वर्षाचे जे सहा ऋतू असतात, त्या सहा ऋतूंपैकी प्रत्येक ऋतूमध्ये सभोवतालचे वातावरण भिन्न असते व त्याचा मानवाच्या आरोग्यावर निश्चितपणे परिणाम होतो. तर मग रक्तामधील साखरेवर,साखरेच्या चयापचयावर, इन्सुलिनवर व ग्लुकेगॉनवर वेगवेगळ्या ऋतूंचा परिणाम होईल काय? या विषयाची माहिती घेण्यासाठी जगभरामध्ये झालेल्या विविध संशोधनांचा आधार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Health special: वृद्धत्व व त्वचारोग

सकाळी उपाशीपोटी केलेल्या साखरेच्या तपासणीमध्ये संशोधकांना उन्हाळ्यात साखर कमी झालेली दिसली. रक्तामधील इन्सुलिनचे प्रमाण हिवाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यात घटलेले आढळले.लहान मुलांमध्ये दिसणार्‍या इन्सुलिन- अवलंबी (insulin-dependent) मधुमेहाच्या केसेस उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात व वसंत ऋतूमध्ये अधिक संख्येने दिसून आल्या, अर्थात उन्हाळ्यात कमी दिसल्या. त्सेन्ग या संशोधकाने मधुमेही रुग्णांवर केलेल्या संशोधनामध्ये रक्तामधील साखरेच्या पातळीची सात-आठ आठवड्यांची सरासरी दर्शविणार्‍या HbA1C या चाचणीचा आधार घेऊन सलग दोन वर्षे निरिक्षण केले असता असे लक्षात आले की, हिवाळ्यातल्या महिन्यांमध्ये या चाचणीचे आकडे अधिक आले, अर्थात हिवाळ्यात रक्तामधील साखर नियंत्रणात राहत नसल्याचे लक्षात आले आणि जसजशी थंडी कमी होत गेली तसतशी साखरेची रक्तामधील पातळी नियंत्रणात येऊन उन्हाळ्यामध्ये या चाचणीचे आकडे कमी झाले.

आणखी वाचा : Health special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात? कसे ओळखणार? 

ग्लुकेगॉन (glucagon) या अन्नाच्या अभावामध्ये स्वादुपिंडामधून स्त्रवणार्‍या संप्रेरकाचे रक्तामधील प्रमाणसुद्धा हिवाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यात कमी आढळले. उन्हाळ्यामध्ये हिवाळ्याप्रमाणे रात्री मोठ्या नसल्याने आणि हिवाळ्यासारखी वारंवार भूक लागत नसल्याने उन्हाळ्यात अन्नाची कमतरता शरीराला नसते. अन्नाची कमी नसल्यामुळे यकृत आणि स्नायुंमधील साखर काढून घेण्याची शरीराला गरज भासत नाही आणि साहजिकच त्यासाठी ग्लुकेगॉन हा संप्रेरक अधिक प्रमाणात तयार करण्याची आवश्यकता वाटत नाही.

आणखी वाचा : Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?

रक्तामधील साखर कमी-जास्त होण्यामागील महत्त्वाचे कारण भिन्नभिन्न ऋतूंमध्ये तापमानामध्ये होणारा फरक हे असावे,अशी शंका आहे. तापमान अधिक असताना रक्तातील साखर नियंत्रणात राहते. साहजिकच हिवाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये साखर अधिक नियंत्रणात राहते. विशेष म्हणजे विविध ऋतूंमध्ये रक्तातील साखरेमध्ये व इन्सुलिनमध्ये दिसणारा बदल हा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक होतो,असेही लक्षात आले. उन्हाळ्यामध्ये रक्तामधील साखरेवर इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये नियंत्रण चांगले राहात असताना अति उष्णताजन्य त्रास व आजार मात्र स्वस्थ व्यक्तीच्या तुलनेमध्ये मधुमेहींना अधिक तीव्रतेने त्रास देतात. आणि स्वाभाविकरित्या तत्संबंधित उपचारासाठी हॉस्पिटलच्या आत्ययिक (इमर्जन्सी) विभागाला भेटी देण्याचे मधुमेही रुग्णांचे प्रमाण सुद्धा उन्हाळ्यामध्ये वाढते, हे सुद्धा ध्यानात घेतले पाहिजे.

ज्या-ज्या प्रदेशांमध्ये तापमान खूप वाढते त्या-त्या प्रदेशांमधील मधुमेही रुग्णांसमोर इन्शुलिनचे द्रावण सुस्थितिमध्ये राखणे हासुद्धा एक प्रश्न असतो. कारण दीर्घकाळ उष्ण वातावरणामध्ये ठेवलेल्या इन्शुलिनच्या वायल्स वा कार्ट्रिजेसमधील इन्शुलिनच्या गुणधर्मामध्ये व अपेक्षित कार्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी इन्शुलिन २ ते ८ अंश सेल्सियस (३६ ते ४६ अंश फॅरनहाईट) इतक्या कमी तापमानामध्ये ठेवणे आवश्यक असते. रक्तामधील साखरेबाबत उन्हाळ्यासंबंधित अजूनही एक वेगळे निरिक्षण आहे, जे केवळ आपल्याला लागू होते, म्हणून सांगितले पाहिजे. ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये होणारी आंब्यांची उपलब्धता. आंबा हा एप्रिल-मे हे दोन महिने मर्यादित काळासाठीच उपलब्ध असल्याने मधुमेही रुग्णांना सुद्धा आंबा खाण्याचा मोह आवरत नाही व त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी केलेल्या रक्त तपासणीमध्ये बहुतेक मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर वाढलेली मिळते.अर्थात त्यामागे ऋतूजन्य वातावरणाचा बदल हे कारण निश्चितच नाही!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why sugar level in blood drops in the months of summer hldc diabetic vp
First published on: 04-06-2023 at 17:38 IST