Indian Yoga Benefits-from Heart Attack to Cancer: जगाला भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनमोल देणग्यांपैकी; संगीत, आयुर्वेद याबरोबरच योगशास्त्र जगभर झपाट्याने पसरत आहे. महागड्या वैद्यकाला सगळेच जग कंटाळलेले आहे. सर्वच जण योग थेरपीचा वापर करून अनुभव घेत आहेत. आपल्याकडे घरोघर योगासनांचे लोण पसरले आहे. माझ्या वाचनातील एका पुस्तकात, योगासने या शब्दांऐवजी आरोग्यासने हा शब्द वापरलेला आहे. सर्वसामान्य जनतेला योगाचे अवडंबर माजवून, शंक प्रक्षालन, धौती, षट्क्रिया या शब्दांनी घाबरवून टाकण्यापेक्षा साधे-सोपे, फार तपशिलात्मक नसलेले व्यायामाचे प्रकार सांगता येतील. अशांचा मी गेली दोन तपे वापर करीत आहे. पुढे दिलेल्या व्यायामाच्या प्रकारांना ‘योगा’ असा अमेरिकन संस्कृतीचा शब्द मात्र चिकटवू नये, योग असेच म्हणावे.

सूर्यनमस्काराचा आग्रह

सूर्यनमस्काराचे महत्त्व मी नव्याने सांगावयाचे कारण नाही. पण मला अशी खात्री आहे की, योगासनांचा दिवसरात्र उद्घोष करणारे, आपल्या विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचा आग्रह धरत नाहीत. सूर्यनमस्कार चांगल्या प्रकारे घातले तर त्यात अनेक आसने केल्याचा शरीराला लाभ होत असतो. मी सगळ्या रुग्णांना किमान सहा सूर्यनमस्कार प्रत्येकी दोन – आई, वडील व देव यांच्या नावे घाला असे सांगतो. सूर्यनमस्कारामुळे बालक व तरुणांची उंची वाढतेच, प्रौढांची काम करण्याची ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. वृद्धांचे आरोग्य चांगले राहते. ते दीर्घायुषी होतात.

Indian_Yoga_Pritishree_Ingale
सूर्यनमस्कार (फोटो सौजन्यः प्रितीश्री इंगळे)

सहा ते पंचवीस नमस्कार

सूर्योपासना करणाऱ्यांना स्थौल्य, मधुमेह, खाज, अग्निमांद्य, मलावरोध, उदरवात, आमांश, क्षय इत्यादी विकार कधी त्रास देत नाहीत. प्रत्येक सूर्यनमस्कारानंतर दोन-चार क्षण श्वास घ्यावा, थोडा अधिक वेळ ठेवून सोडावा. सूर्यनमस्कार सावकाश घालावे, किमान सहापासून पंचवीस नमस्कारापर्यंत सावकाश पोहोचावे. हर्निया, गुडघेदुखी, सांधेदुखी, हृद्रोग, पोटदुखी, अल्सर, कमी रक्तदाब, पांडू, छातीत दुखणे या विकारात हा व्यायाम प्रकार तारतम्याने व सावकाश करावा. सूर्यनमस्कार घालताना रुंद पट्टीचा लंगोट अवश्य वापरावा.

पश्चिमोत्तानासन

वीस वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. माझ्याकडे एक तिशीच्या वयाचे गृहस्थ मूलबाळ नाही म्हणून उपचाराकरिता आले. गृहस्थांचे वजन भारी, पोट खूप मोठे व उंची कमी. त्यांना मी प्रथम वजन कमी करूया, पोट कमी करूया, मग औषधे सांगू असा सल्ला दिला. पोट व वजन कमी करण्याकरिता पश्चिमोत्तानासन किंवा ‘सीट अप्स्’ सुचविले. उताणे झोपून पाय न हलविता, डोके गुडघ्याला लावायचे, पुन्हा उताणे व्हायचे असा हा आसन प्रकार त्यांना काही जमेना. त्यांचे पाय मी घट्ट धरून थोडा तरी प्रयत्न करावयास शिकविले. या गृहस्थांनी हळूहळू सुरुवात करून हे आसन चांगलेच आत्मसात केले. त्यांचा एक महिन्यात इतका मोठा फायदा झाला की, पोटाचा घेर काही इंच कमी झाला, वजन घटले. लहान साईजच्या पॅँट शिवायची पाळी आली.

