मुंबई : कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या मोठ्या संख्येने महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता दिसून येत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिन्याला ३० ते ४५ वयोगटातील साधारतः १० पैकी ५ महिला अशक्तपणा, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या तक्रारीं घेऊन उपचारासाठी येतात.

शरीरात लोहाची कमतरतेमुळे हा समस्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी महिलांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या लोहाच्या कमतरतेची वेळेत तपासणी करण्याचे महत्त्व सांगितले आहे. अनेक वेळा ही समस्या लक्षात येत नाही किंवा दुर्लक्षित राहते. साध्या रक्त तपासण्या जसे की हिमोग्लोबिन चाचणी, सिरम फेरिटिन टेस्ट आणि कंप्लीट ब्लड काउंट (सीबीसी) यांच्या मदतीने शरीरातील लोहाची कमतरता ओळखता येते आणि पुढे होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून बचाव करता येतो.

लोहाची कमतरता ही महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य पोषण समस्यांपैकी एक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे फार गंभीर नसतात. त्यामुळे अनेक महिलांना ही समस्या साधा थकवा किंवा कामाचा ताण वाटतो आणि त्या त्याकडे दुर्लक्ष करतात.याबाबत डॉ. उपासना गर्ग म्हणाल्या महिलांमध्ये लोहाची कमतरता ही एक गंभीर बाब आहे, कारण थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात आणि स्थिती गंभीर झाल्यावरच तपासणी केली जाते. परंतु साध्या रक्त तपासण्यांच्या मदतीने लोहाची कमतरता सहज ओळखता येते.

हिमोग्लोबिन चाचणी, सिरम फेरिटिन टेस्ट, आयर्न लेव्हल्स आणि कंप्लीट ब्लड काउंट (सीबीसी) या तपासण्या शरीरातील लोहाचे प्रमाण समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. हिमोग्लोबिन चाचणी रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रोटीनचे प्रमाण मोजते आणि त्यामुळे अॅनिमिया आहे का हे कळते. सिरम फेरिटिन टेस्ट शरीरात साठवलेले लोह किती आहे हे दाखवते आणि अॅनिमिया होण्यापूर्वीच लोहाची कमतरता ओळखण्यास मदत करते. सीबीसी चाचणीमुळे लाल रक्तपेशींची संख्या आणि त्यांचा आकार याबद्दल माहिती मिळते आणि शरीर निरोगी रक्तपेशी तयार करत आहे का हे समजते. या तपासण्या लवकर निदान आणि वेळेत उपचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

लोह हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे. लोहामुळे शरीरात हिमोग्लोबिन तयार होते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असणारे प्रोटीन आहे जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. जेव्हा शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते तेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही. या स्थितीला लोहाची कमतरता किंवा आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया असे म्हणतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. याचे एक मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान होणारे रक्तस्राव. ज्या महिलांना जास्त प्रमाणात पाळी येते त्यांना लोहाची कमतरता होण्याचा धोका अधिक असतो. गर्भधारणेदरम्यान वाढणाऱ्या बाळासाठी शरीराला जास्त लोहाची गरज असते. त्यामुळे त्या काळातही महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसू शकते. तसेच योग्य आहार न घेणे, जेवण वेळेवर न करणे आणि हिरव्या भाज्या व कडधान्यांसारखे लोहयुक्त पदार्थ कमी खाणे यामुळेही शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऋतु अग्रवाल यांनी सांगितले.

लोहाच्या कमतरतेची काही सामान्य लक्षणे म्हणजे सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, त्वचा फिकट दिसणे, श्वास लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि केस गळणे. काही महिलांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते किंवा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार संसर्ग होऊ शकतो असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ श्रेया शेळके .यांनी सांगितले. जवळपास ५० टक्के महिला अॅनिमियाची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करतात. अशा अनेक महिला आमच्याकडे येतात.अशक्तपणा, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या तक्रारींसह डॉक्टरांकडे येतात.

या तक्रारी अनेकदा लोहाच्या कमतरतेमुळे असतात आणि त्यामुळे अॅनिमियाचा धोका वाढतो. जर लोहाची कमतरता वेळेत ओळखली नाही आणि उपचार केले नाहीत तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. गंभीर अॅनिमियामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि अगदी साधी दैनंदिन कामे करणेही कठीण होऊ शकते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या जसे की अनियमित हृदयाचे ठोके किंवा श्वास लागणे होऊ शकते. गर्भवती महिलांमध्ये उपचार न केलेली लोहाची कमतरता अकाली प्रसूती किंवा बाळाचे वजन कमी असण्याचा धोका वाढवू शकते.

याचा परिणाम महिलांच्या दैनंदिन जीवनावर, कामाच्या कार्यक्षमतेवर आणि एकूण जीवनमानावर होऊ शकतो. त्यामुळे लोहाची कमतरता वेळेत ओळखणे आणि योग्य उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही डॉ श्रेया शेळके यांनी सांगितले. महिला अनेकदा नोकरी आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लक्षणे वाढल्यानंतरच त्या डॉक्टरांचा सल्ला घेतात. त्यामुळे सर्व वयोगटातील महिलांनी नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग करून घ्यावे. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या वेळेत ओळखता येतात आणि जीवनमान सुधारता येते. महिलांनी हिमोग्लोबिन आणि आयर्न लेव्हल्ससारख्या तपासण्या नियमितपणे करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ श्रुती शेळके यांनी सांगितले.