आयुर्वेदशास्त्राने दिवास्वाप म्हणजेच दिवसा झोपण्याचा निषेध केला आहे. दिवसा झोपण्याचे अनेक दोष आयुर्वेदाने सांगितले आहेत. त्यातही विशेषेकरुन कफप्रकृती व्यक्ती, कफविकाराने ग्रस्त माणसे, स्थूल व्यक्ती यांनी दिवसा झोपू नये असे मार्गदर्शन केलेले आहे. असे असले तरी, ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये मात्र दिवसा झोपण्यास हरकत नाही,असे आयुर्वेदाचे सांगणे आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा संचय होत असताना, शरीरामध्ये निसर्गतः रुक्षत्व (कोरडेपणा) वाढत असताना व रात्र लहान असल्याने शरीराला पुरेशी झोप मिळत नसल्याने दिवसा झोपणे आरोग्यास हितकारक होते,असे मत अष्टाङ्गहृदयकार आचार्य वाग्भट यांनी मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Health special: मधुमेहींमध्ये उन्हाळ्यात रक्तातील साखर घटण्याचे कारण काय?

ग्रीष्मातल्या या उन्हाळ्यामध्ये रात्र छोटी असल्याने झोप पूर्ण होत नाही, त्यात पुन्हा वातावरणातला उष्मासुद्धा गाढ झोप येवू देत नाही. त्यामुळे ना सकाळी वेळेवर जाग येत, ना दिवसभर उत्साह राहात; परिणामी दिवसभराची कोणतीही कामे व्यवस्थित होत नाहीत व सतत थकवा वाटत राहतो. त्याचबरोबर मंद अग्नीमुळे व्यवस्थित अन्नही जात नाही, नीट पचतही नाही, ज्यामुळे शरीराला उर्जेची कमी भासते. उर्जेच्या अभावीसुद्धा शरीराला अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे शरीराला आरामाची गरज असते. यावर उपाय म्हणूनच या ऋतूमध्ये दिवसा झोपण्याचा सल्ला दिलेला आहे. याशिवाय ग्रीष्म ऋतूमधील वातावरणामुळे जसा निसर्ग रुक्ष-कोरडा होतो तसेच शरीरसुद्धा कोरडे होते. शरीरामधील हे रुक्षत्व कमी करण्यासाठीसुद्धा दिवसा झोपण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण दिवसा झोपल्याने स्वभावतः शरीरामध्ये कोरडेपणा कमी होऊन स्निग्धता वाढते. पावसाळा-थंडी या अन्य ऋतूंमध्ये शरीरामध्ये स्निग्धत्व वाढणे हे अनारोग्यकारक होऊ शकते. मात्र हेच स्निग्धत्व ग्रीष्म ऋतूमध्ये आरोग्यास उपकारक होते.

आणखी वाचा : Health special: मानसिक विकार नेमके कशामुळे होतात?

मथितार्थाने ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात दिवसा झोपणे हितकर आहे,हे वाचकांच्या लक्षात आले असेलच, त्यातही अशक्त, कृश व्यक्ती ज्या अशक्त आहेत किंवा थकवा व वजन कमी होणे अशी लक्षणे ज्यांच्यामध्ये दिसतात अशा आजाराने ग्रस्त व्यक्ती, लहान मुले, दिवसभर कष्ट-परिश्रम करणाऱ्या व्यक्ती, वाढत्या वयाची मुले, रात्री जागरण करणाऱ्या व्यक्ती आणि एकंदरच वात व पित्त प्रकृतीच्या मंडळींनी तारतम्याने दिवसा झोपावे. यामधील असे लोक ज्यांना भूक कमी लागते, अन्न नीट पचत नाही त्यांनी सुद्धा आपल्या भुकेचा व पचनाचा अंदाज घेऊन झोप घ्यावी, कारण दिवसा झोप घेतल्याने त्यांचा अग्नी अधिकच मंद होऊ शकतो. कसेही असले तरी स्थूल, वजनदार मंडळी, ज्यांचा अग्नी मंद आहे, विविध प्रकारच्या कफविकारांनी ग्रस्त असलेले आणि कफप्रकृतीच्या व्यक्ती यांनी मात्र कोणताही ऋतू असला तरी दिवसा झोपणे वर्ज्यच समजावे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special who should take a sleep in daytime in the month of summer hldc vp
First published on: 05-06-2023 at 18:47 IST