What Happens To Body If Stop Eating Potatoes: बटाटा हा अनेकांचा जीव की प्राण असतो. म्हणजेच काही सुचलं नाही की पटकन बटाटा वापरून वेळ व कष्ट सुद्धा वाचवता येतात. अगदी बटाट्याच्या काचऱ्या ते बटाटे वडे, पापड, कीस, चकल्या, ठेचा.. जी म्हणाल ती रेसिपी बटाटा वापरून करता येते. अगदी एवढंच नाही कधी भाताबरोबर डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर पटकन बटाटा आणि चार मसाले घालून पुलाव करता येतो. भाजीत- डाळीत मीठ-तिखट कमी जास्त पडलं तरी बटाटा आपली रेसिपी फसण्यापासून वाचवतो. पण कितीही फायदे असले तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे बटाट्याचे अधिक सेवन हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते. वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक फायद्यांसाठी बटाट्याचे सेवन कमी किंवा बंद करण्यास सांगितले जाते. आज आपण एक प्रयोग म्हणून समजा तुम्ही एक महिना बटाटा खाल्ला नाही तर काय होईल हे पाहणार आहोत. बटाटे खाणे बंद केल्याचे फायदे (Benefits of Avoiding Potatoes) इंडियन एक्सप्रेसने प्राची जैन, मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि एचओडी (न्युट्रिशन आणि डायटेटिक्स), सीके बिर्ला हॉस्पिटल, यांच्याशी संवाद साधून बटाटा आहारातून वगळण्याचे फायदे व तोटे यांची सविस्तर माहिती दिली आहे. प्राची जैन सांगतात की, बटाटा हा ऊर्जा प्रदान करणारा उत्तम स्रोत आहे पण त्या जोडीने तो कॅलरीजचे प्रमाण सुद्धा वाढवतो परिणामी ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी बटाटा घातक ठरू शकतो. तसेच आहारतज्ज्ञ शिवानी अरोरा यांनीही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, "एका महिन्यासाठी तुमच्या आहारातून बटाटे काढून टाकल्यास शरीरात अनेक चांगले बदल घडू शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या ऐवजी कमी कॅलरीज असणारे पण समान चवीचे पर्याय निवडू शकता. हे पर्याय सुद्धा आपण लेखाच्या शेवटी जाणून घेणार आहोत. अरोरा पुढे सांगतात की, "बटाट्यातील स्टार्चमुळे रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते, म्हणून बटाटे वगळल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. आपल्या आहारातून बटाटे काढून टाकल्याने कार्बोहायड्रेटचे सेवन कमी होते, ज्यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारू शकते." डॉ. किरण दलाल, मुख्य आहारतज्ज्ञ, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल सांगतात की, बटाट्यापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये मीठ (सोडियम) जास्त असते. जास्त मीठ हे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. बटाट्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळल्याने हा धोका कमी होऊ शकतो. आहारातून बटाटे वगळण्याचे तोटे (Cons of Avoiding Potatoes) बटाटे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक प्रदान करतात. बटाटे पूर्णपणे वगळल्यास पोषण मिळण्यात अडचण येऊ शकते. बटाट्यामध्ये असणारे फायबर जे पचनासाठी आवश्यक असतात त्यामुळे फायबरचा दुसरा पर्याय न शोधल्यास पचनात व्यत्यय येऊन आतड्यांचे आरोग्य सुद्धा बिघडू शकते. डॉ.दलाल सांगतात की, काही बटाट्यांमध्ये आढळणारा सुरक्षित स्टार्च हा प्रकार एक प्रिबायोटिक म्हणून काम करतो ज्याने आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. बटाटा आहारातून काढून टाकल्यास हे फायदे मिळणे बंद होते. शिवाय प्राची जैन यांनी नमूद केले की बटाटे सर्वत्र अगदी वाजवी दरात सहज उपलब्ध आहेत आणि सामाजिक-आर्थिक स्थिती आणि वय विचारात न घेता प्रत्येकाच्या आहारात त्यांचा समावेश केला जातो, बटाटा वगळल्यास जेवणाचे प्लॅनिंग करणे थोडे वेळखाऊ ठरू शकते. बटाट्याचे पर्याय (Options Of Potatoes) रताळे: अगदी बटाट्यासारखाच पोत व चव असणारे रताळे हा बटाट्याला सर्वोत्तम पर्याय आहे. फ्लॉव्हर: मॅश केलेले किंवा तळलेले फ्लॉव्हर हे बटाट्यांसारखेच लागतात. केळे: कच्चे केळे तळून किंवा बेक करून बटाट्यासारखे खाल्ले जाऊ शकते. चिप्स, वडे, फ्रेंच फ्राईज सारख्या पदार्थांसाठी सुद्धा केळ्याचा वापर करता येऊ शकतो. झुकिनी: कार्ब्सचे प्रमाण कमी असल्याने झुकिनी हा सुद्धा बटाट्याला उत्तम पर्याय ठरू शकतो. हे ही वाचा<< ३० दिवस जेवणात तेल वापरणं बंद केल्यास वजन कमी होऊन हृदय राहील स्वस्थ? एका महिन्यात शरीरात काय बदलेल? दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, काहींनी बटाटे खाताना सावधगिरी बाळगायला हवी. डायबिटीस, किडनी किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी बटाट्याचे सेवन टाळणेच उत्तम ठरेल. आहारतज्ज्ञ विलासिनी भास्करन सांगतात की, बटाट्यांचे फायदे व तोटे पाहता त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्यापेक्ष प्रमाणात सेवन करणे हिताचे ठरेल. शिवाय आपण कोणत्या प्रकारे बटाट्याचे सेवन करताय याकडेही लक्ष द्या. उकडलेल्या बटाट्यांमध्ये तळलेल्या बटाट्यांपेक्षा कमी कॅलरी असतात. अशा गोष्टी नेटाने पाळल्यास समतोल आहार राखता येऊ शकतो.