Essential Tips for Better Sleep and Spine Health: Learn why avoiding pillows can prevent cervical pain: निरोगी आरोग्यासाठी रात्रीची शांत झोप अत्यंत आवश्यक असते, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यवसायामुळे अनेकांची झोप अपुरी होते. केवळ अपुरी झोपच नाही, तर झोपण्याची चुकीची पद्धत देखील अनेक विकारांना निमंत्रण देते. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंबद्दल आपले गैरसमज असतात. आपल्या मनात संभ्रम असतात. म्हणूनच या घटकांबद्दल वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.
झोपताना काय वापरावे? काय वापरू नये?
चांगल्या आरोग्याकरिता आहार, व्यायामाबरोबर रात्रीची झोप अतिशय आवश्यक असते. शिफ्ट ड्यूटी, वर्तमानपत्र विक्रेते, हॉटेलमधील नोकर, रेल्वे कामगार, टेलिफोन व हॉस्पिटल स्टाफ, पहारेकरी, ट्रक किंवा बस ड्रायव्हर, वर्तमानपत्रातील रात्रपाळीचे छापखाना कामगार अशा अनेकांना व्यवसायामुळे अपुरी झोप मिळते. रात्री सहा-सात तास झोपणारा कामगार दिवसा झोपावयाचे असेल तर एकूण चार तासच झोपू शकतो, असा निष्कर्ष आहे.
कमी झोपेमुळे अनेक विकार
दिवसा खूप झोप येऊ शकते असे महाभाग फार थोडे. या कमी झोपेमुळे रक्तदाब, हृद्रोग, पांडू, क्षय, चक्कर, भ्रम, मलावरोध, उदरवात, आम्लपित्त, अल्सर, मूळव्याध, डोळ्यांचे विकार, डोकेदुखी असे नाना विकार उद्भवतात, बळावतात. यावर उपाय असा की, दिवसा ज्यांना झोपावयाचे आहे त्यांनी तळपाय, तळहात, कानशिले यांना चांगल्या तुपाचा हलक्या हाताने मसाज करावा. तसेच नियमितपणे धने-पाणी व साखर असे मिश्रण घ्यावे. त्यामुळे पित्त वा वायूचे विकार बळावत नाहीत.

अवेळी झोपेमुळे आयुष्याचे गणित बिघडते
काही व्यक्तींना कारणाशिवाय केव्हाही झोपायची सवय असते. त्यामुळे मेद, कफ, वायूचे विकार बळावतात. शरीराला जडत्व येते. फाजील रक्तदाब, मधुमेह, आमांश, अग्निमांद्या, मूळव्याध, भगंदर, पोटफुगी, उदरवात, अजीर्ण असे नवे विकार बळावतात. या लोकांना हुशारी वाटत नाही. वेळी-अवेळी झोपल्यामुळे जेवण-खाणही अवेळी होते. एकूण सर्व स्वास्थ्य बिघडते. तरतरी राहत नाही. अवेळी झोप येत असेल तर आल्याचा तुकडा, लवंग, काळी मिरी यापैकी काही चघळावे. झोप पळून जाते. मेंदूचे जडत्व दूर होते.
तरुणांना आठ तास झोप आवश्यक
तरुण माणसांना आठ तास, साठीनंतर सहा तास व सत्तरीनंतर पाच तास झोप पुरेशी आहे. फाजील झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, हृद्रोग, डोळ्यांचे विकार, अजीर्ण, गॅस इत्यादी विकार बळावतात. त्याचबरोबर आयुष्य कमी होते. फाजील झोप म्हणजे कायमच्या झोपेला लवकर आमंत्रण देणे होय. ‘दुपारी जो झोपला, तो संपला.’ मधुमेही, स्थूल व वारंवार सूज येणाऱ्या रुग्णांनी वरील मंत्र लक्षात ठेवावा. दुपारी झोपल्याने आयुष्य कमी होते. इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे- अर्ली टू बेड, मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अॅण्ड वाईज सूज्ञ वाचक मित्रांना मी अधिक काय सांगावे?
