Heart Attack Symptoms: जागतिक आकडेवारीनुसार, हृदयविकार (Heart Attack) हा आजही जगातील सर्वात मोठा जीवघेणा आजार ठरत आहे. दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष (१.८ कोटी) लोकांचा यामुळे मृत्यू होतो, ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही; त्यापूर्वी शरीर काही विशिष्ट संकेत देते, मात्र लोक त्याकडे वेळीच लक्ष देत नाहीत.
आठवडे आधीच मिळतात संकेत?
नोएडा येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विनीत भाटिया आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक कुमार यांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे काही दिवस किंवा आठवडे आधीच दिसू शकतात. ही लक्षणे नेहमीच तीव्र असतात असे नाही, त्यामुळे ती ओळखणे कठीण होते.
- असामान्य थकवा: सतत जाणवणारा थकवा जो विश्रांतीनंतरही जात नाही.
- छातीत सौम्य अस्वस्थता: छातीवर थोडा दबाव येणे जो येतो आणि जातो.
- धाप लागणे: रोजची कामे करतानाही श्वास घेण्यास त्रास होणे.
- लक्षणे नसणे: ४० वर्षांखालील तरुण किंवा कोणताही धोका नसलेल्या व्यक्तींमध्ये कधीकधी कोणतीही पूर्वलक्षणे न दिसता थेट अटॅक येऊ शकतो.
हृदयविकार की ॲसिडिटी? गोंधळून जाऊ नका
अनेक रुग्ण छातीतील अस्वस्थतेला ‘गॅस’ किंवा ‘ॲसिडिटी’ समजून दुर्लक्ष करतात. डॉ. विनीत भाटिया यांनी यातील फरक स्पष्ट केला आहे:
- हृदयविकाराचे दुखणे: छातीत जडपणा किंवा घट्टपणा जाणवतो, जो हातापर्यंत, जबड्यापर्यंत किंवा पाठीपर्यंत पसरू शकतो.
- ॲसिडिटी: हे प्रामुख्याने जेवणानंतर होते. त्यामुळे जळजळ जाणवते आणि पचनाच्या औषधांनी ते बरे होते.
महिलांमधील लक्षणे वेगळी असू शकतात
डॉ. विवेक कुमार यांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लक्षणे वेगळी असू शकतात. महिलांना केवळ छातीत दुखण्याऐवजी प्रचंड थकवा, श्वास घेण्यास त्रास, मळमळ किंवा पाठीच्या वरच्या भागात आणि जबड्यात वेदना जाणवू शकतात. महिलांनी या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
वैद्यकीय चाचण्या आणि स्मार्टवॉचवर पूर्ण अवलंबून राहू नका
तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, कधीकधी ईसीजी (ECG) किंवा रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असूनही हृदयविकाराचा धोका असू शकतो. रक्तवाहिन्यांमधील छोटे अडथळे किंवा ‘अनस्टेबल प्लेक’ सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये दिसून येत नाहीत.
तसेच, स्मार्टवॉच केवळ तुमच्या हार्ट रेट मोजू शकतात, मात्र ते हृदयविकाराचे निदान करू शकत नाहीत. स्मार्टवॉचवरील ‘नॉर्मल’ रीडिंग पाहून गाफील राहू नका.
कधी घ्यावी त्वरित वैद्यकीय मदत?
- छातीत काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ अस्वस्तता जाणवणे
- श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत घाम येणे
- मळमळ होणे किंवा वेदना तसंच हात, जबडा किंवा पाठीत वेदना पसरण.
सुरुवातीची लक्षणे ही नेहमीच ‘आणीबाणी’ असल्यासारखी वाटत नाहीत, पण ती वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेले निर्णय जीव वाचवू शकतात.
महत्त्वाची टीप: आरोग्याशी संबंधित लेख असल्याने शेवटी काहीही शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
