Blood Sugar Control Tips: डायबिटीजच्या रूग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज साखरेची पातळी तपासल्याने शरीर कशी प्रतिक्रिया देत आहे हे समजण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी सकाळी उपाशीपोटी आणि जेवणानंतर वेगवेगळी असते. सकाळी उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी ८० ते १००च्या दरम्यान असणे सामान्य मानले जाते. तर जेवणानंतर २ तासांनी साखरेची पातळी १४० ते १५० mg/dl असणे सामान्य मानले जाते. मात्र जेव्हा ही पातळी ३५० mg/dlच्या वर जाते, तेव्हा ते एका गंभीर धोक्याचे लक्षण असू शकते. साखरेची पातळी ३५० mg/dlच्या वर जाणे ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवावे.
डायबिटीज प्रशिक्षक आणि फिटनेस तज्ज्ञ डॉ. अनुपम घोष यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, जर तुमच्या रक्तातील साखर ३५० mg/dl असेल, तर,तुम्ही ताबडतोब तुमच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. काही सुपरफूड्सचे सेवन केल्याने रक्तातील साखर सहजपणे नियंत्रित करता येते. तज्ज्ञांच्या मते, डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाणे खूप प्रभावी आहे. काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी सामान्य होण्यास मदत होते. तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की ३५० mg/dl पर्यंतची रक्तातील साखर शरीराला कशाप्रकारे नुकसान करू शकते आणि ती कशी नियंत्रित करावी…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने वारंवार लघवीला जावे लागते, त्यामुळे डिहायड्रेशन आणि अशक्तपणा येऊ शकतो. दीर्घकाळ रक्तातील साखर जास्त राहिल्यास किडनीवर दाब येऊ शकतो. त्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. रक्तातील साखरेच्या जास्त प्रमाणामुळे डोळ्यांतील नसांना इजा होऊ शकते, त्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते किंवा जाऊ शकते. अतिरिक्त साखरेमुळे नसांवर परिणाम होऊन हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, बधिरता किंवा वेदना होऊ शकतात. रक्तातील साखरेच्या उच्च प्रमाणामुळे शरीरातील आम्लाची पातळी देखील वाढू शकते. ही एक गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती असू शकते.
सावधगिरी बाळगावी…
जर तुम्हाला खूप तहान लागत असेल, वारंवार लघवीला जावे लागत असेल, दृष्टी अंधुक असेल, उलट्या होत असतील किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ताबडतोब सावध होऊन चांगल्या रूग्णालयात जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे.
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी कसा आहार घ्यावा?
पालक खा- डायबिटीज नियंत्रणासाठी पालक एक उत्कृष्ट सुपरफूड मानले जाते. त्यात कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध होतो. पालकाचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. त्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म दाह कमी करतात आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला पालक रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो, त्यामुळे शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
दालचिनीचे सेवन करा
दालचिनी डायबिटीज रूग्णांसाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय मानली जाते. त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. दालचिनीमधील सिनामलडीहाइड नावाचे संयुग इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि शरीरात ग्लुकोजचा चांगला वापर सुनिश्चित करते. ते ग्लुकोजचे शोषण मंद करून जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यापासून रोखते. नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
रोज एक सफरचंद खा
डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंदात फायबर पेक्टिन भरपूर प्रमाणात असते, ते पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील साखर हळूहळू वाढण्यास मदत करते. सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेत अचानक होणारी वाढ रोखली जाते. सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात. सफरचंद गोड खाण्याची इच्छा देखील कमी करतात. त्यामुळे अति खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रणात राहते.
कारले खा
कारलं डायबिटीज रूग्णांसाठी एक अत्यंत फायदेशीर भाजी मानली जाते. त्यात डायबिटीज विरोधी गुणधर्म आहेत. ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कारल्यातील घटक इन्सुलिनप्रमाणे कार्य करतात आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करतात. नियमित सेवनाने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. तुम्ही कारल्याचे सेवन भाजी किंवा रस घेऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्यामुळे एकूण आरोग्य सुधारते.
हळद
हळद ही एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ती डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करते असे मानले जाते. त्यातील कर्क्यूमिनमध्ये दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ते इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. हळद शरीरातील ग्लुकोजचे शोषण सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते. तिच्या नियमित सेवनाने दाह कमी होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. तिचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ती दूध, भाज्या किंवा पाण्यात मिसळून सेवन करू शकता.
