सध्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या अनेक गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. पण, तुम्हाला भविष्यात निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर लहानपणापासूनच तुम्ही वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. पण, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करील; पण तुमच्या किचनमध्येही असे काही मसाल्याचे पदार्थ आहेत की, जे तुमच्या निरोगी आरोग्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतात. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना शरीरास फायदेशीर अशा किचनमधील मसाल्याच्या चार पदार्थांची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ त्याविषयी….
किचनमधील दालचिनी, आले, लसूण व मोहरी हे चार पदार्थ तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारण्यासह वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एका बूस्टर डोसप्रमाणे काम करतात.
दालचिनी
दालचिनी हा असा मसाल्यातील पदार्थ आहे; जो तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया वाढवण्यासह वजन कमी करण्यास मदत करतो. त्यातील औषधी गुणधर्मामुळे शतकानुशतके आहारात याचा समावेश केला गेला आहे. विशेष म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त मानली जाते. हाय ब्लड शुगरमुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते. पण, दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढविण्यासही मदत करते; ज्यामुळे तुमच्या पेशी ग्लुकोज चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि तुमच्या शरीरास ऊर्जा पुरवतात.
दालचिनीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म आहेत; जे शरीरात उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेस गती देतात. त्यामुळे विश्रांतीच्या वेळीही जास्त कॅलरीज जाळण्यास मदत होऊ शकते.
आले
आले हा मसाल्याचा पदार्थ आहारातील महत्त्वाचा भाग मानला जातो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून, आहारात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आले हे पचनक्रिया निरोगी ठेवून चयापचय वाढवते आणि पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते.
दालचिनीप्रमाणेच आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात. ते तुमच्या शरीराचे तापमान किंचित वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकते. त्यामुळे भुकेची भावना कमी होते; तसेच कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, रक्तदाब, दाहक प्रथिने व यकृताच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होतात.
लसूण
तिखट सुगंध आणि चव यांसाठी प्रसिद्ध असलेला लसूण हजारो वर्षांपासून पाक आणि औषधी दोन्ही हेतूंसाठी वापरला जात आहे. त्यात अॅलिसिन आहे हे एक संयुग आहे; जे तुमची चयापचय वाढविण्यासाठी उपयुक्त असते. तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. लसूण शरीरात लिपोलिसिसच्या प्रक्रियेस चालना देत चरबीचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते.
रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यासाठीही लसूण फायदेशीर मानले जाते. तसेच शरीरातील पेशींना पोषक घटक आणि ऑक्सिजन वितरित करण्यासाठीही लसूण उपयुक्त असते.
मोहरीचे दाणे
मोहरीचे दाणे आकाराने लहान असले तरी ते चयापचय वाढवण्याच्या बाबतीत खूप फायदेशीर मानले जातात. विविध पाककृती आणि मसाल्यामध्ये एक सामान्य घटक आहेत, मोहरी जीवनसत्त्वे ए, बी-कॉम्प्लेक्स व सी, तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांसह आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. हे पोषक घटक चयापचय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ- व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी फायदेशीर असते. तसेच कॅल्शियम स्नायूंची आकुंचन क्रिया सुलभ करण्यास चयापचय क्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरते.
मोहरीच्या बियांमध्ये सेलेनियम हे एक ट्रेस खनिज असते; जे निरोगी थायरॉइड प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत करते.
त्यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने भुकेची लालसा कमी होते. मोहरीचे दाणे प्रथिनांनी समृद्ध असतात; जे स्नायूंच्या ऊती तयार करणे आणि दुरुस्त करणे यांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढू शकते आणि आरामानंतरही जास्त कॅलरी बर्न होऊ शकतात.
मोहरीच्या दाण्यांमधील आणखी एक महत्त्वाचा पोषक घटक म्हणजे ओमेगा-3 फॅटी अॅसिड; जे शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
आहारात ‘या’ मसाल्यांचा असा करा समावेश
दालचिनी : तुमच्या सकाळच्या ओटमिल किंवा स्मूदीमध्ये चिमूटभर दालचिनी घाला. दालचिनी विविध पदार्थ आणि करीसारख्या चवदार पदार्थांमध्ये एक स्वादिष्ट चव आणते.
आले : आल्याचा चहा तयार करून प्या किंवा आले मॅरीनेडमध्ये वापरा. त्याशिवाय स्टीयर फ्राईज आणि सूपमध्येही तुम्ही आले किसून वापरू शकता. त्यामुळे तुमचे जेवण अधिक स्वादिष्ट होईल.
लसूण : पास्तापासून अनेक भाज्यांमध्ये तुम्ही लसणाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. तुम्ही लसूण किसून, बारीक करून किंवा जाड तुकडे करून विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरू शकता.
मोहरीचे दाणे : तुम्ही डाळ किंवा विविध प्रकारच्या भाज्यांना फोडणी देण्यासाठी मोहरीचे दाणे वापरू शकता. त्याशिवाय सलाड , सॉस किंवा लोणच्यामध्ये याचा वापर करू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला नैसर्गिकरीत्या चयापचय प्रक्रिया सुरळीत करायची असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामुळे तुम्ही भविष्यात अधिक उत्साही आणि निरोगी जीवनशैली जगू शकता. तसेच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली यांनाही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घ्या.