Urinary Health In Women: अनेकदा मीटिंगमध्ये असताना, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने महिला लघवी रोखून धरतात. “थोड्या वेळाने जाऊ” म्हणत हा वेळ पुढे ढकलला जातो. पण ही साधी वाटणारी सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
लघवी रोखण्यामागची कारणं
महिलांमध्ये लघवी रोखून धरण्याची सवय बऱ्याचदा शालेय जीवनापासून सुरू होते. शाळांमधील अस्वच्छ प्रसाधनगृहे किंवा असुरक्षितता यामुळे मुली तिथे जाणं टाळतात. नोकरीच्या ठिकाणीही पुरुषप्रधान क्षेत्रात वारंवार वॉशरूमला जाणे अवघडल्यासारखे वाटते. “एक्सक्यूज मी, मला वॉशरूमला जायचे आहे,” असे म्हणणे आजही अनेक महिलांना गैरसोयीचे वाटते.
आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
या विषयावर यूरोगायनेकोलॉजिस्ट डॉ. वेलागा सिरीषा यांनी बोलताना सांगितले की, “मूत्राशय हा एक लवचिक स्नायूंचा अवयव आहे, जो ठराविक चक्रात प्रसरण पावतो आणि रिकामा होतो. जेव्हा ते भरते, तेव्हा मेंदूला संकेत मिळतात. वारंवार हे संकेत दाबून टाकल्यामुळे मेंदू आणि मूत्राशय यांच्यातील समन्वयावर परिणाम होतो.”
डॉक्टरांनी सांगितलेले संभाव्य धोके
१. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)- लघवी जास्त वेळ साठून राहिल्याने बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि वारंवार संसर्ग होतो.
२. पेल्विक फ्लोर निकामी होणे- लघवी रोखण्यासाठी पेल्विक स्नायू वारंवार ताणले गेल्याने ते एकतर खूप कडक होतात किंवा कमकुवत होतात. यामुळे ओटीपोटात दुखणे किंवा लघवीला सुरुवात करताना त्रास होणे असे प्रकार घडतात.
३. मूत्राशयाची संवेदनशीलता कमी होणे- मूत्राशय वारंवार पूर्ण क्षमतेपर्यंत ताणले गेल्याने भविष्यात ते भरल्याचे संकेत मिळणे बंद होऊ शकते.
४. डिहायड्रेशन- वॉशरूमला जावे लागू नये म्हणून अनेक महिला कमी पाणी पितात. यामुळे लघवी घट्ट (Concentrated) होते आणि मूत्राशयाला सूज येऊ शकते.
निरोगी सवयी काय असाव्यात?
डॉ. सिरीषा यांच्या मते, निरोगी राहण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे…
नियमितता- दिवसातून दर ३ ते ४ तासांनी लघवीला जाण्याची सवय ठेवा.
पाणी भरपूर प्या- लघवीचा रंग फिकट पिवळा राहील इतपत पाणी पिणे गरजेचे आहे.
संकेत ओळखा- लघवीची पहिली जाणीव झाल्यावरच बाथरूमला जा, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका.
संकोच सोडा- लघवी गळणे, वारंवार होणारा संसर्ग किंवा ओटीपोटात दुखणे या समस्या सामान्य नसून त्यावर उपचार करणे शक्य आहे.
तज्ज्ञांचे मत
गर्भधारणा, बाळंतपण आणि मेनोपॉज (रजोनिवृत्ती) या काळात महिलांच्या शरीरावर आधीच ताण असतो. अशा वेळी लघवी रोखून धरण्याची जुनी सवय ही परिस्थिती अधिक बिकट करू शकते. त्यामुळे मूत्राशयाच्या आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलणे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