रिकाम्यापोटी करावयाचे आसन

पश्चिमोत्तानासन रिकाम्या पोटी करावे, पण अनेकदा खूप वेळा करू नये. पोटात विलक्षण दुखते. प्रथम तीन वेळा  करावे. रोज एक वेळा वाढवावे. या प्रकारे दहा वेळा पश्चिमोत्तानासन केल्यास लठ्ठ व्यक्तींचे पोट, नितंब यांचे वजन कमी होते. हा व्यायाम सावकाश करावा. यानंतर एकदम घाईने जेवू नये. कंबरेचे व आतड्यांचे दुखणे असणाऱ्यांनी हा व्यायाम करू नये. या व्यायामानंतर ‘कमान’ व्यायाम करावा व मग काही वेळ शवासनात स्वस्थ पडून राहावे.

शवासन

शवासन शब्दाला व्यायामाचा प्रकार म्हणजे ‘वदतो व्याघात’ आहे. ज्यात हालचाल नाही, व्यायामाचा अभाव आहे. त्याला व्यायाम कसे म्हणावे? आयुर्वेदात मूळ कारण द्रव्ये नऊ सांगितली आहेत. त्यात एखाद्या गोष्टीचा ‘अभाव’ हेसुद्धा द्रव्य मानले आहे. ज्या आसनात हालचाल, मग ती शरीरातील सर्व स्नायूंची, ऐच्छिक व अनैच्छिक अशा तीनही प्रकारांची होऊ नये अशी अपेक्षा असते; ते शवासन किंवा खडीवाल्यांच्या भाषेत ‘मुडदासन’ आहे. शवासनात एखाद्याा मुडद्यासारखे निर्विकार, बेफिकीर, बिनधास्त पडायला शिका, सर्व स्नायूंना मोकळे सोडा; कसलाही विचार न आणता, कोणताही जप मनात न करता उताणे स्वस्थ पडा.

हृदयरोगापासून ते कॅन्सरपर्यंत

शवासनात पाठीचा जास्तीत जास्त भाग चटई किंवा सतरंजीला टेकला पाहिजे. झोपण्यात उटंगळपणा नको. तरच शवासनाचा फायदा मिळतो. ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकात ‘स्थितप्रज्ञ कसा दिसतो?’ याबद्दल ‘काकाजी’ समोर गाढव कसे चरत आहे, बेफिकीर आहे तसा स्थितप्रज्ञ असतो, असे सांगतो. ज्यांना या प्रकारच्या शवासनाचा अभ्यास जमला, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे टेन्शन सहन करण्याचे, कसलेही वार, प्रहार सहन करण्याचे सामर्थ्य येते. हृद्रोग, रक्तदाबवृद्धी, अर्धांगवायू, अंग बाहेर येणे, कॅन्सर, घाम खूप येणे, चक्कर, छातीत दुखणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, जीर्णज्वर, क्षय, धाप, दुबळेपणा, पोटदुखी, फिट्स येणे, मनोविकार, वातविकार, उदरवात किंवा गॅस, सायटिका इत्यादी वात, पित्त व कफाच्या त्रिदोष प्रकोप विकारात शवासनामुळे रोगांचे स्वरूप वाढत नाही. आळा बसतो.

हे फक्त झोपण्याच आसन नाही

त्यानंतर मूळ कारणाकडे जाऊन रोगाचे निवारण करता येते. ‘हिप्नॉटिझम’ किंवा वशीकरण या काही विशेष विद्या आहेत, असे लोक सांगतात. मला वाटते, शवासन करणे किंवा करवून घेणे ज्यांना जमले ते मोठेच ‘हिप्नॉटिस्ट’ आहेत. मी काही रुग्णांना त्यांच्या अनिद्रा, रक्तदाबवृद्धी, छातीत दुखणे, धाप, चक्कर या विकारांत ‘मुडदासनाने’ जो उपशय-आराम मिळवून देऊ शकलो त्याचा अनुभव विलक्षण आहे.  म्हणूनच शवासन हे नुसते झोपण्याचे आसन नाही, हे लक्षात घ्यावे.