मुंबई : भारतात सुमारे १ कोटी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या (सर्व्हायकल कॅन्सर) प्रकरणांना आळा घालू शकतो असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष अलीकडील ‘लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासातून समोर आला आहे. मात्र, या मोठ्या उद्दिष्टाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा म्हणजे एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाचे कमी प्रमाण असल्याचेही या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गर्भाशयमुखाचा कर्करोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ९०-७०-९० अशी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार १५ वर्षांपर्यंतच्या मुलींमध्ये ९० टक्के एचपीव्ही लसीकरण, ३५ ते ४५ वयोगटातील ७- टक्के महिलांची किमान दोनदा तपासणी आणि निदान झालेल्या ९० टक्के महिलांवर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. या तीन टप्प्यांवर काटेकोरपणे काम केल्यास पुढील शतकात जागतिक स्तरावर सुमारे ३७ दशलक्ष (३.७ कोटी) प्रकरणे टाळता येऊ शकतात असे संशोधकांनी नमूद केले आहे.
भारताच्या संदर्भात पाहिले तर ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. अभ्यासानुसार जर देशात एचपीव्ही लसीकरण आणि तपासणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले तर १ कोटीपेक्षा जास्त गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची प्रकरणे रोखता येऊ शकतात. यामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर आरोग्य व्यवस्थेवरील ताणही मोठ्या प्रमाणात घटेल.तथापि, सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात एचपीव्ही लसीकरणाचा कव्हरेज अजूनही अत्यंत कमी आहे. यामुळे भविष्यातील धोका वाढण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार जर लसीकरणाचा वेग वाढवला गेला नाही, तर शतकाच्या अखेरीस भारतातील गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा दर उच्च उत्पन्न देशांच्या तुलनेत १२ पट जास्त होऊ शकतो. सध्या हा फरक सुमारे २ पट आहे जो पुढील काळात अधिक तीव्र होऊ शकतो.
दुसरीकडे, उच्च उत्पन्न देशांमध्ये परिस्थिती तुलनेने सकारात्मक दिसते. तेथे सध्याच्या लसीकरण आणि तपासणी मोहिमांमुळे २०४८ पर्यंत गर्भाशयमुखाचा कर्करोग जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र कमी व मध्यम उत्पन्न देशांमध्ये प्रगती मंद गतीने होत असल्याने जागतिक स्तरावर आरोग्य विषमता वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. भारतासाठी एक आशेचा किरण म्हणजे जर देशाने ९० टक्के एचपीव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले तर आगामी काही काळात गर्भाशयमुखाचा कर्करोग जवळपास पूर्णपणे नष्ट करणे शक्य होईल. एवढेच नव्हे तर या प्रयत्नांमुळे पुढील शतकात सुमारे ६० लाख प्रकरणे स्वतंत्रपणे टाळता येतील, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत केवळ लसीकरणच नव्हे, तर जागरूकता वाढवणे, नियमित तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि उपचार व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यावरही तितकाच भर देणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि कमी उत्पन्न गटांपर्यंत या सेवा पोहोचवणे ही मोठी गरज आहे.भारताकडे गर्भाशयमुखाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात कमी करण्याची आणि दीर्घकालीन पातळीवर तो नष्ट करण्याची ऐतिहासिक संधी आहे. मात्र, यासाठी तातडीने आणि मोठ्या प्रमाणावर एचपीव्ही लसीकरण, तपासणी आणि उपचार या तिन्ही स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. योग्य धोरणे आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून भारत हा टाळता येण्याजोगा कर्करोग मोठ्या प्रमाणात रोखू शकतो.
