When symptoms feel different from your usual period : उशिरा पाळी येणे, नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे किंवा तीव्र पोटदुखी जाणवणे, हे बदल अनेक महिलांना संभ्रमात टाकू शकतात. विशेषतः जेव्हा पाळीदरम्यान नेहमी पेक्षा वेगळी लक्षणे जाणवतात तेव्हा मनात प्रश्न येतो, ही साधी पाळी आहे की काही वेगळे घडत आहे.
तज्ज्ञांच्या मते, लवकर गर्भपात (early miscarriage) आणि सामान्य पाळी या दोन्ही परिस्थितीमधील लक्षणे सुरुवातीच्या काळात खूपच सारखी दिसू शकतात. त्यामुळे महिलांना हा फरक ओळखणे कठीण जाते. काही वेळा लवकर गर्भपात झाल्यास तो नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव किंवा वेदनादायक पाळीसारखा वाटू शकतो.
अशा वेळी महिलांना पोटात अधिक तीव्र क्रँप्स येणे (cramps), मोठ्या रक्ताच्या गुठळ्या (clots) किंवा ऊतकासारखा स्त्राव दिसू शकतो. मात्र ही लक्षणे दिसली तरी ते गर्भपात झाल्याची खात्री देत नाहीत.
पाळी आणि लवकर गर्भपात यामध्ये गोंधळ का होतो? (Why early miscarriage is often mistaken for a period)
लवकर गर्भपात आणि पाळी यामध्ये गोंधळ होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे वेळ आणि गर्भधारणेची माहिती नसणे. अनेक वेळा महिलांना गर्भधारणा झाली आहे हे सुरुवातीला लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत गर्भपात झाल्यास तो साध्या उशिरा आलेल्या किंवा जास्त रक्तस्राव असलेल्या पाळीसारखा वाटू शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की,”सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये गर्भधारणा अत्यंत नाजूक अवस्थेत असते. त्यामुळे काही महिलांमध्ये अतिशय सुरुवातीला गर्भपात होऊ शकतो आणि त्याची त्यांना जाणीवही होत नाही. परिणामी हा अनुभव एक असामान्य किंवा त्रासदायक पाळी म्हणूनच ओळखला जातो.”
यामुळेच महिलांनी स्वतःच्या पाळी दरम्यान होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच्या पाळीपेक्षा वेगळा अनुभव येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
कोणती लक्षणे फरक ओळखण्यात मदत करू शकतात? (Signs that may indicate a difference)
काही लक्षणे अशी असतात, जी साध्या पाळीपेक्षा वेगळी असल्याचे संकेत देऊ शकतात. उदाहरणार्थ, नेहमीपेक्षा खूप जास्त रक्तस्राव होणे, मोठ्या गुठळ्या बाहेर पडणे किंवा वेदना अधिक काळ टिकणे ही लक्षणे लक्ष देण्यासारखी असतात.
लवकर गर्भपातामध्ये रक्तस्राव अचानक वाढू शकतो आणि पोटदुखी तीव्र स्वरूपाची असू शकते. काही वेळा स्त्रावामध्ये ऊतकासारखा भाग दिसू शकतो, जो सामान्य पाळीत सहसा दिसत नाही.
मात्र हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की,”या लक्षणांवरून खात्रीपूर्वक निष्कर्ष काढणे शक्य नाही. कारण अनेकदा हार्मोन्समधील बदल, ताणतणाव किंवा इतर शारीरिक कारणांमुळेही पाळी जास्त रक्तस्त्राव होऊ शकते.
म्हणूनच गर्भधारणा चाचणी (pregnancy test) करणे हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतर रक्तातील hCG पातळी तपासणे ही प्रक्रिया गर्भधारणेची स्थिती समजून घेण्यासाठी उपयोगी ठरते. hCG पातळी कमी होत असल्यास गर्भपात झाल्याची शक्यता असते.
यासोबतच अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे गर्भधारणा योग्यरीत्या विकसित होत आहे का किंवा त्यात अडचण आहे का हे स्पष्टपणे समजू शकते.
कोणत्या परिस्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? (When to seek medical help immediately)
जर रक्तस्राव खूप जास्त होत असेल, उदाहरणार्थ दर तासाला पॅड पूर्ण भिजत असेल तर ही गंभीर बाब मानली जाते. अशा वेळी वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
याशिवाय तीव्र पोटदुखी, चक्कर येणे, ताप येणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही लक्षणेही धोक्याची घंटा मानली जातात. विशेषतः जर आधी गर्भधारणा चाचणी सकारात्मक(Positive) आली असेल, तर कोणतीही शंका असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे ठरते. वेळेवर निदान झाल्यास संभाव्य गुंतागुंत टाळता येते आणि भविष्यातील आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
स्वतःहून निष्कर्ष काढू नका, वैद्यकीय खात्रीच सर्वात महत्त्वाची (Conclusion: Medical confirmation is the safest way)
लवकर गर्भपात आणि सामान्य पाळी यांची लक्षणे अनेकदा एकमेकांसारखी वाटू शकतात. त्यामुळे महिलांनी शरीरातील बदलांकडे जागरूकपणे लक्ष देणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हीच सुरक्षित पद्धत ठरते. स्वतःहून अंदाज बांधण्याऐवजी योग्य चाचण्या आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळेच खरी स्थिती स्पष्ट होते. महिलांच्या आरोग्यासाठी जागरूकता आणि वेळेवर घेतलेला निर्णय हेच सर्वात प्रभावी उपाय मानले जातात.
