मुंबई : देशातील आरोग्यसेवेत महत्त्वाचा टप्पा गाठत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायनन्सेस (एम्स) येथे भारतातील पहिले पोर्टेबल एमआरआय मशीन सुरू करण्यात आले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता गंभीर रुग्णांची मेंदू तपासणी थेट त्यांच्या बेडशेजारीच करता येणार असून, उपचार प्रक्रियेत मोठी सुलभता आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामान्यतः एमआरआय स्कॅनसाठी रुग्णाला विशेष कक्षात हलवावे लागते. विशेषतः आयसीयू मध्ये दाखल असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना हलवणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत नव्याने सुरू करण्यात आलेले पोर्टेबल एमआरआय मशीन मोठा दिलासा देणारे ठरत आहे. हे उपकरण थेट रुग्णाच्या बेडपर्यंत नेऊन तपासणी करता येते, ज्यामुळे रुग्ण हलवण्याची गरजच राहत नाही.

तज्ञांच्या मते हे मशीन ‘अल्ट्रा-लो-फील्ड’ एमआरआय तंत्रज्ञानावर आधारित आहे. पारंपरिक एमआरआय मशीनच्या तुलनेत याची क्षमता काही प्रमाणात कमी असली तरी ते जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आहे. विशेषतः स्ट्रोक, मेंदूवरील दुखापत, न्यूरोलॉजिकल आजार आणि स्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांच्या स्थितीचे तात्काळ मूल्यांकन करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

एम्स मधील डॉक्टरांनी सांगितले की या उपकरणामुळे आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. रुग्णाच्या स्थितीचे त्वरित चित्र मिळाल्यामुळे डॉक्टरांना उपचाराची दिशा लगेच ठरवता येईल. विशेषतः मेंदूविकारांमध्ये वेळेचे महत्त्व लक्षात घेता, हे तंत्रज्ञान जीव वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.याशिवाय, हे मशीन बालरुग्णांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. लहान मुलांना एमआरआयसाठी हलवताना किंवा त्यांना स्थिर ठेवताना येणाऱ्या अडचणी टाळता येणार आहेत. त्यामुळे बालरुग्णांच्या तपासणी प्रक्रियेतही सुधारणा होणार आहे.

तथापि, तज्ञांनी स्पष्ट केले आहे की हे पोर्टेबल एमआरआय मशीन पारंपरिक एमआरआयची पूर्णतः जागा घेणार नाही. सखोल आणि तपशीलवार तपासणीसाठी मोठ्या एमआरआय मशीनची गरज कायम राहणार आहे. मात्र, आपत्कालीन आणि गंभीर परिस्थितीत हे उपकरण एक प्रभावी पूरक साधन म्हणून काम करेल.

जगातील अनेक प्रगत देशांमध्ये पोर्टेबल एमआरआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून, भारतात त्याची सुरुवात होणे ही आरोग्य क्षेत्रासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तांत्रिक प्रगतीला चालना मिळणार असून, भविष्यात इतर रुग्णालयांमध्येही अशा उपकरणांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. एम्समध्ये सुरू करण्यात आलेले हे पोर्टेबल एमआरआय मशीन रुग्णसेवेत मोठा बदल घडवून आणणारे ठरणार असून गंभीर रुग्णांच्या उपचारात नवी दिशा देणारे तंत्रज्ञान म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.