Healthy Indian Breakfast options like Jwarichi Ukad provide instant energy and aid digestion: सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी अनेकजण नाश्त्याला ब्रेड, बटर किंवा मैद्याचे पदार्थ खातात. पण, हे पदार्थ शरीरातील चरबी वाढवून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करतात. अशावेळी ‘दोन मिनिटांत’ तयार होणारा आणि शरीराला ऊर्जा देणारा अस्सल भारतीय पर्याय तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे.

पोटात मैदा आणि विकारांना आमंत्रण

सध्या आपल्याकडे शहरीकरण वाढतेच आहे. आणि शहरातील मंडळींना काम अधिक असते किंवा वेळेत कामावर जायचे असते आणि घरी परतल्यानंतर त्यांना फार काही करण्यासाठी वेळ हाताशी नसतो, अशी तक्रार नेहमीच ऐकायला मिळते. म्हणूनच मग अनेकदा सकाळच्या न्याहारीसाठी अर्थात ब्रेकफास्टसाठी म्हणून ब्रेड बटर, जाम बटर, खारी किंवा मग टोस्टचा वापर केला जातो. शरीरात मैदा जाणे हे केव्हाही वाईटच. आणि तसे झाले की, मग शरीरातील चरबी वाढते आणि पाठोपाठ मग आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात.

शहरवासीयांची अगतिकता

शहरवासीयांची आणखी एक दुसरी अगतिकता म्हणजे त्यांना अनेकदा फरसाण, चिवडा, चकली किंवा मग बेकरीचे विविध पदार्थ मग त्यात कुकीजपासून ते अगदी पाव आणि ब्रेड किंवा मग बिस्किटांवर गुजराण करावी लागते. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये तर वडापाव आणि सँडविच हे नित्यनेमाने खाणे झाले आहे. या साऱ्या पदार्थांतूनही मैदाच मोठ्या प्रमाणावर पोटात जात असतो. मैदा तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडवतो. आणि मग पोटाचे विकार एकदा सुरू झाले की, ते माणसाची पाठ सोडत नाहीत. शहरवासीयांचे तर असे होते की औषधाने पोट बरे झाले की, परत दुसऱ्याच दिवशी परत मैदा पोटात जायला सुरुवात होते. आणि मग परत विकार बळावतात. अशा वेळेस नेमके काय करावे हे अनेकांना कळत नाही. म्हणून आजच्या या भागामध्ये आपल्याच स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आरोग्यदायी पदार्थ कसे करता येतील आणि ते कधी जेवणासाठी तर मग कधी न्याहारीसाठी म्हणून कसे वापरता येतील हे सांगणार आहे.

Indian Healthy Diet Jwarichi Ukad
पौष्टिक अशी ज्वारीची उकड (Photo- AI)

दोन मिनिटांतील बाजारू पदार्थ आणि विकारांना आमंत्रण

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडे एका बाजारू पदार्थाने गेल्या २०-२५ वर्षांमध्ये भारतातील घराघरात मूळ धरले आहे. केवळ दोन मिनिटांत तयार होणारा म्हणून त्याचे कोण कौतुकही होते. धक्कादायक म्हणजे याचे कौतुक पालकांकडून होते आणि आपल्या मुलाच्या खाण्यात पौष्टिकता नसलेली किंवा विकारांना आमंत्रण देणारी ही गोष्टी जाते आहे, याचे वैषम्यही वाटत नाही, तेव्हा खूपच वाईट वाटते. मग अशा वेळेस काही पालकांकडून मागणीही येते की, सांगा दोन मिनिटांत तयार होणारा आणि पौष्टिक असणारा अस्सल भारतीय पदार्थ. तसा असा पदार्थ कसा तयार कराल आणि तो कोणता आहे, याचीही माहिती या भागाअखेरीस दिलेली आहे.

