मुंबई: भारतातील स्तन कर्करोगाच्या रुग्णसंख्येत १९९० ते २०३० या कालावधीत जवळपास १.३ पट वाढ झाल्याचे २०४ देशांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सहा बदलता येण्याजोगे जोखमीचे घटक वेळीच हाताळले नाहीत तर २०५० पर्यंत रुग्णसंख्येत आणखी मोठी वाढ होऊ शकते असा इशाराही या अभ्यासात देण्यात आला आहे. २०५० पर्यंत जगभरातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाच्या नव्या रुग्णांची संख्या ३५.६ लाखांपर्यंत पोहोचू शकते आणि मृत्यूंची संख्या १३.७ लाखांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेटर्सच्या अहवालानुसार, भारतातील स्तन कर्करोगाचा दर १९९० मध्ये प्रति एक लाख महिलांमागे १३ होता, तो २०२३ मध्ये २९.४ प्रति एक लाखांपर्यंत वाढला आहे. याच काळात वयानुसार प्रमाणित मृत्यूदर ८.९ वरून १५.५ पर्यंत वाढला असून, भारतातील स्तन कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.

जागतिक स्तरावर स्तन कर्करोग हा महिलांमध्ये कर्करोगाशी संबंधित आजार आणि अकाली मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. २०२३ मध्ये सुमारे २३ लाख नवीन स्तन कर्करोगाचे रुग्ण आणि ७.६ लाख मृत्यूंचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०५० पर्यंत, उपचारातील प्रगती असूनही, रुग्णसंख्या एकतृतीयांशाने वाढून ३.५ दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते, असे लॅन्सेटच्या अभ्यासात नमूद केले आहे.

Award Banner

टाटा मेमोरियल सेंटरच्या नव्या अभ्यासानुसार, आधुनिक कर्करोगावरील औषधे, विशेषतः इम्युनोथेरपी, भारतातील आणि जगातील बहुसंख्य लोकांसाठी अत्यंत महागडी आहेत. सहा महिन्यांच्या इम्युनोथेरपी उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पेंब्रोलिझुमॅब या औषधाचा खर्च बहुसंख्य भारतीयांच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या जवळपास ८० पट असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.मध्यम उत्पन्न असलेल्या भारतासारख्या देशांमध्ये स्तन कर्करोगाचा एकूण आर्थिक बोजा २०२१ मध्ये सुमारे ८.१३ अब्ज डॉलर्स इतका होता आणि २०३० पर्यंत तो १४ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

या आजारामुळे गमावल्या जाणाऱ्या आरोग्यदायी आयुष्यापैकी चतुर्थांश हानी ही सहा बदलता येण्याजोग्या जोखमीच्या घटकांमुळे होते ज्यात जास्त प्रमाणात लाल मांसाचे सेवन, तंबाखू, उच्च रक्तातील साखर आणि जादा वजन (बीएमआय) यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतिबंधासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. तज्ञांनी सरकारने व्यापक जनजागृती मोहीम, नियमित तपासणी कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य पातळीवर लवकर निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास स्तन कर्करोगावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.भारतामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी ही वाढती आकडेवारी इशारा देणारी असून, प्रतिबंध आणि लवकर उपचार यावर भर देणे अत्यावश्यक ठरत आहे.