मुंबई: भारताने एचआयव्ही विरोधातील लढाईत गेल्या दोन दशकांत उल्लेखनीय यश मिळविले आहे. नव्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले, एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आणि लाखो रुग्ण नियमित उपचारांमुळे सामान्य आयुष्य जगू लागले आहेत. मात्र या यशामागे आता एक नवे आणि अधिक गुंतागुंतीचे आव्हान उभे राहत आहे. एचआयव्हीसह दीर्घकाळ जगणाऱ्या रुग्णांमध्ये वृद्धत्वाशी संबंधित आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी ईशान्य भारतातील काही राज्ये आणि पंजाबमध्ये इंजेक्शनद्वारे अमली पदार्थांच्या वापरामुळे एचआयव्हीची नवी हॉटस्पॉट्स निर्माण होत असल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमामुळे भारतात एचआयव्ही नियंत्रणात मोठे यश मिळाले आहे. २०१० नंतर नव्या एचआयव्ही संसर्गात ४४.२ टक्क्यांची घट झाली असून एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७९.२ टक्क्यांनी घट झाली आहे. देशात सध्या सुमारे २५.४ लाख नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. त्यापैकी १८ लाखांहून अधिक रुग्ण अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) घेत आहेत. उपचार सुरू ठेवणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के तर उपचारांमुळे शरीरातील विषाणूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. या आकडेवारीवरून भारताने एचआयव्ही व्यवस्थापनात मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट होते.

मात्र आता एचआयव्ही हा केवळ संसर्गजन्य आजार राहिलेला नाही. प्रभावी औषधोपचारांमुळे रुग्णांचे आयुर्मान वाढल्याने ते वृद्धत्वाकडे वाटचाल करत आहेत. देशातील एचआयव्हीग्रस्तांपैकी सुमारे ३७ टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, हाडांची झीज, स्मृतिभ्रंश आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका या रुग्णांमध्ये वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे एचआयव्हीवरील उपचारांसोबतच असंसर्गजन्य आजारांचे नियमित निदान आणि उपचारही तितकेच महत्त्वाचे बनले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीग्रस्त रुग्णांना दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे चयापचयातील बदल, वजन वाढणे, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय वाढते वय आणि जीवनशैलीतील बदलही या समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे एचआयव्ही उपचार केंद्रांमध्ये आता मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मूत्रपिंड आणि यकृताच्या तपासण्या नियमित करण्याची गरज निर्माण झाली आहे.देशाच्या बहुतांश भागात लैंगिक संबंधांद्वारे होणारा एचआयव्ही संसर्ग कमी होत असला, तरी ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, तसेच पंजाबमध्ये इंजेक्शनद्वारे अमली पदार्थांच्या वापरामुळे एचआयव्हीचा प्रसार वाढत आहे. एका व्यक्तीने वापरलेली सुई दुसऱ्याने वापरणे हे संसर्गाचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे या भागांमध्ये सुई आणि सिरिंज बदल कार्यक्रम, व्यसनमुक्ती सेवा, समुपदेशन आणि नियमित तपासणी अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीविरोधातील पुढील लढाई केवळ विषाणूविरुद्ध नसून वृद्धत्वाशी संबंधित आजारांविरुद्धही असेल. एचआयव्हीग्रस्तांसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा विकसित करणे, मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे, कर्करोग तपासणी, हृदयविकार आणि मधुमेहाची नियमित तपासणी तसेच पोषण आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक ठरणार आहे. याशिवाय उच्च जोखमीच्या गटांमध्ये प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस सारख्या प्रतिबंधात्मक औषधांचा वापर वाढविल्यास नव्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.भारताने संयुक्त राष्ट्रांच्या ९५-९५-९५ उद्दिष्टांच्या दिशेने मोठी प्रगती केली असली, तरी नव्या आव्हानांमुळे आरोग्य धोरणात बदल करणे आवश्यक ठरत आहे. संसर्ग रोखण्याबरोबरच एचआयव्हीसह जगणाऱ्या नागरिकांचे दीर्घकालीन आरोग्य, जीवनमान आणि सामाजिक सुरक्षितता यांनाही समान प्राधान्य द्यावे लागणार आहे. एचआयव्ही हा आता मृत्यूचा नाही, तर दीर्घकालीन व्यवस्थापनाचा आजार बनला असला तरी वृद्धत्व, मधुमेह आणि नव्या हॉटस्पॉट्सची वाढ ही भारताच्या एचआयव्हीविरोधातील लढाईतील पुढची मोठी परीक्षा ठरणार आहे.