Effective Joint Pain Home Remedies using traditional Ayurvedic Swedana methods for better health: शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नेहमीच महागड्या औषधांची गरज असते असे नाही. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून सांधेदुखी, सूज आणि जखडलेले स्नायू मोकळे करता येतात. आयुर्वेदात सांगितलेल्या ‘स्वेदन’ म्हणजेच शेक घेण्याच्या विविध पद्धती शरीरातील दोष दूर करण्यास मदत करतात.

औषधाशिवाय चांगले आरोग्य

कोणत्याही औषधाशिवाय आपल्याला शरीराचे आरोग्य चांगले राखता यायलाच हवे. त्यामुळे यालेखात फारसा खर्च न करता घरच्या घरी उपलब्ध गोष्टींचा वापर करून शरीराचे आरोग्य कसे चांगले राखता येईल, ते सांगितले आहे. अनेकदा आपण आपल्या अवयवांना गृहीत धरतो. तसे न करता त्यांचे तेलवंगणही करायला हवे.

शेक देण्याच्या पद्धती

आरोग्यरक्षण व रोग निवारणाकरिता नाना गोष्टींची निवड, तारतम्य वापरून गरज व उपलब्धता यांचा विचार करून करता येते. आयुर्वेदाच्या शास्त्रकारांनी किती बारकाईने व लहानसहान बाबी लक्षात घेऊन केलेला विचार पाहिला की, आपणालाही आपल्या जवळपासचे साधे-सोपे उपचार सुचतात, वापरता येतात. वातविकारात लहान-मोठे सांधे, गुडघे, खांदा, मनगटे, कंबर असे नाना अवयवांना सूज येते, ठणका मारतो, जखडतात. पिंडस्वेद करून शेकावयास सांगितले आहे. या शेकाचा फायदा म्हणजे याचा चटका बसणार नाही ही काळजी घेता येते. गरजेप्रमाणे कमी-अधिक किंवा जाड-पातळ फडक्यात पिंड ठेवून शेकता येते. हे भाताचे गोळे किमान दोन वेळा वापरता येतात.

Joint Pain Home Remedies Ayurvedic Swedana | Natural treatment for knee pain in Marathi | सांधेदुखीवर घरगुती उपाय आणि शेक | गुडघेदुखीसाठी आयुर्वेदिक उपचार
सांधेदुखी कमी करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक पिंडस्वेद पद्धत (Image- Gemini)

पोटीस किंवा उपनाह

पिंडस्वेदाची उष्णता जास्त काळ टिकते. टिकाऊ परिणाम देते. असाच शेक, उपनाह म्हणजे पोटीस बांधून करता येतो. उपनाहामध्ये चटका चांगला अशी अपेक्षा आहे. पोटीस किंवा उपनाहाकरिता कणीक, तेल, हळद, गाजर, कांदा, बटाटा अशा विविध भाज्यांचा उपयोग करता येईल. उद्देश हा की दुखणाऱ्या भागाच्या ठिकाणी उष्णता तर दीर्घकाळ राहावी व त्याचा चटका बसून त्वचा लाल होणे, पुरळ किंवा फोड येणे होऊ नये.

मेणदाह

सुहागी टाकणखार एक भाग व चौपट कणीक पाण्यात कालवून गरम गरम असे पोटीस सर्वोत्तम पोटीस आहे. ज्यांना पोटीस शक्य नाही त्यांनी मीठ टाकून उकळलेल्या पाण्यात कापडाच्या पट्ट्या भिजवून त्याने लहान-मोठे सांधे शेकावे. मात्र पाणी गार होऊ देऊ नये. पट्ट्या वारंवार बदलाव्यात. वृद्ध रोगी, लहान बालके यांचा पाय मुरगळला किंवा सुजेकरिता हा सोपा उपाय आहे. काही संधिवाताचे विकार फारच त्रास देतात. बरेच पैसे खर्च करावे लागतात. वारंवारचा व कधी न संपणारा औषधांवरचा खर्च सर्वांनाच परवडेल असे नाही. त्याकरिता एकवेळ मेण विकत आणावे. ते एखाद्याा भांड्यात पातळ करावे व सोसवेल इतपत गरम असताना दुखऱ्या सांध्यावर थापावे. थोडा वेळ राहू द्याावे. वर फडके बांधून बराच काळ ऊब मिळेल असे करता येते. हे मेण पुन: पुन्हा बऱ्याच वेळा वापरता येते.

मलद्रव्ये बाहेर काढणारे सूर्यस्नान

ज्यांना डायरेक्ट शेक घेणे शक्य नाही त्यांनी सोसवेल इतपत ऊन अंगावर जास्त काळ घ्यावे. विशेषत: सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत उन्हात केलेले काम शरीराला नवजीवन देते. ज्यांना शक्य आहे त्यांनी बागेत, शेतात किंवा बाहेर फिरायला जाण्याच्या निमित्ताने सकाळी सात ते दहा या काळात डायरेक्ट ऊन घ्यावे. या उन्हातून अनेक जीवनसत्त्वे शरीराला मिळतात. शरीरातून कळत-नकळत बरीच मलद्रव्ये घाम स्वरूपात बाहेर पडतात. ही मलद्रव्ये सावकाश बाहेर पडत असल्याने थकवा येत नाही.

