‘कंबरदुखी: भौतिक उपचार आणि प्रतिबंध’ (लो बॅक पेन: रोल ऑफ फिजिओथेरेपी इन मॅनेजमेंट अँड प्रिव्हेंशन), अशी यावर्षी ८ सप्टेंबरला येत असलेल्या जागतिक भौतिक उपचार दिनाची मुख्य संकल्पना आहे. या औचित्याने वर्ल्ड कॉन्फडरेशन ऑफ फिजिओथेरपीने (डब्ल्यूसीपीटी) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करणे (पेशंट एड्युकेशन) या उपायाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. या आणि इथून पुढील लेखांमध्ये आपण कंबरदुखीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
जागतिक आकडेवारी
वर्ल्ड कॉन्फडरेशन ऑफ फिजिओथेरपी (डब्ल्यूसीपीटी) नुसार, २०२० मध्ये जगभरात ६१९ दशलक्ष लोकांना कंबरदुखीचा त्रास होता, ही संख्या १९९० मध्ये कंबरदुखीचा त्रास असणार्यांपेक्षा ६०% अधिक होती. २०५० पर्यंत साधारणपणे जगभरात कंबरदुखीचा त्रास असणार्या लोकांची संख्या ८४३ दशलक्ष असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शारीरिक अक्षमता निर्माण करणार्या आणि जगण्याची गुणवत्ता कमी करणार्या आजारांच्या वर्गवारीत कंबरदुखी पहिल्या स्थानावर आहे.
कंबरदुखी हा सार्वत्रिक आढळणारा आजार
प्रत्येक १३ व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कंबरदुखीचा त्रास होतो. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. कंबरदुखी तीन महिन्यांपेक्षा जास्त राहिली तर त्याला क्रोनिक लो बॅक पेन असं म्हणतात. बहुतेकवेळा कंबरदुखी ही कुठल्या एका ठोस कारणाने होणारी नसते. यालाच नोन-स्पेसिफिक (non-specific) लो बॅक पेन म्हणतात. ९० % लो बॅक पेन या वर्गात मोडतात. कंबरेच्या मणक्यांमध्ये वेगवेगळे भाग असतात जसं की दोन मणक्यांना जोडणारी गादी, आजूबाजूचे स्नायू, लिगामेंट्स, जॉइनट्स. यापैकी एका किंवा अनेक भागाच्या कार्यात किंवा रचनेत बिघाड झाल्याने कंबरदुखी होऊ शकते. गरज असल्यास एक्स-रे, एमआरआय, किंवा सीटी स्कॅनयाद्वारे याचं निदान केलं जातं. यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, काही वेळा एक्स-रे, एमआरआय, किंवा सीटी स्कॅन यावर काही बदल दिसत असले तरी ही रूग्णाला त्या प्रमाणात लक्षणं असतीलच असं नाही. बरेच वेळा रुग्णाचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण तरीही कंबरदुखीचा त्रास असतो. याचं कारण म्हणजे कंबरदुखी फक्त शारीरिक कारणांमुळेच होते असं नाही, यात रुग्णाच्या भावनिक, मानसिक घटकांचं आणि जीवनशैलीचं मोठं योगदान असतं.
कंबरदुखीसाठी ओरथोपेडिक डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टला कधी भेटावं?
बहुतेकवेळा सौम्य ते मध्यम स्वरूपाची कंबरदुखी ही कोणत्याही विशिष्ट उपायांशिवाय बरी होते. पण काही वेळा तसं होत नाही, आपल्याला आता डॉक्टरकडे किंवा फिजिओथेरपिस्टकडे जाण्याची गरज आहे हे पुढील दोन निकषांवर ठरवता येऊ शकतं.
- २-३ आठवड्यांपासून असणारी, वाढत जाणारी आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळा आणणारी कंबरदुखी
- दैनंदिन कामांमध्ये अडथळा न आणणारी पण ६ आठवड्यांपासून जशीच्या तशी असणारी कंबरदुखी
कंबरदुखीचे गंभीर स्वरूप
काही रुग्णांमध्ये कंबरदुखी गंभीर स्वरूपाची असू शकते, पुढील लक्षणं ही गंभीर स्वरूपाच्या पाठदुखीमध्ये जाणवू शकतात, यापैकी एक किंवा अनेक लक्षणं असल्यास लवकरात लवकर ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटणं आवश्यक असतं, ज्यामुळे त्वरित निदान आणि उपचार सुरू होऊ शकतात.
- पडल्यामुळे किंवा अपघातांनंतर होणारी तीव्र कंबरदुखी
- शौचास किंवा मूत्र विसर्गास त्रास होणं किंवा या संवेदना न जाणवणं
- एका किंवा दोन्ही पायातील संवेदना कमी होणं, पायात शक्ती नसणं, पायाला वारंवार मुंग्या येणं, पाय सुन्न पडणं.
- सततच्या कंबरदुखीबरोबर ताप येणं
- ५० किंवा जास्त वय असणार्या आणि कॅन्सर किंवा कुठल्याही आजारातून बरं झालेल्या व्यक्ती ज्यांना कुठल्याही कारणाशिवाय अचानक कंबरदुखीचा त्रास सुरू झालेला आहे.
वर दिलेल्या बाबी आपण समजून घेतल्या आणि आपल्या कंबरेच्या वेदनेकडे जागरूकतेने बघितलं तर निश्चितच आपल्या मनातली कंबरदुखीविषयी असलेली चिंता कमी होईल, आपल्याला असलेल्या वेदनेची तीव्रता समजून घेता येईल आणि गरज असल्यास त्वरित फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. यापुढील लेखात बघूया कंबरदुखी: गैरसमज आणि तथ्य.
Reference for statistics: World Confederation of Physiotherapy (Information sheet WPTD2024-InfoSheet1-A4-final)