तांदळाची पेज

अनेक विकारात विशेषत: दीर्घ मुदतीचा ताप, कावीळ, जलोदर, मलेरिया, रक्ती मूळव्याध, मोठे शस्त्रकर्म यानंतर काय खावे असा प्रश्न पडतो. अशा वेळेस क्रमाक्रमाने अग्नी संधुक्षण व्हावयास हवे असते. त्यामुळे हळूहळू शरीराचे गाडे ठिकाणावर येते. त्याकरिता कितीही अशक्तपणा आला असला तरी प्रथम सात दिवस तांदुळाची पातळ पेज खावी. चवीला जिरे, धने, आले, लसूण, ओवा, मीठ, कणभर गूळ असे पदार्थ वापरावे. पेज भरपूर खाता येते, गॅसेस होत नाहीत. रक्त वाढते, मांस सावकाश बनते. लघवी साफ होते. रात्री उत्तम झोप लागते. जेवण नकोसे वाटत नाही. आयुर्वेदाच्या रसशास्त्र या औषधी निर्माणात विविध धातूंची भस्मप्रक्रिया करण्याअगोदर, त्या त्या धातूंच्या सामान्य शुद्धीकरिता पेजेसारखी तांदुळाची कांजी वापरतात. त्यात फक्त तांदूळ हे एकमेव घटकद्रव्य असते.

तांदळाची धिरडी

लहान बालकांना घरचे अन्न रोजच वेगवेगळे काय द्यावे, हा प्रश्न पडतो. याकरिता तांदुळाची ताजी धिरडी हा उत्तम तोडगा आहे. घरी तांदूळ धुवावे. पंचावर वाळवावे. नंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये दळून घ्यावे. निर्लेप तव्यावर साधी धिरडी, गूळ व काकडी, कोथिंबीर, आले, मिरची अशी विविध प्रकारची धिरडी करावी. आपल्या बालबच्च्यांना ताजी द्याावी. पोट भरते, समाधान वाटते. पाव-बिस्किटांपेक्षा अधिक गुणवत्ता धिरड्यात आहे.

तांदळाची भाकरी

जुलाब, हगवण या विकारांत भल्याभल्यांची मती गुंग होते. त्याकरिता प्रथम एक दिवस पूर्ण लंघन करावे किंवा फक्त ताकावर राहावे. चांगला क्षुद्बोध झाला की, तांदूळ भाजून पातळ भात किंवा तांदुळाच्या पिठाची भाकरी खावी. तांदुळाच्या पिठाची भाकरी आमांश, मूळव्याध, स्थौल्य, रक्तदाबवृद्धी, भगंदर, कावीळ, जलोदर, आम्लपित्त, अल्सर, पोटदुखी या विकारांत अमृतासमान आहे. तांदुळाची भाकरी नेहमी ताजीच पाहिजे. या भाकरीसोबत चवीकरिता धने, जिरे व आले असे तुकडे मिसळावे. भाकरी ज्या मानाने खाऊ त्या मानाने शरीरात पक्काशयात निर्दोष मळ तयार होतो. या भाकरीबरोबर ताजे ताक, ताकाची आले, लसूण घातलेली कढी पाहिजे. ग्रहणीसारख्या विकारावर यासारखे अन्न नाही.

दोन मिनिटांत तयार होणारा अस्सल भारतीय पौष्टिक पदार्थ

मधुमेह, लठ्ठपणा, मूळव्यादा, भगंदर, सूज, रक्तदाबवृद्धी अशा विकारांत वैद्य मंडळी ज्वारीचा आग्रह धरतात. गहू, भात, बटाटा, रताळे, साबुदाणा, वाटाणा, हरभरा, मांसाहार, मिठाई, बेकार पदार्थ, पोहे, चुरमुरे इत्यादी पदार्थ वर्ज्य -कुपथ्य म्हणून सांगतात. पण रुग्णांनी खावे काय असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ज्वारीच्या उकडीत आहे.

ज्वारीची उकड कशी कराल?

पाणी उकळू द्यावे. त्यात थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे. ते पीठ चांगले शिजू द्यावे. मग त्यात थोडे ताजे ताक, आले व कढीलिंब पाने टाकावी. ही उकड थोडी शिजू द्याावी. नाष्टा, ब्रेकफास्ट याकरिता हा उत्तम पदार्थ आहे. रोज खाऊन कंटाळा येत नाही. रक्तशर्करा किंवा वजन वाढत नाही. पोटाला बोजा पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पदार्थ केवळ दोन मिनिटांत तयार होतो. एरवी बाजारात मिळणाऱ्या दोन मिनिटांत तयार होणाऱ्या बाजारू पदार्थाचा हा उत्तम पौष्टिक आणि अस्सल भारतीय असा पर्याय आहे. पालकांनी आपल्य मुलांसाठीच नव्हे तर अगदी स्वतःसाठीही हा पर्याय वापरून पाहावा, आरोग्य लाभेल.