Healthy Foods for Liver: शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृताचे महत्त्व खूप आहे. यकृत डिटॉक्सिफाय करते आणि शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करते. शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी यकृताचे योगदान मोठे असते आणि म्हणून यकृत सक्षम ठेवणे, त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. हार्मोन्सचे नियमन करणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, केटोन्स तयार करणे व पचनास मदत करणे हे त्याचे कार्य आहे. म्हणूनच शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अयोग्य आहार, जास्त प्रमाणात मद्यपान व आनुवंशिक कारणांमुळे यकृताच्या समस्या वाढू शकतात. आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करून आपण आपल्या यकृताच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. यकृत निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी, आपण नेहमी योग्य तो आहार निवडणे महत्त्वाचे आहे. शिळे आणि खराब झालेले अन्न खाल्ल्याने यकृत खराब होऊ शकते. डाएट क्लिनिक जसलीन कौर यांनी यकृत निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा याविषयी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

यकृत चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार

लिंबूवर्गीय फळे

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली, द्राक्षे, संत्री व लिंबू यांसारख्या फळांमध्ये यकृत स्वच्छ करण्याची नैसर्गिक क्षमता असते. ती एंजाइम्स वाढवतात; जे शरीरातून कार्सिनोजेन आणि इतर विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

लसूण

लसूण सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध आहे; जे यकृतातील विषाक्त घटक बाहेर टाकतात. रोज एका लसूण पाकळीचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.

(हे ही वाचा : झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट )

ब्रोकोली

हे आहारातील तंतू, पॅन्टोथेनिक अॅसिड, व्हिटॅमिन A, B1, B6 व E, मँगनीज, फॉस्फरस, कोलीन, पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, प्रथिने, जस्त, कॅल्शियम, लोह, नियासिन व सेलेनियम यांनी समृद्ध आहे. ब्रोकोली, कोबी व फ्लॉवर यांसारख्या क्रूसिफेरस भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच; पण या भाज्या यकृतदेखील निरोगी ठेवतात. या भाज्यांचे सेवन केल्याने यकृत डिटॉक्स करते.

कॉफी

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज दोन कप कॉफी प्यायल्याने यकृताचा आजार असलेल्या लोकांमध्ये यकृताचा सिऱ्होसिस आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासानुसार यकृत सिऱ्होसिसची शक्यता ४४ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

काजू

ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा समृद्ध स्रोत असलेले नट्स यकृत साफ करण्यास मदत करतात. तथापि, गिळण्यापूर्वी काजू तोंडात बारीक होईपर्यंत चघळणे महत्त्वाचे आहे.

सफरचंद

सफरचंदामध्ये पेक्टन हा घटक भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत मिळते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलच्या वापराने यकृतातील चरबीची पातळी कमी करण्यास, रक्तप्रवाह वाढविण्यास आणि यकृतातील एन्झाइम्सची पातळी सुधारण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या

दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम व मँगनीज असतात. ती शरीरातून विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास आणि यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.