अनेकांना अशा लोकांबरोबर राहायचे असते, जिथे त्यांना आपलेपणाची भावना जाणवेल, ज्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा वाढेल, ज्यांच्याशी ते मजेदार आणि अर्थपूर्ण अशा दोन्ही प्रकारचे संभाषण करू शकतील. तसेच आपण ज्या व्यक्तींसमोर मनातील सर्व भावना व्यक्त करु शकतो. ज्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवू शकतो अशाच व्यक्तीच्या शोधात अनेकजण असतात. शिवाय दीर्घकालीन रिलेशनशिप एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची आणि त्यांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यास खूप मदत करतात. अलीकडील एक संशोधनानुसार दीर्घकालीन रिलेशनशिप काही पैलूंच्या आधारे काम करते हे समोर आलं आहे. तर ते विविध पैलू काय असू शकतात या संदर्भातील माहिती डॉ. कामना छिबर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रमुख, मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान विभाग, फोर्टिस हेल्थकेअर यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊया.

१. अशी जागा जिथे तुमची मते सहजपणे मांडू शकता – दीर्घकालीन रिलेशनशिप ही कालांतराने त्याचे महत्व आणि मूल्य सिद्ध करते. या नात्यामध्ये तुम्हाला असे लोक मिळतात जे तुम्हाला महत्वाचे मार्गदर्शन करतात. शिवाय ते तुमच्या अडचणीच्या काळात स्वत:ला उपलब्ध करून देतात. तसेच ते कोणत्याही पद्धतीने तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे काम करतात. तुम्ही जीवनातील विविध अनुभवांमधून जाताना, फक्त मोजकेच लोक असे असतात, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि मनातील सर्व गोष्टी सांगू शकता. शिवाय अशा लोकांसमोर बोलताना तुम्हाला कसलाही दबाव जाणवत नाही.

हेही वाचा- Sleep : पाच किंवा त्यापेक्षा कमी तास झोपेने ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना होऊ शकतो दीर्घकालीन आजार? वाचा काय सांगते संशोधन ….

Award Banner

२. एक अशी जागा जिथे योग्य मार्गदर्शन मिळेल – तुम्ही जीवनातील विविध अनुभवातून जात असताना, तुम्हाला अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्यांना हाताळणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. काहीवेळा तुमच्यासमोर एखादी अशी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यावेळी तुम्हाला नेमकं काय करावे समजत नाही. अशा परिस्थितीत, तुमचे दीर्घकालीन नाते उपयोगी येते आणि त्या व्यक्तीशी तुम्ही मनातील गोष्टी मनमोकळेपणाने व्यक्त करु शकता. तसेच ते लोकही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि पुढे जाण्यासाठी उपाय सुचवू शकतात.

३. तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहू शकता – लोक अनेकदा इतरांना काय वाटेल यासाठी दिखाऊपणा करतात आणि लोकांनुसार स्वत:मध्ये बदल करतात. शिवाय असं वागून ते इतरांवर आपला ठसा उमटवण्याचा खटाटोप करत असतात. परंतू दीर्घकालीन नातेसंबंध ही एक अशी जागा असते. जिथे तुम्ही जसे आहात तसे प्रामाणिकपणे वागू शकता आणि दिखाऊपणा करण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे तुम्हाला काही लपवण्याची किंवा विशिष्ट पद्धतीने वागण्याची गरजच भासत नाहीत.

हेही वाचा- तुम्ही किती श्वास घेता यावर ठरतं आयुष्य! दीर्घश्वासाच्या ‘या’ जपानी पद्धतीने वजन झपाट्याने होईल कमी? तज्ज्ञ सांगतात…

४. समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करु शकता – ज्या लोकांशी तुमचे दीर्घकालीन आणि प्रामाणिक नाते आहे ते तुम्हाला संकटाच्या परिस्थितीत एकटे सोडणार नाहीत. ते तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तुमच्याबरोबर राहतात. अनेकदा, कठीण परिस्थितीत जे आवश्यक आहे ते ते करण्यासाठी तुमची मदत करतात.

५. प्रेरणा आणि प्रोत्साहन – दीर्घकालीन रिलेशनशिपमधील लोक तुमच्या भल्यासाठी योग्य तो सल्ला देतात आणि तुम्हाला नेहमी चांगल्या कामांसाठी प्रोत्साहीत करतात. तुमचे आयुष्य चांगले राहण्यासाठी आणि प्रभावी निवडी करण्यासाठी ते तुम्हाला सतत प्रेरित करतात. शिवाय प्रेरणेचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करतात. हे सर्व ते तुमचे जीवन समद्ध बनावे यासाठीच करत असतात.

चांगले, दीर्घकालीन नातेसंबंध तुम्ही तणावात असताना मध्यस्थी करतात, तुम्हाला योग्य प्रकारचे समर्थन आणि तुमची योग्य काळजीही घेतात. अनेक आव्हानांना सामोरे जाताना तुम्ही तुमचा मार्ग शोधू शकता आणि परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तुमचा आशावाद बळकट करू शकतात, यासाठी असे दीर्घकालीन नातंसंबंध महत्त्वाचे ठरतात. शिवाय असे लोक बरोबर असल्याने तुम्हाला या गोष्टीची खात्री होते की, तुमच्याजवळ अशी जागा आहे जिथे तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो आणि तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते.