Health Special: दोन ट्रेन रद्द झाल्या, त्यामुळे माझ्या नेहमीच्या ट्रेनला प्रचंड गर्दी होती. सगळ्यांनाच कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची घाई होती. मी जेमतेम पर्स सांभाळत हळू हळू आत सरकत होते, तेवढ्यात मोठ्ठा गलकाझाला. मी थबकून मागे वळून पाहिले. दोघी जणी एकमेकीच्या झिंज्या उपटतील की, काय अशी स्थिती होती. दोघीही एकमेकींच्या अंगावर ओरडत होत्या, शिवीगाळ करत होत्या. कशावरून झाले सगळे? एकीने दुसरीला गाडीत चढायला लवकर जागा दिली नाही, तिची पर्स दुसरीला जोरात लागली! त्यावरून पारा चढला आणि ट्रेनमध्ये चढताच रणकंदन सुरू झाले! मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात असे अनेक प्रसंग दिसतात. इतका राग आणि संताप कुठून येतो?
इतका राग का येतो?
संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या लावल्या. एक एक चॅनेल पुढे जाताना लक्षात आले, ‘आंदोलकांनी तोडफोड केली’, ‘जमावाने हल्ला केला’, ‘संताप न आवरल्याने एकाने भावाचा खून केला’; अशा अनेक बातम्या तीन तीन -चार चार मिनिटे दृश्यांसकट पाहताना वाटायला लागले, आता मलाही बहुधा कसला तरी राग येणार! टीव्हीच बंद करून टाकला! अनेक प्रश्न मनात उभे राहिले. इतका राग का येतो? कोणाला येतो? सतत राग राग झाला तर त्याचा काय परिणाम होतो? राग कमी करण्यासाठी काय करता येते? काही क्षण मी डोळे मिटून स्वस्थ बसले आणि या सगळ्या प्रश्नांचा विचार करू लागले.
राग आणि वाक्प्रचार
आपल्या भाषेतही मनात निर्माण होणाऱ्या रागाचे वर्णन करण्यासाठी किती शब्दप्रयोग, वाक्प्रचार वापरले जातात? कुणी म्हणते, ‘माझी नुसती चीड चीड झाली’, कुणी म्हणते, ‘नुसता राग राग झाला’ किंवा ‘संतापाने अंगाची लाही लाही झाली. कुणाच्या तळपायची आग मस्तकाला जाते. रागाची तीव्रताही भिन्न भिन्न. पटकन शांत होणारा राग, दिवसभर चालणारी चीडचीड किंवा वर्षानुवर्षे मनात साठवून ठेवलेला राग. आपले शरीरही राग आला की ते वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून देते. हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छवास जोरजोरात चालतो, डोळे लाल भडक होतात. रागाच्या भरात कोणी वस्तू फेकून देते, कोणी तोडफोड करते, कोणी दुसऱ्यावर हात उगारते किंवा कधी कधी त्याहून गंभीर अशी हिंसा
हातून घडते.
अॅमॅग्डालाची भूमिका
राग ही आपल्या मनात निर्माण होणारी एक भावना आहे. मेंदूतील एक छोटासा बदामाच्या आकाराचा भाग (amygdala) आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करतो. तो भोवतालची परिस्थिती धोकादायक आहे का, हे पाहतो. परिस्थिती थोडीशी जारी धोकादायक आहे असे जाणवले तरी amygdala उद्दीपित होतो आणि आपल्या रक्षणासाठी मनात राग निर्माण करतो. रागाच्या भरात आपले वागणे कसे नियंत्रित करणार? रागाच्या भरात आपल्या हातून नको ते काहीही घडू शकते. मेंदूतील सर्वात पुढचा मोठ्या मेंदूचा भाग (prefrontal cortex) यांच्यामध्ये Amygdala चेतातंतू दुवा निर्माण करतात. त्या आधारे आलेला राग लक्षात घेऊन prefrontal cortex आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते आणि सर्वसाधारणपणे रागाच्या भरात आपल्या हातून काही वेडेवाकडे होऊ देत नाही.
