Coffee Vs Green Tea : आपल्यापैकी अनेकांना कॉफी प्यायला आवडते; पण जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर दररोज दोन कप कॉफी पिणेसुद्धा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण- यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका दुप्पट वाढू शकतो, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. पण, ग्रीन टी किंवा एक कप कॉफीमुळे असा सारखाच परिणाम दिसून आलेला नाही.
‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेलेले लोक; जे खूप जास्त कॉफी पितात, त्यांनाच हा धोका दिसून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कितीही रक्तदाब असला तरी जे लोक दिवसातून फक्त एकदा कॉफी पितात आणि दररोज ग्रीन टीचे सेवन करतात; त्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका जास्त नसतो.
नवी दिल्ली येथील बीएलके (BLK) मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे नीरज भल्ला सांगतात, “कॅफिनचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते का, यावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र, या अभ्यासात नियंत्रित प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्यास कोणताही धोका नाही”, असे म्हटले आहे.
ते पुढे सांगतात, “एक कप कॉफीमध्ये ८० ते ९० मिलिग्रॅम कॅफिन असते; ज्यामुळे रक्तदाब, हृदयाची गती वाढणे व रक्तवाहिन्या आकुंचन पावणे यांसारखे त्रास होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त कॉफी पिणे चांगले नाही. कॉफीचे अतिसेवन हे तणावास कारणीभूत असते. कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीर आणि जीवनशैलीवर परिणाम होतो; ज्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.”

हेही वाचा : नेहमी मोमोज खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

मॅक्स हेल्थकेअरच्या न्युट्रिशन अँड डायटेटिक्स या विभागाच्या प्रमुख रितिका समद्दार सांगतात, “या अभ्यासातून आम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना आम्ही नेहमी जास्त कॉफी पिण्यापासून सावध राहण्याचा सल्ला देतो. कॅफिनच्या अतिसेवनामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. त्याउलट ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते; ज्यामुळे हृदयावर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येत नाही.”

या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक सांगतात, “आमच्या अभ्यासाचे प्रमुख उद्दिष्ट होते की, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींवर कॉफीचा प्रभाव दिसून येतो की नाही, हे तपासणे आणि त्याच लोकांवर ग्रीन टीचा परिणामसुद्धा तपासणे. या अभ्यासातून असे दिसून आले की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी जास्त कॉफी पिणे टाळावे.

हेही वाचा : Eating Food : दर दोन तासांनी खाणे चांगले आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… 

यापूर्वीच्या अभ्यासातून असे समोर आले होते की, दररोज एक कप कॉफी हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते आणि निरोगी लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकपासून दूर ठेवू शकते.
काही इतर अभ्यासांमध्ये असेही समोर आले आहे की, कॉफीचे नियमितपणे सेवन केल्यामुळे लोकांना दीर्घकालीन आजार आणि नैराश्याचा धोका कमी होतो. त्याशिवाय भूकसुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

संशोधकांच्या मते, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी कॉफी आणि ग्रीन टीच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेणे, गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If people have high bp then two cups of coffee or green tea which is better for heart health ndj
First published on: 10-09-2023 at 14:39 IST