How To Improve Knee Health : चुकीचा आहार, व्यायामाची अयोग्य पद्धत आणि एकूणच चुकीची जीवनशैली या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे कामावरून आल्यावर पाठ, लॅपटॉपची बॅग घेतल्यावर खांदे दुखणे तर खूप दिवसांनी चालल्यावर गुडघे दुखणे आदी अनेक समस्या आपल्या सगळ्यांनाच जाणवतात. त्यामुळे गुडघे, पाय, कंबर, छाती, पाठ, खांदे यांच्या स्नायूंच्या मजबुतीकडेसुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे.
माधुरी दीक्षित यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने, जे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत; जे सोशल मीडियावर युजर्ससाठी उपयुक्त टिप्स शेअर करण्याच्याही प्रयत्नात असतात. अलीकडील एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी स्नायूंना बळकट करणे, गुडघे आणि सांध्यातील वेदना कमी करणे यांसाठी सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.
डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे…
हालचाल करा, पण अगदी हुशारीने – मजबूत गुडघ्यांसाठी त्यांची योग्य प्रकारे हालचाल होणे आवश्यक असते. जसे की, सायकलिंग, पोहणे, चालणे. जंप स्क्वॅट्स आणि इंटेन्स रन्स यांसारखे जड, गुडघ्यांना ताण देणारे व्यायाम टाळा. तर याबद्दल राजाजी नगर येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्सचे सल्लागार डॉक्टर विनय कुमारस्वामी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सायकलिंगमुळे संधिवात, गुडघेदुखीशी लढण्यास मदत मिळतेच; पण त्यामुळे सांध्यांवरील ताणही कमी होतो. त्यामुळे सांध्यांची झीज कमी होते आणि सतत पेडलिंग केल्यामुळे सायनोव्हियल फ्लुइडचे उत्पादन वाढते, जे निरोगी सांध्यांसाठी महत्वाचे असते.
तुमच्या वजनाचा गुडघ्यांवर होतो परिणाम – तुमचं वजन थोडं जरी वाढलं, तरी त्याचा गुडघ्यांवर खूप ताण येतो. जसं की, तुमचं एक किलो वजन वाढलं, तर गुडघ्यांवर ४ किलोंचा भार येतो. जर तुम्हाला वेदनारहित सांधे हवे असतील, तर व्यवस्थित जेवा आणि वारंवार हालचाल करा. त्याबद्दल दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीतील मॅक्स स्मार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंटचे संचालक डॉक्टर रमणिक महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, एक किलो वजनामुळे गुडघ्यांवर चार पट जास्त दबाव येऊ शकतो. म्हणून तुमचे गुडघे सक्रिय ठेवण्यासाठी दर तासाला घरात फेरफटका मारा आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा. जर तुमचे गुडघे सुजले असतील, तर आरामासाठी बर्फाचे पॅक किंवा हीट पॅक वापरा.
गुडघ्याला आधार द्या – तुमच्या गुडघ्यांना आधाराची गरज आहे. आठवड्यातून दोन-तीन वेळा स्क्वॅट्स, लेग लिफ्ट्स व कर्ल करा आणि तुमच्या क्वाड्स, हॅमस्ट्रिंग व कॅव्हल्सना प्रशिक्षित करा. चुकीच्या आसनामुळे सांध्यांवर, विशेषतः गुडघ्यांवर ताण येतो; जे शरीरातील सर्वांत मोठा भार सहन करतात. अतिरिक्त दबाव पडल्यामुळे गुडघेदुखी संभवते. त्यामुळे वेळोवेळी तुमच्या वजनावर लक्ष ठेवा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत वजन कमी करण्याचे व्यायाम समाविष्ट करा, असे डॉक्टर महाजन म्हणाले.
योग्य शूज घाला – चुकीचे शूज घातल्यामुळे गुडघ्याला दुखापत होऊ शकते. आर्च सपोर्ट किंवा गादीसारखे नरम असणारे शूज निवडा. हील्स, फ्लॅट्स व स्नीकर्स घालणे टाळा. कारण- तुमचे पाय तुमच्या पोश्चरला आणि गुडघ्याच्या आरोग्याला आकार देतात.
RICE पद्धत फॉलो करा – जर तुमच्या गुडघ्याला दुखापत झाली असेल, तर जलद आराम मिळण्यासाठी RICE ही पद्धत वापरा.
R म्हणजे Rest- विश्रांती
I म्हणजे Ice- बर्फ
C म्हणजे Compression- दाब
E म्हणजे Elevation– उंची
सूज कमी करण्यासाठी आणि जलद बरे होण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे.
फिट राहण्यासाठी स्ट्रेचिंग करा – फिट राहण्यासाठी स्ट्रेचिंग करा- स्नायू कडक झाल्यामुळे गुडघ्यांवर ताण येऊ शकतो. पण, दररोज ५ मिनिटे स्ट्रेचिंग केल्याने आराम मिळून भविष्यात होणाऱ्या वेदना टाळता येतात. त्यामुळे स्टँडिंग स्क्वॉड स्ट्रेच, कॅल्फ स्ट्रेच व हॅमस्ट्रिंग स्ट्रेच वापरून पाहा.