मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने इराणमधील आरोग्य सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत हा प्रकार केवळ एका देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण मध्यपूर्व प्रदेशासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो असा इशारा दिला आहे. वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेवर होत असलेला परिणाम लक्षात घेता परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस यांनी सांगितले की अलीकडील संघर्षादरम्यान इराणमधील अनेक रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि संशोधन संस्थांवर हल्ले झाले आहेत. राजधानी तेहरानमधील महत्त्वाच्या संशोधन संस्थांनाही फटका बसला असून काही सुविधा पूर्णपणे निष्क्रिय झाल्या आहेत. यामुळे केवळ जखमींना उपचार देण्यात अडथळे येत नाहीत, तर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता देखील कमी होत आहे.प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत इराणमध्ये किमान २० आरोग्य सुविधांवर हल्ले झाल्याची नोंद आहे. या हल्ल्यांमुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही या हल्ल्यांचा फटका बसत आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा अधिकच विस्कळीत होत आहेत.
जागतिक आरोग्य संघटने ने स्पष्ट केले आहे की, युद्धाच्या काळात आरोग्य सुविधा या आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार संरक्षित असतात. विशेषतः जिनिव्हा कनव्हेशन अंतर्गत रुग्णालये, डॉक्टर आणि रुग्ण यांचे संरक्षण करणे बंधनकारक आहे. अशा सुविधांवर हल्ले करणे हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे संबंधित पक्षांनी संयम बाळगून आरोग्य व्यवस्थेचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
या संघर्षाचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित नसून शेजारील देशांवरही होत आहे. इराक, जॉर्डन, लेबनॉन आणि सीरिया या देशांमध्येही आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होत असून सुमारे ४० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत स्वच्छ पाणी, अन्न आणि वैद्यकीय सुविधा यांचा अभाव निर्माण होण्याची शक्यता आहे.याशिवाय, औद्योगिक आणि तेल साठ्यांवरील हल्ल्यांमुळे पर्यावरणीय धोकेही वाढले आहेत. अशा घटनांमुळे हवेत विषारी वायू पसरू शकतात, ज्यामुळे श्वसनविकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत विशेष चिंता व्यक्त करत, संभाव्य रासायनिक किंवा जैविक आपत्तींसाठी तयारी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने सुमारे ३० दशलक्ष डॉलरच्या मदतीची मागणी केली आहे. या निधीचा उपयोग आपत्कालीन आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी, जखमींवर उपचार करण्यासाठी आणि आवश्यक औषधे व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठीही उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.एकूणच इराणमधील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ स्थानिक समस्या नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवीय संकटात रूपांतर होण्याची शक्यता आहे. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य सुविधांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
