scorecardresearch

ताप, सर्दी, खोकल्यावरील ‘ही’ औषधं आरोग्यासाठी घातक! IMA चं डॉक्टरांना आवाहन

देशभरात ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होतेय.

indian medical association advises to avoid antibiotics amid surge in fever cases h3n2 influenza virus
आयएमएचं डॉक्टरांना पत्र ( PHOTO CREDIT – pexels)

वातावरणातील बदलांमुळे आणि H3N2 वाढत्या संसर्गामुळे देशभरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. अशा रुग्णांना डॉक्टरांनी अँटिबायोटिक्स औषध लिहून देणे टाळण्याचे आवाहन आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केले आहे. यासंदर्भात आयएमएने एक अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये, डॉक्टर, थेरपिस्टना ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या वाढत्या रुग्णांना प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक्सचे डोस देणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पत्रात काय म्हटले आहे?

ताप, खोकला, मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. यात तापाचा संसर्ग ५ ते ७ दिवस टिकतो आणि तीन दिवसानंतर निघून जातो. पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत सुरुचं असतो. मुख्यत: ५० वर्षांवरील आणि १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये ही लक्षणे आढळून येत आहेत. या संसर्गामागे वायूप्रदुषण देखील एक मुख्य कारण आहे. एनसीडीटीच्या माहितीनुसार, यातील बहुतांश प्रकरणं H2N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची आहेत. इन्फ्लूएंझा आणि इतर विषाणूंमुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे रुग्णांना जाणवणाऱ्या लक्षणांवरचं उपचार द्यावे, त्यांना अँटिबायोटिक्स औषध देण्याची गरज नसल्याचे नमूद केलं आहे, पण तरीही अनेक लोक सध्या अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिक्लॅव्ह या अँटीबायोटिक्सचा वापर करत आहेत. या औषधांचे डोस वारंवार घेतात आणि बरं वाटल की थांबवतात. पण ही औषधं सतत घेणं थांबवणे गरजेचे आहे, कारण यामुळे प्रतिजैविकांचा प्रतिकार केला जाऊ शकतो.

गरज नसतानाही रुग्णांना दिली जातात औषधं

अनेक अँटिबायोटिक्स औषधांचा दुरुपयोग केला जात आहे. यामुळे रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होत आहे. उदाहरणार्थ , ७० टक्के अतिसाराची प्रकरणं ही विषाणूजन्य अतिसाराची आहेत. यासाठी कोणत्याही अँटिबायोटिक्स औषधांची गरजं नसते. तरीही डॉक्टरांकडून ती औषधं लिहून दिली जातात. यात अमोक्सिसिलिन, नॉरफ्लॉक्सासिन, ओप्रोफ्लॉक्सासिन, ऑफ्लोक्सासिन, लेव्होफ्लोक्सासिन या अँटिबायोटिक्स औषधांचा सर्वाधिक गैरवापर केला जातो. ही औषधं अतिसार आणि यूटीआयसाठी वापरली जातात.

अँटिबायोटिक्स औषधं देण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक

अँटिबायोटिक्स औषध लिहून देण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णाला विषाणूचा संसर्ग आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात आणि पाय स्वच्छ धुण्याची सवय करा आणि लसीकरण करा, असे आवाहनही आयएमएने केल आहे.

तपासणीनंतर डॉक्टरांकडून जोपर्यंत अँटिबायोटिक्स औषधं दिली जात नाहीत तोपर्यंत लोकांनी ओव्हर-द-काउंटर अँटीबायोटिक्स घेणे टाळावे. ताप, सर्दी सारखी लक्षणं आढळल्यास रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच शरीर चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं औषधं घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 17:11 IST
ताज्या बातम्या