सूर्यप्रकाश अंगावर घ्या आणि डॉक्टरला दूर ठेवा

क्षय, प्लुरसी, पांडू, त्वचेचे विकार, स्थौल्य, मधुमेह या विकारांत सूर्यप्रकाश डायरेक्ट घ्यावा. डॉक्टर व औषधे यांना त्यामुळे लांब ठेवता येते. वृद्ध माणसांनी कोवळ्या उन्हात बसून पाठीवर ऊन घ्यावे. तरुणांनी सूर्यस्नान करावयास हरकत नाही. पण त्याचा अतिरेक होऊ नये. एकूण उद्देश शरीरातील आवश्यक मलद्रव्ये सुखाने घामरूपाने बाहेर जावयास हवी. घाम येईल असे गरम गरम पाणी पिऊनही शरीरातून एकाच वेळात घाम बाहेर काढता येतो. गरम गरम चहा पिणे, सुंठ, गवती चहा किंवा तुळशीची पाने, पारिजातकाची पाने उकळून ते पाणी पिणे हा स्वेदनाचाच प्रकार होय.

ब्लँकेट किंवा कांबळ्याचा असाही उपयोग

मुंबईसारख्या ठिकाणी सर्वांगाला घाम आणण्याकरिता फार मोठे खटाटोपाचे प्रयत्न करावे लागत नाहीत. लोकलच्या धमाल गर्दीत सेकंड क्लासमधून सकाळी किंवा सायंकाळी दहा-पंधरा मिनिटे केलेला प्रवास पुरेसा ठरेल. पण तो गमतीचा भाग झाला. मुंबईत शाल, ब्लँकेट, कांबळे असे उबदार अंथरूण घेऊन दहा-पंधरा मिनिटे बसले तर संधिवात, आमवात, स्थौल्य, मधुमेह या विकारांत बराच उपशय मिळतो.

पेटिकास्वेद, स्थानिक स्वेद

नाशिक, पुणे, सातारा अशा थंड हवेच्या ठिकाणी सर्वांग स्वेदाकरिता पेटिकास्वेद म्हणजे बंद पेटीत बसविलेल्या फळीवर झोपून खालून काढ्याची किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम उपाय होय. त्याचबरोबर स्थानिक स्वेद म्हणून प्रेशर कुकरला रबरी नळी लावून पाण्याची वाफ त्या त्या अवयवाला देता येते. अर्धांगवात, सायटिका, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या वातविकारात स्थौल्य कमी करण्याकरिता पेटिका स्वेद फार फायदेशीर आहे. मात्र तो प्रयोग कोणत्या तरी देखरेखीखालीच व्हावा.

अवगाह, शॉवरबाथ, द्रोणी स्वेद

याशिवाय टबबाथ किंवा अवगाह किंवा द्रोणी स्वेद हा गरम पाण्यात टबमध्ये बसण्याचा उपचार काही विकारांवर उपयुक्त आहे. त्यामुळे मुतखड्याच्या वेदना, अपानवायूचे त्रास, पाठ, गुडघेदुखी या विकारांत अगदी आराम मिळतो. गरम पाण्याचा शॉवर बाथ उपयुक्त आहे. पण डोळे व डोके यांना शक्यतो फार गरम पाणी वापरू नये. कारण त्यामुळे केस व दृष्टीचे आरोग्य बिघडते.

तवा तापवून शेक

काहीच शक्य नाही म्हणजे घरचा तवा तापवून जखडलेली पाठ, मुतखड्याच्या तीव्र वेदना, सायटिका, उसण भरणे याकरिता तव्यावर फडके तापवून शेकावे. असा शेक वारंवार घ्यावा लागला तर पाठीची त्वचा हुळहुळी व लाल होते. त्याकरिता शक्य ती काळजी घ्यावी. घरात अनेक पेन किलर गोळ्या खबरदारी म्हणून काही जण ठेवतात. त्यापेक्षा रबराची हॉटवॉटर बॅग ठेवावी. पाठ- कंबरदुखीकरिता त्या बॅगेमधील पाण्याचा अप्रत्यक्ष शेक एकदम आराम देतो. औषधे टाळता येतात.

कुस्तीचा हौद

माझे गुरुजी वैद्यराज पराडकर व आम्ही काही शिष्य मंडळी अतिस्थूल व्यक्तींकरिता प्रत्येक आयुर्वेदीय रुग्णालयांत कुस्तीचा हौद तयार ठेवता येईल का, याची चर्चा करीत असू. लहानपणी कुस्ती खेळण्याअगोदर कुस्तीचे शिक्षक, कुस्तीचा लाल मातीचा हौद खणावयास सांगत. फावड्याने माती खणावयास लागले की अंगातून किती घाम लाल मातीत पडतो हे प्रत्यक्ष हौद खणल्याशिवाय कळणार नाही. भल्या भल्या अतिविशाल स्त्री- पुरुषांनी, विशेषत: तरुण तीस-चाळीस वयापर्यंतच्यांनी हा प्रयोग करावयास हवा.

तांबड्या मातीचे हौद हवेत

आजकाल नवनवीन ‘स्लिमिंग क्लिनिक’ निघत आहेत. मॉडर्न जिम आहेत. अशा ठिकाणी तांबड्या मातीचे हौद सुरू केले व ते खणल्यावर चांगली शॉवर बाथची सोय केली तर बऱ्यापैकी श्रीमंत व स्थूल रुग्ण नक्कीच हौदांचा वापर करून आपले शरीर कमी करू शकतील. ज्यांना शारीरिक श्रमाची बिलकूल सवय नाही अशा बड्या बड्या मॅनेजर, डायरेक्टर किंवा सुखवस्तूंनी करून पाहण्यासारखा प्रयोग आहे. या हौदातील माती अंगाला चोळून रूक्ष अभ्यंगही करता येते. जे बेडौल शरीर कोणत्याच औषधांना दाद देत नाही ते पंधरा दिवसांत सुधारू लागेल.