Best Home Remedies and Ayurvedic Health Tips for long term wellness: शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी केवळ औषधेच हवीत असे नाही, तर आपल्या दिनचर्येत काही छोटे बदल करून आपण दीर्घायुषी होऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि घरातील उपलब्ध गोष्टींतून स्वतःला निरोगी ठेवण्याचे प्रभावी आयुर्वेदिक मंत्र खालीलप्रमाणे आहेत.
अवयवांचे तेलवंगण
कोणत्याही औषधाशिवाय आपल्याला शरीराचे आरोग्य चांगले राखता यायलाच हवे. त्यामुळे यालेखात फारसा खर्च न करता घरच्या घरी उपलब्ध गोष्टींचा वापर करून शरीराचे आरोग्य कसे चांगले राखता येईल, ते सांगितले आहे. अनेकदा आपण आपल्या अवयवांना गृहीत धरतो. तसे न करता त्यांचे तेलवंगणही करायला हवे.

कर्णपूरण

कान कोरडे होतात, खाजतात, विलक्षण कंड सुटते, कानांतून आवाज येतात, कान हलके होतात, अशा वेळेस कानात जरूर तीळ तेल टाकावे. न मिळाल्यास गोडे तेल टाकावे. कानांत टाकण्याअगोदर किंचित कोमट करून घ्यावे. दोन पाच मिनिटांत तेल कानांतून काढून टाकावे. ज्यांचा कान कधी वाहिला आहे त्यांनी मात्र हा उपक्रम करू नये. कानांत खोबरेल तेल कदापि टाकू नये.

Ayurvedic home remedies for daily health | Ayurvedic tips for healthy lifestyle in Marathi | घरगुती आयुर्वेदिक उपाय आणि आरोग्य टिप्स | निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व
घरगुती आयुर्वेदिक उपाय करून आरोग्य सुधारा आणि फिट राहा.

नेत्रपूरण, नस्य, नाभिपूरण

बेंबीच्यापाशी एरंडेल किंवा गोडे तेल जिरवत राहिले तर लहान बालकांची व वृद्धांची पोटदुखी, वायू सरकून लगेच थांबते. डोळा सर्व धातूंचे सार आहे. शरीरातील रस, मांस, मेद, मज्जा व शुक्र हे धातू क्षीण झाले की डोळे खोल जातात, रूक्ष होतात, तेज सहन होत नाही. अतिउन्हात किंवा उष्णतेशी सतत काम करणाऱ्यांचे डोळे तळावतात. त्याकरिता नारळाचे दूध काढून ते चमच्यांत आटवावे. त्यांचे तयार झालेले खोबरेल किंवा खात्रीचे तूप, लोणी दोन्ही डोळ्यांत दोन तीन थेंब टाकावे. पाच दहा मिनिटे तसेच राहू द्याावे. ज्यांना झोप कमी आहे त्यांनी झोपण्यापूर्वी हा प्रयोग जरूर करावा. फायदा होतो.

नियमित नस्य करावे

‘नासा ही शिरसो द्वारं!’ नाकात टाकलेले औषध डोक्यातील सर्व अवयवांची काळजी घेते. कान, नाक, घसा, गळा, मेंदू, डोळे, केस या संबंधित सर्व विकारात तीळ तेल किंवा चांगल्या तुपाचे दोन चार थेंबाचे नस्य करावे. ज्यांना आपली इंद्रिये बळकट हवी आहेत, केस गळणे थांबावे किंवा पांढरे केस काळे व्हावेत असे वाटते त्यांनी नियमित नस्य उपक्रम करावा. अनुभव घ्यावा. इतरांना सांगावा.

मजबूत खांदा व मानेसाठी नस्य

सर्दी, डोकेदुखी, झोपच न येणे, फिटस् येणे, थॉयराईड ग्रंथीची वाढ, गंडमाळा, स्मृती कमी होणे, चक्कर या विकारांत गाईच्या तुपाचे नस्य मोठा गुण देते. श्रद्धेने उपचार करावयास हवा. ज्यांना मजबूत खांदा व मान, बळकट छाती व सुंदर त्वचा हवी आहे त्यांनी नस्य प्रयोग जरूर करावा. ज्यांची नखे कुरतडलेली, रूक्ष, तुटकी, फुटलेली आहेत त्यांनी तुपाचा नित्य प्रयोग नखप्रतिसारणांकरिता करावा.

पायाची नियमित सेवा

स्वत:च्या पायाची सेवा स्वत: नियमित केली तर ते पाय दीर्घकाळ उत्तम काम देतात. कोणत्याही कामाला लटपटत नाहीत. जळवात, भेगा, रक्त येणे या पायांच्या तक्रारींकरिता तूप किंवा एरंडेलाचा प्रयोग करावा. पादशीलन तीळ तेल किंवा गोडे तेलाचेही होते. त्यानंतर आवश्यक तर पाय गार किंवा गरम पाण्यात थोड्या वेळाने ठेवावेत.

