स्वरूप महत्वाचं ठरत. अनेक धावपटू धावताना लिंबूपाणी आणि धावून झाल्यावर विश्रांती घेऊन दूध किंवा अंडी किंवा दुग्धयुक्त प्रथिने आहारात समाविष्ट करताना दिसतात. व्यायामानंतरचा हा कालावधी प्रत्येक धावपटूंसाठी वेगवेगळा असू शकतो. जेव्हा जीवनसत्त्वांसाठी -विशेषतः कमतरता असताना गोळ्या घेण्याची आवश्यकता असते तेव्हा एकाच गोळीतून सगळी जीवनसत्त्व घेण्याचा अट्टाहास न करणे कधीही उत्तम!

गोळ्या अतिरेकी प्रमाणात नको

भले तुम्हाला दिवसातून २ किंवा ३ वेळा वेगवगेळ्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या वेगवेगळया वेळी घ्याव्या लागतील पण त्या वेळचं पालन करणं आवश्यक आहे. अनेकदा एकाच प्रकारच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या तर यकृतावर ताण येऊ शकतो आणि हळूहळू त्यामुळे शरीरात थकवा येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही ताकदीच्या गोळ्या म्हणून अतिरेकी प्रमाणात घेऊ नयेत.

सकस आहार महत्त्वाचा

आहारातील संतुलन आणि या सगळ्याच औषधांचा जवळचा संबंध आहे. औषध घेताना ती तुमच्या आहाराला पूरक परिणाम देऊ शकतील अशा प्रमाणे तयार केलेली असतात. त्यामुळे केवळ गोळ्यांवर अवलंबून राहून आपण जेवण बंद करू शकत नाही आणि करूही नये. आहार आणि औषधाबाबत -गोळ्यांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवावी- औषधं घेण्यात शिस्त असावी आणि जितका सकस आहार, तितकं सजग आरोग्यभान!