मेंदूतील रसायने
मेंदूतील काही रसायनांचे प्रमाण राग आला की वाढते. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढते, श्वास जोरजोरात सुरू होतो. आवाज चढतो, काही जणांना घाम फुटतो, बेचैनी वाढते. राग ही भावना आपल्या मनात विविध वेळेस निर्माण होते. आपल्या अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही की राग येतो. ‘माझी माझ्या मुलाकडून इतकीच अपेक्षा आहे की त्याने दिवसात निदान २-३ तास सलग एक जागी बसून अभ्यास करावा. तेवढेही जमू नये का त्याला? सगळ्या सोयी सुविधा आहेत, खेळायला सुद्धा जातो रोज, म्हणेल ती मागणी पुरवते मी, तरी अभ्यासाच्या नावे शंख! राग येणार नाही तर काय होईल? बरे, हुशारही आहे. मग त्याने चांगले मार्क मिळवावे अशी मी अपेक्षा केली तर काय चुकले?’ विराजची आई चिडून म्हणत होती.
हे ही वाचा… What is Decidophobia: तुम्हाला काही ठरवताच येत नाहीये? गोंधळ उडतोय? वाचा काय आहे ‘डिसायडोफोबिया’?
अविवेकी विचार
‘मला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले होते ७ दिवस, एकदाही फिरकला नाहीस तू! ही कसली मैत्री? मी मात्र तू आजारी असताना तुझ्या घरी येऊन भेटून गेलो, धीर दिला, अनेकदा फोन केला. तू मात्र..’ समीरचा राग अनावर झाला होता. असा हा अपेक्षाभंग! ‘माझ्यावर कायम सतत अन्यायच होत आला आहे. कधी माझ्या कष्टणची कदरच केली जात नाही. मग मी का चांगले काम करायचे?’ प्रशांतच्या मनात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना नेहमी असे आणि मग तो सतत रागावलेला असे. जग वाईट आहे, कारण मला मुद्दाम सगळे त्रास देतात, माझ्यावर अन्याय करतात असे अविवेकी (irrational) विचार मनात आले की चीड येते. एखाद्याचा स्वभाव असा असतो की त्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला नियंत्रित करता यावी असे वाटते. मग ते घरात कुठे काय ठेवायचे हे असो किंवा सुट्टीसाठी बाहेरगावी कुठे जायचे हे असो, आपले म्हणणे बरोबर आहे आणि त्यामुळे इतरांनी ते मान्य केले पाहिजे असे त्यांना वाटते. हे लोक स्वतःला परफेक्ट समजतात, वेळेच्या आधी सर्वत्र पोहोचतात, कामे वेळच्यावेळी झाली पाहिजेत असा त्यांचा कडक नियम असतो. त्यांच्या या सगळ्या अपेक्षा केवळ स्वतःकडून नसतात तर त्या इतरांकडूनही असतात. यातून संघर्ष निर्माण होतो आणि त्यांना राग येत राहतो. प्रसन्नचे वडील अचानक गेले. अचानक सगळी जबाबदारी त्याला घ्यावी लागली. आई, धाकटी बहीण यांचे दुःख दूर केले पाहिजे, त्यासाठी आपण नेहमीच हसतमुख राहिले पाहिजे असे काहीसे त्याला वाटू लागले. पण त्याच्या मनातले दुःख तसेच राहिले. त्याला वाटच नाही मिळाली. त्यातून सगळ्या परिस्थितीचा त्याला सारखा राग राग येऊ लागला. मन मोकळे करण्याची संधीच नाही मिळाली. रागाचे एक स्वरूप म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. उदा. न जेवणे, अबोला धरणे आणि त्यातून समोरच्याचा अंत पाहणे आणि तीच त्याला शिक्षा करणे! रागाच्या अशा अप्रत्यक्ष हल्ल्यामुळे समोरचा माणूस भांबावून जातो, दुःखी होतो.
