How Weight Affects Knees : गुडघ्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी शरीराचे वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ रूमेटॉलॉजी/आर्थरायटिस फाउंडेशन’नुसार, शरीराचे वजन ५ टक्के किंवा त्याहून अधिक कमी केल्यास गुडघ्याची कार्यक्षमता आणि उपचारांचे परिणाम या दोन्हीवर सकारात्मक प्रभाव पडतो. पण हे कसे आणि का होते? याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेशने तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला.
वजन आणि गुडघेदुखीचा नेमका संबंध काय?
मुंबईतील परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Consultant) डॉ. अनुप खत्री यांनी सांगितले की, ज्या लोकांना वजन नियंत्रित ठेवण्यात अडचणी येतात, त्यांना अनेकदा आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते, विशेषतः सांध्यांच्या तक्रारी वाढतात.
डॉ. खत्री पुढे म्हणाले, अतिरिक्त वजनाचा तुमच्या सांध्यांवर लक्षणीय परिणाम होतो. यामुळे तुमच्या सांध्यांवर आणि नितंबांवर (hips) प्रचंड दाब पडतो, ज्यामुळे तीव्र वेदना होतात. काळानुरूप सांध्यांची झीज होते आणि दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते.
यामुळे ऑस्टियोआर्थरायटिस (osteoarthritis), लचक भरणे (sprain), ताण येणे (strain), फ्रॅक्चर, बर्साइटिस आणि रूमेटॉइड आर्थरायटिस यांसारख्या सांध्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. या सांध्यांच्या समस्यांमुळे माणसाच्या हालचालींवर मर्यादा येतात. म्हणूनच भविष्यातील आरोग्याचे धोके टाळण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. खत्री यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे मुख्य सल्लागार (Internal Medicine) डॉ. नरेंद्र सिंघला यांनी सांगितले की, शरीराचे वजन प्रत्येक १ पाऊंडने (सुमारे ४५० ग्रॅम) वाढल्यास, गुडघ्यांना ४ ते ६ पाऊंड अतिरिक्त दाब सहन करावा लागतो. यामुळे ऑस्टियोआर्थरायटिस, सांधेदुखी आणि सांध्यांचे इतर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
वैज्ञानिक भाषेत गुडघ्यावरील या दाबाला ‘पॅटेलोफेमोरल जॉइंट रिएक्शन फोर्स’ (Patellofemoral joint reaction force) असे म्हणतात. डॉ. सिंघला यांच्या मते, हा दाब सांध्यांची स्थिरता, कूर्चा (cartilage) चे आरोग्य, अस्थिबंधनावरील (ligament) ताण आणि मेनिस्कसच्या मजबुतीवर परिणाम करतो.
गुडघ्यावरील दाबासाठी शरीराचे वजन, बॉडी मास इंडेक्स (BMI), उठण्या-बसण्याची पद्धत (posture), चालण्याची पद्धत, स्नायूंची ताकद आणि संतुलन (विशेषतः क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स) तसेच तुम्ही वापरत असलेली चप्पल (footwear) यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरतात. धावणे, उड्या मारणे आणि उठाबशा काढणे यांसारख्या हालचालींमुळे गुडघ्यांवरील दाब आणखी वाढतो,” असे डॉ. सिंघला यांनी सांगितले.
यावर उपाय काय?
गुडघ्यांचे आरोग्य राखण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे हाच मुख्य उपाय आहे. याशिवाय क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम करणे आवश्यक आहे. डॉ. सिंघला म्हणाले, लवचिकता सुधारणे, चांगल्या दर्जाची चप्पल वापरणे आणि उठण्या-बसण्याची योग्य पद्धत ठेवणे तितकेच फायदेशीर ठरते. गुडघ्यांवर जास्त ताण आणणाऱ्या व्यायामांऐवजी सायकलिंग किंवा स्विमिंग (पोहणे) यांसारखे कमी प्रभावाचे (low-impact) व्यायाम करावेत.
गुडघ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी डॉ. सिंघला पुरुषांनी आणि महिलांनी आपला BMI १८.५ ते २४.९ दरम्यान राखण्याचा, तर कंबर आणि नितंबांचे गुणोत्तर (waist-to-hip ratio) पुरुषांसाठी ०.९ किंवा त्यापेक्षा कमी आणि महिलांसाठी ०.८ किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देतात. अस्थिरोग तज्ज्ञ किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन स्वतःसाठी योग्य व्यायाम प्रकार निवडावेत.
डॉ. खत्री यांच्या मते, प्रत्येकाने दिवसातून किमान ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिले पाहिजे. यामध्ये चालणे, जॉगिंग, जिम, कार्डिओ, एरोबिक्स, स्विमिंग, बॅडमिंटन, डान्स किंवा झुंबा यांचा समावेश असू शकतो. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. सकस आणि संतुलित आहार घ्या. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पोर्शन कंट्रोल’ (मर्यादित प्रमाणात खाणे) पद्धत वापरा.
मात्र, सातत्याने प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण, खूप वजन वाढणे हे इतर अंतर्गत आजारांचे लक्षण असू शकते, असे डॉ. खत्री यांनी सांगितले.
