प्रत्येक आईवडिलांच्या आपल्या मुलांनी कसे वागावे याच्या अनेक अपेक्षा असतात. मुले आपले ऐकतात की नाही यावर पालक आपले यश मोजतात. चारचौघांमध्ये आपल्या मुलाने/मुलीने व्यवस्थित वागावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते. मुले मात्र त्या त्या वेळेस त्यांना जसे वाटेल तसे वागत असतात. त्यांच्या दृष्टीने मोठ्या माणसांचे नियम, मापदंड हे महत्त्वाचे नसतात, तर त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना, त्यांची सोय या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. मुले सांगितलेले ऐकत नाहीत, लक्ष देत नाहीत, कधी आपल्या भावा-बहिणीला, मित्र- मैत्रिणीला मारतात, भांडतात, हट्ट करतात, आरडाओरडा करतात. मुले पदार्थ सांडतात, पुस्तक फाडतात, खेळणी मोडतात, काचेची वस्तू फोडतात. कधी मुद्दाम, कधी चुकून. पालकांना आशा सगळ्या प्रसंगांमध्ये आपल्या मुलाचे वागणे बदलले पाहिजे, सुधारले पाहिजे असे वाटते. असे ‘चुकीचे’ त्याने वागू नये यासाठी प्रत्येक आई वडील प्रयत्नशील असतात. आपली मुलगी ‘भांडकुदळ’, ‘मारकुटी’ अशी तर नाही ना होणार? आपला मुलगा असा ‘धांदरट’, ‘वेंधळा’ तर नाही ना होणार? या बरोबरच हट्टी, चिडकी, उद्धट अशी अनेकानेक विशेषणे आपण मुलांना लावून मोकळे होतो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे आपण विसरूनच जातो की एखाद्या प्रसंगी हट्टीपणाने वागणे म्हणजे तो मुलगा कायमचा ‘हट्टी’ होत नाही. एखादे वेळेस खेळणं मोडणारी आपली मुलगी नेहमीकरता वेंधळी होत नाही. त्या त्या वेळचे आपल्या मुलाचे/मुलीचे वागणे आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते, आपल्या बरोबर चूक या कल्पनांमध्ये बसणारे नसते. तसेच त्या मुलाच्या सुदृढपणे होणाऱ्या मनोसामाजिक विकासाच्या आड येणारे असते, पुढे जाऊन त्याच्या मनःस्वास्थ्याच्या दृष्टीनेही त्या त्या वेळेस योग्य प्रकारे वागण्यास आपल्या मुलाला मदत करणे ही एक पालक म्हणून आपली जबाबदारी ठरते.

हेही वाचा – Health Special : थंडीत हात चोळत बसू नका …व्यायाम करा!

त्या त्या वेळेस आपले मूल विशिष्ट पद्धतीने का वागते हे ही समजून घेतले पाहिजे. मुले ‘लिमिट’ बघतात! आपले आई वडील काय मर्यादेपर्यंत आपले वागणे सहन करतात, स्वीकारतात ते तपासून पाहत असतात. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वागणुकीतून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. अनोळखी जागा, अनोळखी माणसे, शाळा याविषयीची भीती व्यक्त करताना हट्ट करतात, आक्रस्ताळेपणा करतात. लहान भावंडाच्या जन्मानंतर मनात निर्माण होणारा मत्सर व्यक्त करताना चार वर्षांचे मूल परत सतत मांडीवर बसण्याचा हट्ट करू लागते, किंवा छोट्या छोट्या कारणावरून रडारड करते. दिवसभर घराबाहेर असलेली आई घरी आली की मुलगी हट्टाने तिला घर घर खेळायला लावते, किंवा सतत बडबड करून, प्रश्न विचारून भंडावून सोडते. माझी मैत्रीण म्हणायचीसुद्धा,’कपभर चहासुद्धा स्वस्थपणाने पिऊ देत नाही ही छकुली!’ बाबांच्या कामाच्या दोन कॉल्समध्ये त्यांना कोणाशीही बोलू न देता, त्यांचा चेहरा सारखा आपल्याकडे वळवून ‘ऐक ना, बघ ना’ असे म्हणणारा मुलगा आपल्या बाबांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या बाबांनी आपल्याला थोडा वेळ द्यावा अशी जणू मागणी करत असतो.

हल्ली घरात आई बाबा आणि मुलगी किंवा मुलगा असे त्रिकोणी कुटुंब पाहायला मिळते. आई बाबा सतत बिझी असतात. कधी कधी आजीआजोबांबरोबर किंवा जवळपास असतात. आपल्या मुलाभोवती मुख्यत्वेकरून मोठी माणसेच असतात. लहान मुलांबरोबर वावरण्याची संधीच मुलांना मिळत नाही. उगाच मुले मोठ्यांचे अनुकरण करू लागतात, त्याचप्रमाणे सतत मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्याचीही त्यांना सवय लागते. बऱ्याच वेळा हे टाळण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी उदा. नाच, बॅडमिंटन, चित्रकला, स्केटिंग इ. गुंतवले जाते. तेही शेवटी नियमबद्धच असते. मोकळेपणाने, मनाप्रमाणे इतर मुलांशी खेळायला, मिसळायला मिळणे हेही मुलांच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असते. मुले इतर मुलांकडून कसे वागायचे, इतरांशी कसे जुळवून घ्यायचे, एकत्र खेळताना सगळ्यांबरोबर खेळणे, वस्तू, पदार्थ वाटून कसे घ्यायचे, प्रसंगी आपल्या हक्कासाठी कसे झगडायचे आणि मैत्री कशी करायची अशी अनेक कौशल्ये आपोआप शिकतात. पालकांच्या सतत मागे लागत नाहीत.

हेही वाचा – विषाणुजन्य तापाच्या संसर्गातून बरे होऊनही तुमचा खोकला जात नाही का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

आईवडिलांना आपल्या मुलाचे स्वाभाविक कौतुक असते. त्याची प्रगती त्यांना सुखावते. कोणीही भेटले की ‘आपलं लाडकं गाणं म्हणून दाखव बरं!’ किंवा ‘आमचा प्रतीक आता सगळ्या गाड्या ओळखायला लागला! दाखव बरं काकांना!’ ‘मावशीला छान कविता म्हणून दाखव की तुला चॉकलेट घ्यायचे हा!’ सतत स्टेजवर आपली कला सादर करायला आपल्या मुलाला उभे केले तर त्यालाही कंटाळा येतो आणि मग एखादेवेळेस तोसुद्धा बंड पुकारतो. आयत्या वेळेस तोंडच उघडत नाही. झाली का पंचाईत! ‘एवढे सगळे येते, पण कोणासमोर करून दाखव म्हटले तर याच्या तोंडाला कुलूप!’ असेही आई वडील म्हणून मोकळे होतात! जणू काही पालकत्वाच्या परीक्षेत हेच नापास झालेत!

आपणही आदर्श पालकत्वाच्या स्पर्धेत उतरल्याप्रमाणे करतो. खरे तर असे आदर्श पालक म्हणजे तरी काय? कोणालाच सातत्याने ‘चांगले’ वागता येत नाही. पालकांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात चढउतार असतात. त्याचा त्यांच्या मुलांशी वागण्यावर स्वाभाविक परिणाम होतो. शिवाय त्यांची अशी स्वभाव वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे आखून दिल्याप्रमाणे मुलांशी वागणे शक्य नसते. पण आपल्या मुलाशी प्रेमाने वागणे नक्कीच शक्य असते. सर्वसाधारणपणे आपल्या वागणुकीत सातत्य टिकवून मुलांना योग्य अयोग्य काय हे दाखवून देणे शक्य असते. आपल्या मुलाच्या/मुलीच्या स्वाभाविक वर्तणुकीला आकार देत, योग्य वागण्याला प्रोत्साहन देत, अयोग्य वर्तणुकीला आळा घालत, अनेक संस्कार करत त्याला मोठे होताना पाहणे यात तर खरा आनंद आहे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what is positive parenting mmdc ssb
First published on: 15-02-2024 at 17:51 IST