Effective uses of salt in Ayurveda to detoxify body: मिठाचा वापर आपण रोजच्या जेवणात चवीसाठी करतो, पण आयुर्वेदानुसार मिठाचे महत्त्व केवळ चवीपुरते मर्यादित नाही. शरीरातील विष बाहेर काढण्यापासून ते जुनाट खोकला आणि मूतखड्यापर्यंत अनेक व्याधींवर मीठ हे एका औषधासारखे काम करते. मात्र, आधुनिक जीवनशैलीत मिठाचा अतिवापर धोक्याचा ठरू शकतो.

गुळण्यांचा तत्काळ उपयोग

टॉनिल्स- घशात कफ होणे, कान वाहणे, सर्दी, पडसे, खोकला, दम, कफ, आवाज बसणे या विकारांत मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्यांचा तत्काळ उपयोग होतो. मीठ तव्यावर भाजावे व गरम पाणी व किंचित तूप याबरोबर घ्यावे, तत्काळ उपयोग होतो. पोटदुखी विकारात रक्तदाब कमी झाला, एकदम थकवा वाटू लागला, गळून गेल्यासारखे वाटू लागले, चक्कर आली, मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला तर थोडे अधिक मीठ, किंचित साखर व पाणी असे मिश्रण घ्यावे, लगेच आराम पडतो. तीव्र मलावरोधात नेहमीच्या आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. विशेषत: पोळीचा आटा कालवताना, डाळ शिजवताना किंवा भात, कोशिंबीर यात अधिक मीठ टाकून जेवण घ्यावे. तीव्र मलावरोध कमी होतो.

…तर मूतखडा पडून जातो

मूत्रेंद्रियांच्या टोकाशी जर मूतखडा असला तर धन्याचा काढा करून त्यात अधिक मीठ मिसळून तो काढा प्यावा. मूतखडा पडून जातो. हाडांचा क्षय, आहाराच्या अभावाने होणाऱ्या क्षय विकारात मिठाचे प्रमाण वाढवावे, बरे वाटते.

Award Banner
Health benefits of salt in Marathi | Ayurveda salt precautions for high BP | मिठाचे औषधी फायदे आणि घरगुती उपाय | आयुर्वेद आणि मिठाचा मर्यादित वापर
आरोग्यासाठी मिठाचे औषधी फायदे आणि सावधगिरीचे उपाय. (Photo- Gemini)

…पित्त पडून जाते

आम्लपित्त, उलटी होणे, छातीत जळजळ या कफपित्तप्रधान विकारात मिठाचे भरपूर पाणी पिऊन उलटी करवावी. पित्त पडून जाते. आराम पडतो. ज्यांना शौचशुद्धीचा आनंद हवा आहे, आतडी साफ व्हावयास हवी आहेत, योगासने करावयाची आहेत, त्यांनी चमचा-दोन चमचे मीठ कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. आतडी साफ होतात, शौचसुद्धा होते व जुनाट मलावष्टंभ बरा होतो.

जंत/ कृमी पडून जातात

सूतासारखे बारीक कृमी आपल्या जागेपासून सुटण्याकरिता दोन-तीन ग्रॅम मीठ पाण्यात मिसळून काही दिवस नियमित घ्यावे. कृमी पडून जातात, नवीन कृमी होत नाहीत. पचनक्रिया सुधारते. मूत्र गढूळ व अशुद्ध झाले असेल व मूत्राला अडथळा होत असला तर रोज सकाळी एक ग्रॅम मीठ एक ग्लासभर पाण्यात मिसळून घ्यावे. फायदा होतो. अंडवृद्धी विकारात मीठ तुपात मिसळून घ्यावे, फायदा होतो.

विषही शरीरातून बाहेर पडते

पित्तप्रधान उलटीत, मीठ आल्याबरोबर, कफप्रधान उलटीत मिऱ्याबरोबर मिसळून घ्यावे. उलटी थांबते, कोणतेही विष पोटात गेले असल्यास भरपूर मीठ घालून तांब्या दोन तांबे पाणी प्यावे. उलटी किंवा जुलाब होतात. सर्व विषार शरीरातून बाहेर पडून जातो.

रात्री खोकल्याची उबळ आली तर…

रात्री झोपताना खोकल्याची उबळ येत असेल, कफ सुटत नसेल तर तोंडात खडे मिठाचा खडा ठेवावा. कफ सुटतो, आराम पडतो. तसेच छातीतील कफ मोकळा करण्याकरिता कोणतेही तेल थोड गरम करून त्यात मीठ मिसळून छातीला चोळावे. कफ पातळ होतो व श्वासाचा, खोकल्याचा जोर कमी होतो.

