मुंबई : भारतातील तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला ८४ देशांपैकी ६०वे स्थान मिळाले आहे. २०२५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल माईंड हेल्थ’ अहवालातून ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार भारतातील १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य इतर अनेक देशांच्या तुलनेत कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकास्थित स्पाईन लॅब या संस्थेने केलेल्या या व्यापक सर्वेक्षणात भारतातील सुमारे ७८ हजार इंटरनेट वापरकर्त्यांचा सहभाग होता. अभ्यासात मानसिक आरोग्य मोजण्यासाठी माईंड हेल्थ कोशंट (एमएचक्यू) या निकषाचा वापर करण्यात आला. त्यानुसार भारतीय तरुणांचा सरासरी एमएचक्यू स्कोअर केवळ ३३ इतका नोंदवण्यात आला. याउलट ५५ वर्षांवरील नागरिकांचा स्कोअर ९६ इतका असून त्यांची मानसिक स्थिती तुलनेने अधिक स्थिर असल्याचे दिसून आले.
अहवालानुसार भारतात पिढ्यांमधील मानसिक आरोग्याची दरी वाढत असून तरुण वर्ग अधिक तणाव, अस्थिरता आणि भावनिक अडचणींना सामोरे जात आहे. ही समस्या केवळ चिंता किंवा नैराश्यापुरती मर्यादित नसून भावनांवर नियंत्रण ठेवणे, लक्ष केंद्रित करणे, नातेसंबंध टिकवणे आणि तणावातून सावरण्याची क्षमता यामध्ये घट होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.आज चौकोनी कुटुंब व्यवस्थेत नवरा बायको दोघेही नोकरी करतात. अशावेळी मुलांची अबाळ होते. बहुतेक कुटुंबात केवळ एकच मुलगा असतो. अशावेळ त्याचे मानसिक संवर्धन करण्यास कोणी नसतो. पूर्वी कुटुंब व्यवस्थेत आजीआजोबा तसेच अन्य नातेवाईक असत. त्यातून मुलांची मानसिक घडण, संस्कारादी सहज होत असत. आज लहानपणापासूनच मुलांमध्ये मानसिक दरी निर्माण होताना दिसत असल्याते तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, शारीरिक हालचालींचा अभाव तसेच डिजिटल साधनांचा अतिरेक हा मानसिक आरोग्य घसरण्याचा महत्त्वाचा घटक ठरत आहे.
अभ्यासात मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे चार प्रमुख घटक अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कुटुंबीयांशी कमी होत चाललेले संबंध, अध्यात्मापासून दूर जाणे, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते सेवन आणि लहान वयात स्मार्टफोनचा वाढता वापर यांचा समावेश आहे. आरोग्य व्यवस्थेत आजही मानसिक आरोग्य उपचाराला दुय्यम स्थान मिलताना दिसते. शासकीय पातळीवरही मानसिक आरोग्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नाही.
विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या विकसित देशांतील तरुणांनाही मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक प्रमाणात भेडसावत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या जागतिक क्रमवारीत घाना देशाने प्रथम स्थान पटकावले असून फिनलंडसारख्या आनंद निर्देशांकात आघाडीवर असलेल्या देशालाही अपेक्षेपेक्षा खालचे स्थान मिळाले आहे.मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर बाब बनत चालली असल्याने सरकार, शैक्षणिक संस्था आणि कुटुंब व्यवस्थेने एकत्रितपणे ठोस उपाययोजना राबविण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