समाजातील संताप वाढतोय?
आज समाजात राग संताप याचे प्रमाण वाढत चालले आहे का अशी शंका येते. समाजातले वाढलेले संघर्ष उदा. आर्थिक विवंचना, कामाचा ताण, वेगवेगळ्या माध्यमांमधून सतत होणारा खून, दंगली, युद्ध, दहशतवाद, गटांगटातील
भांडणे या संगळ्यातून राग या भावनेला पुष्टी मिळते, समाजही आपल्या गरजा व्यक्त करण्याचा, मत मांडण्याचा ‘राग’ हाच मार्ग आहे असे मानायला लागतो. समाजाची नैतिक मूल्ये बदलायला लागली आहेत का असा प्रश्न मनात येतो. परस्परांविषयी आदर, नम्रता, एकमेकांविषयी आपुलकीची भावना, सामूहिकता आणि सामुहिकतेचा सकारात्मक उपयोग, निसर्ग-देव-किंवा आणखी काही असे श्रद्धास्थान असणे असे लहानपणापासून घरात, शाळेत आणि समाजात जे संस्कार होत ते कमी पडताहेत की काय असे वाटू लागते.
सोशल मीडियाच्या आहारी
आबालवृद्ध आज सोशलमीडियाच्या आहारी गेलेले दिसतात. मोबाइल गेम्स पासून वेगवेगळ्या बातम्या, रील्स, व्हिडियो या सगळ्यांतून व्यक्त होणारा संताप आपले मनही व्यापून टाकतो. अशा या रागाचे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. सतत राग म्हणजे ब्लड प्रेशर वाढत राहणे, त्यातून हृदयरोगाचा धोका वाढणे. शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते आणि त्यामुळे विविध आजार सहजपणे होतात. म्हणजे सध्या तापापासून कन्सरपर्यंत! रागाचा आपल्या मनःस्थितीवरही परिणाम होतो. सतत रागातून, कशातच समाधान राहात नाही, निराशा येते, आपल्यावर सतत अन्याय होतोय असे वाटत राहिले तर आपल्याला काही किंमतच नाही असे वाटू लागते. डिप्रेशन येते. याचप्रमाणे डिप्रेशनचे एक लक्षण म्हणजे सतत चीडचीड आणि राग. मानसिक विकारांमध्ये राग येणे हे एक प्रमुख लक्षण आढळून येते.
हे ही वाचा… Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
स्मृतिभ्रंश आणि गोंधळ व राग
स्किजोफ्रेनियाच्या आजारात मनात अनेक पक्के विचार असतात. उदा. लोक माझ्या विरुद्ध आहेत, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, लोक माझ्याविषयी बोलत असतात. रुग्णाला वेगवेगळे भास होतात. कानात येणारे आवाज
त्याच्यावर टीका करतात, त्याला शिवीगाळ करतात. अशा लक्षणांमुळे रुग्णाला खूप राग येतो, तो आक्रमक होऊ शकतो. वृद्धापकाळी स्मृतिभ्रंशाच्या (dementia) आजारात रुग्णाला वाढत्या विसराळूपणामुळे राग येतो. तसेच आजूबाजूला काय चालले आहे ही कळले नाही, भोवतीच्या माणसांना ओळखता आले नाही, अनोळखी ठिकाणी नेले तर गोंधळायला होते आणि मग राग येऊ लागतो. लहान मुले आपल्या मनातला उदासपणा रागातून व्यक्त करतात. आपल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत तर मुले रागावतात आणि त्यांच्या वर्तणूकीतून ते व्यक्त होते.
रागावर नियंत्रण मिळवता येते का?