पिचकारी, बस्ती, शिरोपिचू

पिचकारी किंवा शास्त्रीय शब्द मात्राबस्ती हा आयुर्वेदीय मंडळीचा खास उपचार आहे. एनिमा दिला तर शौचास लगेच प्रेरणा होते. तसे तेलाच्या पिचकारीने नाही. उपलब्धतेनुसार कोणत्याही तेलाची पिचकारी शौचाला खडा होणे, वायू धरणे, जंत, कृमी, पोटदुखी, लघवी अडणे, मुदतीचा ताप, बिनमोडाची मूळव्याध, अंग बाहेर येणे, अर्धांगवात, मेंदूला सूज येणे, फिटस् येणे इत्यादी नाना वाताच्या, पक्काशयाच्या व अपान वायूच्या क्षेत्रांत उत्तम व तात्काळ गुण देते. जे औषध तोंडावाटे पोटात जाऊन काम करावयास चोवीस तास लागतात, त्याचजागी पिचकारी लगेच काम देते.

…यासाठी मात्र एरंडेल तेल वापरू नये

पिचकारीकरिता एरंडेल कधी वापरू नये. सर्वसामान्यांना साबण पाण्याचा एनिमा माहीत आहे. पण या एनिमामुळे दीर्घकालीन गुण मिळत नाही. तात्पुरता थोडा मळ सरकणे, वायू मोकळा होणे इतपत गुण मिळतो. पण त्यापेक्षा अधिक गुण मिळण्याकरिता एरंडेल तेल सोडून कोणतेही तेल, गरम पाणी व साबण असा अनुवासन बस्ती वापरल्यामुळे पक्काशयाच्या आतल्या त्वचेला साबणाने होणारी संभाव्य इजा टळते. शिवाय आतडी अधिक कार्यक्षम होतात.

मेंदूचे विकार, डोळे गरम होणे, झोप न लागणे, उन्माद, फिटस् येणे, विस्मरण, डोळे रूक्ष होणे, तळावणे, अशा नाना मेंदूच्या, डोळ्यांच्या तक्रारीत डोक्यावर कोणत्याही तेलाची पट्टी ठेवावयाची असल्यास थोडे थोडे तेल पुन: पुन्हा डोक्यावर टाकत जावे. याचा उपचारांचा आणखी व्यापक भाग म्हणजे शिरोबस्ती. त्याकरिता डोक्याच्या आकाराची दोन्ही बाजूंनी खुली अशी चामड्याची टोपी करावी. डोक्यात ती बसवून बाहेरून उडीद डाळीच्या पिठाचा लेप लावावा. डोक्यावर भरपूर तेल ओतावे. हे तेल तास अर्धा तास ठेवावे. मेंदूकरिता हा उत्तम बाह्योपचार आहे.

अती झाले की, वाईटच

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. ‘चांगले’सुद्धा अति झाले की ‘वाईट’ ठरते. दोन्ही शब्द सापेक्ष आहेत. आपण गोड रस, तूप, दूध, बदाम, गहू, भात, हरभरा, शेंगदाणे, साखर यांची प्रशस्ती करतो. विश्रांती, निवांत झोप, आराम यांची ‘चाह’ करतो. पण काही वेळ अशी येते की, या सर्व गोष्टी शरीरस्वास्थ्याला बाधा करणाऱ्या ठरतात. शरीर चांगले राखायचे असेल तर स्नेहाचा त्याग करून शरीराला ‘घाम’ गाळावयास लावणेच हिताचे असते. चरबीचे थरच्या थर, मान, छाती, कंबर, पोट, मांड्या, पोटऱ्यांवर जमविणे प्राणघातक ठरू शकते.

अग्निस्वेद

चंद्रकिरण शीतल, आल्हाददायक, सुखकर याबद्दल वाद नाही. पण नुसत्याच चांदण्याने शरीर तेजस्वी, ओजस्वी, चपळ, कामसू राहणार नाही. त्याकरिता शास्त्रकारांनी स्वेदसंहिता सांगितली आहे. हातापायांचे सांधे, कोठ्यांत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंत फाजील चरबी, कफ, मेद साठत जातो. तो स्नेहाने किंवा अन्य उपायांनी ओला करून घाम काढून पातळ करावा लागतो. त्यामुळेच शरीराचे चलनवलन चांगले राहते. याकरिता कफ, कफवात व वात विकारांना नाना तऱ्हेचे स्वेदनाचे, घाम काढण्याचे उपाय शास्त्रकारांनी सांगितले आहेत.

घाम बाहेर येणे महत्त्वाचे

सर्वांगातील घाम बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष अग्निशी संबंधाला फार महत्त्व आहे. पूर्वी घरोघरी चुली, बंब, शेगड्या होत्या. शेकोट्या पेटत असत. त्यामुळे प्रत्यक्ष अग्नीशी संपर्क ठेवून शरीरात ऊब आणणे सहज शक्य होते. आता त्याकरिता इलेक्ट्रिकची विविध साधने उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष चुलीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून जी ऊब मिळते त्याची सर या लाल गोळ्याला किंवा इलेक्ट्रिक पॅडला येत नाही. दमेकरी, संधिवात, आमवात, स्थूल शरीर, सायटिका, फ्रोझन शोल्डर, कंबर, पाठदुखी, गुडघेदुखी इ. विकारांत शेकोटी शेक सुसह्य व आपणास पाहिजे तसा त्या त्या भागाला देता येतो. ज्यांना हा शेक तीव्र वाटतो त्यांनी शेकाअगोदर कोणतेतरी तेल अंगाला जरूर लावावे. मगच शेक घ्यावा. नुसत्या कोरड्या शेकामुळे नसा कडक होतात.