Antiseptic Liquid On Wounds Side Effects : बहुतांश वेळा सर्वजण जखमेवर थेट तीव्र किंवा कन्सेंट्रेटेड (Concentrated) अँटीसेप्टिक लिक्विड लावण्याची चूक करतो परंतु, इमर्जन्सी रिस्पॉन्स स्पेशालिस्ट आणि ट्रेनर असणाऱ्या डिजिटल क्रिएटर रुची (इंस्टाग्राम आयडी: @thepanicprofessor) यांनी एका माहितीपूर्ण व्हिडिओद्वारे अँटीसेप्टिक लिक्विड वापरताना कोणत्या प्रकारच्या चुका करतात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
अँटीसेप्टिक लिक्विड पूर्णपणे तीव्र (Undiluted) असताना, त्यामधील मुख्य घटक असलेले ‘क्लोरोक्सिलेनॉल’ (Chloroxylenol) हे दाहक (Corrosive) ठरते. ते निरोगी पेशी आणि बॅक्टेरिया यांमधील फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे ते बॅक्टेरियाबरोबरच त्वचेच्या बरे होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चांगल्या पेशींनाही मारून टाकते,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जेव्हा हे लिक्विड पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून सौम्य (Dilute) केले जाते, तेव्हाच ते प्रभावी ठरते. पाण्याचा वापर न करता थेट जखमेवर लावल्यास, जखम बरी होण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो.
रुची यांनी सांगितले की, हे अँटीसेप्टिक लिक्विड आणि पाण्याचे प्रमाण १:२० (1:20) या प्रमाणात असायला हवे. परंतु, या शिफारसीबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? जाणून घेऊ..
बेंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे सिनियर कन्सल्टंट (इंटरनल मेडिसिन) डॉ. बुंदा एम. एस. सांगतात की, अँटीसेप्टिक लिक्विड हे किरकोळ जखमा, ओरखडे आणि कट साफ करण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे, परंतु त्याचा वापर नेहमी बाटलीवरील सूचनांनुसारच केला पाहिजे. उत्पादनाचा योग्य वापर करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
अँटीसेप्टिक लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत, बाधित भाग स्वच्छ पाण्याने हळुवारपणे साफ करावा आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी शिफारस केलेल्या प्रमाणातच लिक्विड वापरावे. डॉ. बुंदा पुढे सांगतात, वैद्यकीय सल्ल्याशिवाय खोल जखमा, गंभीर भाजलेले भाग किंवा त्वचेच्या मोठ्या भागावर अँटीसेप्टिक वापरणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सामान्यपणे होणाऱ्या चुका
डॉक्टरांच्या मते, लोक अनेकदा अशी चूक करतात की जखम लवकर बरी व्हावी म्हणून ते वारंवार किंवा जास्त प्रमाणात अँटीसेप्टिक लिक्विड वापरतात. परंतु, डॉ. बुंदा यांनी इशारा दिला की, अतिवापरामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते, जखम भरून येण्यास उशीर होऊ शकतो आणि त्वचा कोरडी किंवा लाल पडू शकते. दुसरी मोठी चूक म्हणजे अँटीसेप्टिक थेट खोल जखमेमध्ये टाकणे किंवा दोन वेगवेगळी अँटीसेप्टिक उत्पादने एकत्र करणे, ज्यामुळे त्वचेवर रिॲक्शन येऊ शकते आणि त्रास वाढू शकतो.
तसेच, लोकांनी एक्स्पायरी डेट संपलेले अँटीसेप्टिक लिक्विड वापरणे, अस्वच्छ हातांनी बाटलीच्या तोंडाला स्पर्श करणे किंवा डॉक्टरांनी सुचवले असल्यास अँटीसेप्टिक सुकण्यापूर्वीच जखमेवर पट्टी बांधणे टाळले पाहिजे, असेही डॉ. बुंदा यांनी स्पष्ट केले.
वापराचे योग्य प्रमाण (How to use Antiseptic Liquid)
तज्ज्ञांच्या मते, दैनंदिन वापरासाठी अँटीसेप्टिक लिक्विडचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे:
अंघोळीसाठी: एका बादली पाण्यात (१० लीटर) ५ मिली (5ml).
प्रथमोपचारासाठी (जखमेसाठी): ३०० मिली पाण्यात १५ मिली लिक्विड (१:२० प्रमाण).
शेव्हिंगसाठी: ३०० मिली पाण्यात १५ मिली.
लहान मुलांचे कपडे / नॅपी धुण्यासाठी: ५०० मिली पाण्यात १२.५ मिली.
डॉ. बुंदा शेवटी सांगतात की, काही लोक जखम व्यवस्थित साफ करण्याऐवजी थेट अँटीसेप्टिक लावतात, जी एक चुकीची पद्धत आहे. जखमेवरील धूळ आणि कचरा स्वच्छ करणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. उत्पादनावरील सूचनांचे पालन करणे आणि गंभीर दुखापतींसाठी डॉक्टरांची मदत घेणे हाच जखम बरी करण्याचा सुरक्षित मार्ग आहे.
