मुंबई : वृद्धांमध्ये वाढत्या एकाकीपणाचा मेंदूवर होणारा परिणाम आता गंभीर सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा बनत आहे. अलीकडील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की एकाकीपणामुळे वृद्धांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. मात्र तो स्मृती क्षीण होण्याचा वेग वाढवत नाही.या अभ्यासाने वृद्धांच्या मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाचा दृष्टिकोन समोर आणला आहे.
या संशोधनात युरोपातील ६५ ते ९४ वयोगटातील सुमारे १०,००० हून अधिक लोकांचा सात वर्षे अभ्यास करण्यात आला. सहभागींच्या एकाकीपणाच्या पातळीचे मूल्यांकन ‘आपण एकटे वाटते का’, ‘कोणी सोबत नाही असे वाटते का’ अशा प्रश्नांद्वारे करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या स्मरणशक्तीची चाचणी तात्काळ आणि विलंबित आठवणींवर आधारित होती. हा अभ्यास युरोपमधील ‘शेअर’ (सर्व्हे ऑफ हेल्थ, एजींग ऑण्ड रिटायरमेंट इन युरोप) या मोठ्या डेटावर आधारित आहे.संशोधनाचे निष्कर्ष एजींग अँण्ड मेंटल हेल्थ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून हा अभ्यास डॉ. वेनेगास-सानाब्रिया यांच्या नेतृत्वाखालील कोलंबिया, स्पेन आणि स्वीडनच्या संशोधकांनी संयुक्तपणे केला आहे.
अभ्यासात असे दिसून आले की जे वृद्ध अधिक एकाकी होते त्यांची सुरुवातीची स्मरणशक्ती तुलनेने कमी होती. म्हणजेच माहिती लक्षात ठेवणे आणि नंतर आठवणे यामध्ये त्यांची कामगिरी इतरांच्या तुलनेत कमी होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे कालांतराने त्यांच्या स्मरणशक्तीतील घसरणीचा वेग इतरांप्रमाणेच होता. म्हणजेच एकाकीपणामुळे स्मृतीची गुणवत्ता कमी होऊ शकते पण ती झपाट्याने खालावत नाही.संशोधकांच्या मते एकाकीपणाचा परिणाम मुख्यतः स्मरणशक्तीच्या सुरुवातीच्या पातळीवर दिसून येतो. यामुळे हे सूचित होते की, मेंदूवर होणारे नकारात्मक परिणाम आयुष्याच्या आधीच्या टप्प्यांमध्येच सुरू होऊ शकतात. त्यामुळे वृद्धावस्थेत दिसणारी स्मरणशक्तीची कमतरता ही एकाकीपणाच्या दीर्घकालीन परिणामांची देणगी असू शकते.
या अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे वय हा स्मरणशक्ती कमी होण्याचा सर्वात मोठा घटक आहे. विशेषतः ७५ वर्षांनंतर आणि ८५ वर्षांनंतर स्मरणशक्ती अधिक वेगाने घटते. त्याशिवाय नैराश्य (डिप्रेशन), मधुमेह यांसारख्या आजारांमुळेही स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.तज्ञांच्या मते, एकाकीपणा हा केवळ भावनिक समस्या नसून तो मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे.
सामाजिक संपर्क कमी झाल्यास मेंदूला आवश्यक उत्तेजना मिळत नाही ज्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे वृद्धांनी सामाजिक संबंध टिकवणे, गटात सहभागी होणे, छंद जोपासणे यासारख्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. जगभरात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असताना, एकाकीपणावर नियंत्रण ठेवणे ही मोठी गरज बनत आहे. या संशोधनातून हे स्पष्ट होते की, एकाकीपणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम मेंदूच्या आरोग्यावर दीर्घकालीन स्वरूपात दिसू शकतात.
त्यामुळे केवळ वैद्यकीय उपचारांवर भर न देता, सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या उपाययोजनांवरही तितकाच भर देणे गरजेचे आहे. या अभअयासातून दिसून आले की वृद्धांच्या आयुष्यात सामाजिक नातेसंबंध आणि संवाद टिकवणे हे केवळ आनंदासाठी नव्हे तर त्यांच्या स्मरणशक्तीच्या आरोग्यासाठीही अत्यावश्यक आहे.