…तर जखम चिघळत नाही

वैद्यकीय साधनांचा अभाव असलेल्या ठिकाणी कोणाला जखम झाल्यास तात्काळ त्या जागी मीठ पाण्याची पट्टी ठेवावी. जखम चिघळत नाही. लवकर भरून येते. मार, मुरगळा, सूज, ठणका, सांधेदुखी, गुडघेदुखी, खांदा दुखणे या विकारात मीठ मिसळून उकळलेल्या पाण्याचा शेक द्याावा. दाढ किंवा हिरड्यात पू झाला असेल ठणकत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात किंवा त्या जागी मिठाचा खडा ठेवावा, ठणका थांबतो. तीव्र तापामध्ये लवकर उतार पाहिजे असेल, तर मीठ-पाण्याच्या घड्या कपाळ, डोके, तळहात, छाती इथे ठेवाव्या, घाम येतो, ताप उतरतो. दातांच्या पायोरिया किंवा कीड होऊन घाण वास येत असेल तर मिठाचा उपयोग दात घासण्याकरिता करावा. तात्पुरता उपयोग होतो.

मीठ केव्हा खावू नये?

आयुर्वेदीय औषधी वर्गीकरणाप्रमाणे आपल्या पृथ्वीवर आठ प्रकारचे क्षार मिळतात. ‘क्षार म्हणजे क्षरण करणारा पदार्थ’ अशी व्याख्या आहे. या आठ प्रकारच्या क्षारातील काळे मीठ म्हणजे आजचे खडे मीठ होय. दिवसेंदिवस सुशिक्षित समाजात मिठाचा वाढता वापर हे एक फॅड होऊन बसले आहे. ज्यात त्यात खाण्याच्या पदार्थात मीठ टाकल्याशिवाय ‘तरुणाईला’ चैन पडत नाही. उसाच्या गुºहाळात गेल्यावर उसाच्या रसात मंडळी कणभर मीठ टाकून रस पितात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. आधुनिक जीवनातील अनेकानेक विकारांना मिठाचा फाजील अनावश्यक वापर करणे आहे हे मी सांगावयास नकोच.

मीठ आणि सैंधवात फारसा फरक नाही

रक्तदाबवृद्धी, सूज, विविध त्वचाविकार, जखमा, सोरायसिस, केसांचे व डोळ्यांचे विकार याकरिता माझ्यासारखी वैद्य मंडळी ‘रुग्ण मित्रांना’ मीठ पूर्णपणे सोडण्याचा किंवा अत्यल्प वापर करावयाचा बहुमोल सल्ला देतात. रुग्ण विचारतो; मिठाऐवजी सैंधव खाल्लेले चालेल का? रुग्णहिताच्या दृष्टीने मीठ व सैंधवात काहीही फरक नाही. संबंधित रुग्णाने विशेषत: ‘व्हाइट अ‍ॅण्ड ब्ल्यू’ कॉलरवाल्या; खुर्चीबहाद्दर, वातानुकूलित ऑफिसमध्ये किंवा चोवीस तास पंख्याखाली राहणाऱ्यांनी मीठ टाळावेच. जी व्यक्ती खड्डे खणते, ओझी वाहते, शेतात वा उन्हातान्हात शारीरिक काम करते तिलाच मीठ खाण्याचा अधिकार देवाने दिला आहे. अतिस्थूल, रक्तदाबवृद्धी, मधुमेहग्रस्त व्यक्तींकरिता ‘इतना इशारा’ काफी है।

…त्यांनी मीठ टाळायला हवे

मीठ कोणत्या विकारात खावे यापेक्षा कोणत्या विकारात खाऊ नये ही मोठी समस्या आहे. त्याकरिता पावसाळ्यात मीठ ठेवलेल्या मातीच्या मडक्याचा पाझर किंवा मडक्याच्या बाहेर बसणारा मिठाचा साका डोळ्यांसमोर आणावा. जल व अग्नी पंचमहाभूतांपासून लवणाची मिठाची उत्पत्ती होते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात अगोदरच खूप चरबी, ओलावा, स्निग्धता व त्याचबरोबर खूप उष्णता वाढली आहे त्यांनी किमान मीठ खावे. व्यवहारात मात्र त्याच्या उलट घडते. सुखवस्तू, श्रीमंत, शहरी, सुशिक्षित राहणी असणाऱ्यांच्या आहारात ज्यात त्यात मीठ असते. त्यांनी मीठ टाळायलाच हवे.