डॉ. वैभवी वाळिम्बे
Health Speial : मॅडम, अजूनही गुडघ्याखाली पाय आहे असं वाटतं आणि तो पाय दुखतोही, असं कसं? नक्की काय होतंय मला? आधीच पाय गमावून बसलोय, आता हे असं वाटण हा काय प्रकार आहे? मला अजून काही झालयं का? भीती वाटतेय… फिजिओथेरपी राऊंड घेत असताना ऑर्थोपेडीक वॉर्ड मध्ये असलेल्या, अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुडघ्या खालचा पाय काढण्यात आलेल्या काकांचा प्रश्न!

काका, अजूनही तिथे पाय आहे असं वाटणं किंवा नसणारा पाय दुखणं हे स्वाभाविक आहे, इतकी वर्षे शरीराचा भाग असलेला अवयव आता नाही, हे समजून घ्यायला आणि जुळवून घ्यायला आपल्याला मेंदूला थोडा वेळ द्यावा लागेल. याचा अर्थ तुम्हाला भास होताहेत किंवा तुम्हाला दुसरा काही आजार आहे असं नाही. दीर्घकाळ चालणारं आणि बरं न होणारं इन्फेक्शन, अपघातात हाडं आणि स्नायू यांचं भरून न निघण्यासारखं झालेलं नुकसान, डायबिटीससारख्या आजारात पायाला झालेली आणि भरून न निघणारी जखम, गँगरीन या किंवा यासारख्या कारणांमुळे डॉक्टरना अॅम्प्युटेशनचा निर्णय घ्यावा लागतो. अॅम्प्यूटेशन म्हणजे शरीराच्या एखाद्या भागाचं शस्त्रक्रियेद्वारे केला जाणारं विच्छेदन.

आणखी वाचा-Health Special: उष्माघात टाळण्यासाठी आहारात काय वापराल?

वैद्यकीयदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या हा निर्णय आणि शस्त्रक्रिया जितकी महत्वाची आणि आव्हानात्मक तितकीच रुग्णासाठीही भावनिक, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक पातळ्यांवर आव्हान देणारी असते! यात फिजिओथेरपीचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचं पुनर्वसन करणं हे सर्वाधिक महत्वाचं काम फिजिओथेरपिस्ट करतात, अॅम्प्युटेशन नंतरची फिजिओथेरपी यात सगळ्यात पहिली पायरी म्हणजे रुग्णाशी संवाद

रुग्णाशी संवाद

अॅम्प्यूटेशन झालेले रुग्ण हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात, आपण आपल्या शरीराचा एक भाग गमावला आहे हे स्वीकारणं त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अवघड जातं. आता आपण आपलं आयुष्य पूर्ववत जगू शकणार नाही, याची खूप मोठी खंत असते. आता आपल्याला कायमच इतरांवर अवलंबून राहावं लागेल का, याची काळजी वाटत असते. अशा वेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पुनर्वसनाचं महत्व आणि पद्धत समजावून सांगितली जाते.

आणखी वाचा-Health Special: उन्हाळ्यात भरपूर पाणी पि‌ऊनही मलावरोध का होतो?

स्टम्प केअर

स्टम्प म्हणजे विच्छेदन केलेल्या अवयवाचा राहिलेला भाग. हा भाग अतिशय संवेदनशील असतो. त्यावरच बँडेजिंग एकसारखं असावं लागतं, कुठल्याही एका ठिकाणी जास्त दाब येऊन चालत नाही, हे ड्रेसिंग वेळेच्या वेळी बदलणं, स्टम्प व्यवस्थित कोरडा आहे की नाही, त्यावर सूज येते आहे का, इन्फेक्शनची चिन्ह दिसताहेत का याची पाहणी करावी लागते.

स्ट्रेन्थ वाढवणारे व्यायाम

याचवेळी शरीराच्या दुसऱ्या बाजूच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम सुरू करावे लागतात. कारण आता शरीराचा भार हा मुख्यत्त्वे या बाजूवर येणार असतो. जिथे पायाच्या एखाद्या भागाचं विच्छेदन झालं आहे, तिथे हातांच्या स्नायूंचे व्यायाम करवून घेतले जातात. कारण पुढच्या बऱ्याच काळासाठी रुग्णाला वॉकर घेऊन चालायचं असतं.

रेसीड्यूअल लिम्ब केअर

रेसीडयूअल लिम्ब म्हणजे विच्छेदनानंतर राहिलेला अवयव, या अवयवाची योग्य प्रमाणात हालचाल सुरू केली जाते, कूस बदलताना, उठून बसताना, हा अवयव कसा वापरायचा हे शिकवलं जातं, हळू हळू या अवयावतील स्नायूंचे व्यायाम सुरू केले जातात. हे स्नायू पूर्णप्रकारे सशक्त केले जातात कारण त्यायोगे रुग्णाला भविष्यात वापराव्या लागणाऱ्या कृत्रिम अवयवाशी (प्रोस्थेसिस) जुळवून घेणं आणि हालचाल करण सोपं होतं. याचवेळी विचारपूर्वक स्टम्प कंडिशनिंग सुरू केलं जातं, यात रुग्णाला मऊ पृष्ठभागावर स्टम्प अलगद ठेवून त्यावर क्रमाक्रमाने वजन देण्यास शिकवलं जातं यामुळे जेव्हा कृत्रिम अवयव लावला जातो, तेव्हा रुग्णाला स्टम्पवर वजन देण्यास भीती वाटत नाही आणि वेदनाही होत नाहीत.

आणखी वाचा-Health Special: कृत्रिम प्रोटीन शरीर नाकारतं, असं का होतं?

फँटम लिम्ब सेनसेशन आणि फँटम लिम्ब पेन

वर दिलेल्या उदाहरणात संगितल्याप्रमाणे रुग्णाला अस्वस्थ करणारी भावना, काढून टाकलेला अवयव अजूनही आहे असं वाटणं आणि नसलेला अवयव दुखणं हे होय. हे ऐकायला चमत्कारीक वाटलं तरीही रुग्णाला यातून जावंच लागतं. रुग्णांच्या मनात याविषयी भीती आणि काळजी वाटत राहते. त्यावेळी हे का होतं आहे हे त्यांना समजावून सांगितलं जातं आणि त्यावर काही वेदानाशमक उपचार केले जातात.

तोल सांभाळण्यास चालना देणारे आणि कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम

विशेषतः पायांच्या अॅम्प्यूटेशन नंतर शरीरात झालेल्या बदलांसाहित शरीराचा तोल सांभाळण्याचं प्रशिक्षण देऊन तसा सराव करून घेतला जातो, हे नाही झालं तर वॉकर घेऊन चालतानासुद्धा रुग्ण तोल जाऊन पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे इतरत्र दुखापत होऊन पुनर्वसनात अडथळे निर्माण होतात.

वरच्या दिलेल्या सर्व पायऱ्या रुग्णाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या की, कृत्रिम अवयव बसवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी प्रोस्थेटिक तज्ज्ञांची मदत घेतली जाते. अर्थातच कृत्रिम अवयव बसवल्यावर नंतरही रुग्णाला पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी फिजिओथेरपीची मदत घेतली जाते.