उशी आणि गादी
सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण मुलगा माझ्याकडे चक्कर येते या तक्रारीकरिता आला. त्याची तपासणी करता काही दोष आढळेना. त्याला उशी घेऊ नको असा सल्ला दिला. तो त्याने तंतोतंत पाळला व त्या दिवसापासून पुन्हा त्या मुलाला चक्कर आली नाही. याअगोदर अनेक वैद्यकीय सल्लागारांनी त्याच्यावर अनेक औषधांचा मारा केला होता. खराखुरा ‘औषधाविना उपचार’ झाला. गेल्या पंधरा-वीस वर्षांत असंख्य तरुणांना ‘उशी नको’चा आग्रह मी वारंवार करत असतो.
मणक्याच्या विकाराही उशी नको
विशेषत: तोल जाणे, पडल्यासारखे वाटणे, फेकल्यासारखे वाटणे, झोक जाणे, रक्तदाब कमी होत असेल तर उशी काढली की लगेच बरे वाटायला लागते. उशी न घेण्यामुळे मानेच्या मणक्यांच्या विकारातही खूप आराम पडतो. ‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस’ किंवा मानेच्या मणक्यामधील अंतर कमी-जास्त होणे, या तक्रारीत उशी सोडल्याबरोबर बरे वाटायला लागते.
उशी न घेण्याचा फायदा
विशेषत: हातांच्या पहिल्या व मधल्या बोटाला मुंग्या येणे, मान-खांदा दुखणे, टाइपिंग किंवा लिहिण्याचे सतत, भरपूर काम करणारे लेखनिक, खाली वाकून सातत्याने पोळ्या लाटणे, मेवामिठाई किंवा इतर वाटणे, रांधणे, फरशा पुसणे इत्यादी स्वयंपाकघरातील कामे करणाऱ्यांना उशी न घेण्याचा फायदा आहे. त्याचबरोबर ‘लो हेड’ किंवा पलंगावर झोपणाऱ्यांनी डोके खाली व पायाकडे दोन विटा लावून मग झोपल्यास मानेचे विकार, चक्कर व रक्तदाब कमी होणे, या तक्रारीत आराम पडतो.
मानेच्या विकारात कॉलर हा दागिना घालावयाचा असेल तर वेळीच, विशेषत: चाळिशीनंतर उशी सोडावी. ‘आपण वरच्या मजल्यावर राहत असलात तर वरून उशी खाली फेकून द्यावी’ असा गमतीदार सांगावा मी माझ्या चक्करग्रस्त रुग्णमित्रांना देत असतो. ज्यांना पाठदुखी, पाठीच्या मणक्यांचा आजार आहे, त्यांनी उशीप्रमाणेच गादीचा त्याग करावा. हार्ड बेड, फळी, ब्लँकेट किंवा कांबळे वापरावे.
उबदार व कठीण अंथरूण
मानेच्या मणक्याबरोबर पाठीचे व कमरेचे मणके दुखावल्यामुळे, त्यांच्या चकत्या झिजल्यामुळे, अंतर कमी-जास्त होऊन तीव्र वेदना, फार वेळ उभे राहता न येणे, जरासे वजन उचलले तरी त्रास होणे, कुशीवर न झोपता येणे असे त्रास सुरू होतात. ‘स्लिप डिस्क’चे ऑपरेशन तज्ज्ञ सर्जन मंडळी सुचवतात. त्यापेक्षा फळी किंवा दिवाणावर ब्लँकेट किंवा कांबळे घालून कठीण, पण उबदार अंथरूण वापरणे आणि गादीचा पूर्णपणे त्याग करणे हा उत्तम उपाय आहे.
गादी फेका, पाठ वाचवा
पाठीच्या मणक्यांची रचना स्प्रिंगसारखी वर-खाली करता येणाऱ्या टेबल लॅम्पसारखी असते. गादीवर झोपून, गादीचा आकार आतील कापसामुळे कमी-जास्त उंच-सखल होतो व अगोदरचे झिजलेले मणके आणखीनच झिजतात. माझ्या एका शेतकरी रुग्णाचे ठरवलेले शस्त्रकर्म केवळ फळीवर झोपल्यामुळे टळल्याचे उदाहरण आहे. कठीण व उबदार अंथरुणावर झोपल्याने, विशेषत: उताणे झोपल्याने पाठीचे मणके सुधारायला संधी मिळते. ‘गादी फेका, आपली पाठ वाचवा.’