आपण रागवायला कधीतरी लहानपणी शिकतो. कधी आपल्या घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांच्या वागण्यातून, कधी शिक्षकांच्या वागण्यातून, कधी आपल्यावर एखाद्याने केलेला अन्याय सहन करण्यातून आपण राग ही भावना शिकायला लागतो. तर कधी समाजात वावरताना असं आपण शिकतो की बलाचा, हिंसेचा म्हणजेच संतापाचा वापर केला की आपल्याला हवे ते मिळते. त्यामुळे राग कमी करायचा म्हणजे चुकीचे शिकलो आहोत ते विसरून नवीन आणि चांगले उपाय शिकायचे- प्रश्न सोडवण्याचे, भावना व्यक्त करण्याचे, परिस्थितीला तोंड देण्याचे. राग नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये जाणीवपूर्वक बदल घडवावे लागतात. मनाचा निश्चय महत्त्वाचा. त्यासाठी आवश्यक ती मदत घेणेही गरजेचे. समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला जरूर घ्यावा. कोण्या मानसिक विकारांमुळे रागाचे प्रमाण वाढलेले नाही ना हे पाहण्यासाठी मनोविकारतज्ज्ञाला सुद्धा गरज पडल्यास दाखवावे.
रागाचे मोजमाप
आपल्याला येणाऱ्या रागाचे मोजमाप करायला राग दैनंदिनी उपयोगी पडते. सर्वात प्रथम आपल्याला राग कोणत्या परिस्थितीत येतो हे पहावे लागते. त्यासाठी एका रोजनिशीत आपल्याया कधी, कशामुळे राग आला त्याची नोंद ठेवावी. तसेच तेव्हा मनात काय काय भावना होत्या, कोणकोणते विचार होते ते ही लिहावे. काही गोष्टींचा सराव केल्याने सुरुवातीलाच राग कमी करता येतो. राग यायला सुरुवात झाली की काही कृती कराव्यात. संपूर्ण शरीर शिथील करण्याची क्रिया शिकून घ्यावी. १५-२० मिनिटे वेळ स्वःताला शिथिल करून शांत करायला द्यावा. दीर्घ आणि खोल श्वसन सुरू करावे. १ ते ४ आकडे मनात म्हणत पोट, छाती आणि खांद्यापर्यंत छाती फुगवून श्वास घ्यावा आणि १ ते ८ आकडे होईपर्यंत हळू हळू सोडवा. मेंदूतील उद्दीपित करणारी रसायने यामुळे उद्दीपित होत नाहीत.
रागाची तीव्रता
अनेक वेळ राग यायला लागला की, त्या ठिकाणाहून दूर गेले की रागाची तीव्रता कमी व्हायला मदत होते. आपल्या विचारांच्या पद्धतीत, विचारांच्या दिशेत बदल केला की राग कमी वेळा येतो किंवा तो येणारच नाही. वास्तव परिस्थितीचे भान ठेवले की मनातले अनेक अविवेकी विचार दूर होतात. उदा. मित्र हॉस्पिटलमध्ये भेटायला आला नाही त्यामागचे कारण समजून घेतेले तर, तो मुद्दाम आपल्याशी असे वागला असे वाटत नाही. “नेहमीच असेच घडले पाहिजे ‘ किंवा ‘असे घडणे शक्यच नाही” अशा प्रकारे केवळ सर्व काही काळे किंवा पांढरे (black and white) असा विचार केला की गडबड होते. विविध प्रकारे एका गोष्टीचा विचार करता येतो, एकाच प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो अशी लवचिकता विचारात आणावी लागते. आपल्याला एकट्यालाच राग नियंत्रणाखाली आणता येईल असे नाही. त्यासाठी आपल्या कुटुंबातल्या कोणाची तरी किंवा एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांची मदत अवश्य घ्यावी. राग आल्यावरचे आपले वागणे, इतरांची विचार करण्याची पद्धत या विषयी ते आपल्याशी चर्चा करू शकतात. आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले असल्याची ग्वाही देऊन प्रोत्साहित करू शकतात. थोडक्यात काय तर रागावर नियंत्रण म्हणजे आनंदाकडे, समाधानाकडे आणि मनःस्वास्थ्याकडे वाटचाल!