High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. पण अनियंत्रित ब्लड प्रेशरमुळे तुमच्या हृदयाच्या धमन्यांना नुकसान पोहोचू शकते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो याबाबत तुम्हाला माहीत आहे का? हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, वाढलेल्या ब्लड प्रेशरचा हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो.
गुरूग्राम इथल्या पारस हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महेश वाधवानी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, हाय ब्लड प्रेशर समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्याचा हृदयाच्या कार्यावर थेट परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशर ही एक वेगाने वाढणारी समस्या बनली आहे. याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका आणि हृदय निकामी होण्याचे ते एक प्रमुख कारण बनू शकते. तर मग हाय ब्लड प्रेश आणि हृदय यांच्यातील संबंधाबद्दल जाणून घेऊया…
हाय ब्लड प्रेशरचा हृदयावर कसा परिणाम होतो?
हाय ब्लड प्रेशर म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील दाब सामान्यपेक्षा जास्त असणे. या स्थितीमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, कारण त्याला जास्त दाबाने रक्त पंप करावे लागते. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर हृदयाचे स्नायू थकू लागतात आणि हृदय निकामी होण्याचा धोका हळूहळू वाढतो. सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे हृदय ८० ते १०० वर्षे निरोगी राहू शकते, मात्र सततच्या हाय ब्लड प्रेशरमुळे व्यक्ती कमी वयातच आजारी पडू शकते.
ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक यांचा काय संबंध आहे?
हाय ब्लड प्रेशरमुळे केवळ हृदयावरील दाबच वाढत नाही, तर रक्तवाहिन्यासुद्धा कठीण होतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. बऱ्याच केसेसमध्ये रूग्णाला आधी कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र अचानक निदान झाल्यावर असे दिसून येते की, त्यांना पूर्वी सायलेंट हार्ट अटॅक किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याचे प्रसंग घडले आहेत.
सामान्य ब्लड प्रेशर किती असते?
साधारणपणे, १४०/९० mmHg पेक्षा जास्त ब्लड प्रेशर उच्च मानला जातो. वयानुसार यात बदल होऊ शकतात. १८ ते २० वयोगटातील व्यक्तींसाठी सुमारे १३० ब्लड प्रेशर उच्च मानला जाऊ शकतो. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी काही केसेसमध्ये १४० पर्यंतचा ब्लड प्रेशर सामान्य मानला जाऊ शकतो. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी काही प्रकरणांमध्ये १४० पर्यंतचा ब्लड प्रेशर सामान्य मानला जाऊ शकतो.
हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक कसा येतो?
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, जर ब्लड प्रेशर अचानक २००च्या वर गेला, तर हृदय लगेच स्वत:ला जुळवून घेऊ शकत नाही आणि हृदय निकामी होऊ शकते. त्याचवेळी जर ब्लड प्रेशर बराच काळ १५०-१६०च्या आसपास राहिला, तर हृदय कोणत्याही लक्षणांशिवाय हळूहळू कमकुवत होते. ही स्थिती अधिक धोकादायक आहे, कारण रूग्णाला बराच काळ याची जाणीव नसते.
हाय ब्लड प्रेशरचा शरीराच्या अवयवांवर कसा परिणाम होतो?
हाय ब्लड प्रेशर हा केवळ हृदयाचा आजार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. दीर्घकाळ हाय ब्लड प्रेशरमुळे पक्षाघात आणि पॅरालिसिसचा धोका वाढू शकतो. दीर्घकाळ हाय ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांची शक्तीही कमी होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरमुळे किडनी आणि फुप्फुसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
ब्लड प्रेशर कसा नियंत्रित करावा
- हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दररोज ३ ते ५ ग्रॅम मीठ पुरेसे आहे. लोणची, पापड, खारट पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांनी समृद्ध असलेल्या भारतीय आहारामुळे मीठाचे सेवन वाढते.
- हाय ब्लड प्रेशर ओळखण्यासाठी तुमचा ब्लड प्रेशर नियमितपणे तपासा. सामान्य व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा ब्लड प्रेशर तपासून घ्यावा.
- औषधे वेळेवर घ्या आणि ती घेणे थांबवू नका. वेळेवर तपासणी, सकस आहार आणि नियमित औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळवता येते.
- नियमित व्यायामामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो आणि ब्लड प्रेशर सामान्य राहतो. दररोज किमान ३० मिनिटे चाला.
- तणावावर नियंत्रण ठेवा. योग आणि ध्यानधारणा करा.
