CT Scan Increases Cancer Risk: सीटी स्कॅन, ज्याला कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन असेही म्हणतात. हे शरीरातील अंतर्गत अवयव, हाडे, स्नायू आणि रक्तवाहिन्यांच्या स्पष्ट आणि तपशीलवार प्रतिमा घेण्यासाठी एक आधुनिक तंत्र आहे. ही चाचणी आपत्कालीन परिस्थितीत, बायोप्सीपूर्वी किंवा कॅन्सरच्या स्टेजिंगसाठी खूप उपयुक्त आहे. सीटी स्कॅन एक्स-रेपेक्षा अधिक तपशील देते. तसंच डॉक्टरांना उपचारांचे अचूक नियोजन करण्यास मदत करते. अलिकडच्याच संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की, वारंवार सीटी स्कॅन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अमेरिकेत केलेल्या अभ्यासांनुसार, सीटी स्कॅनमुळे २ लाखाहून अधिक नवीन कॅन्सरचे रूग्ण आढळू शकतात.

द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, रेडिएशनच्या वारंवार संपर्कात राहिल्याने कॅन्सरच्या पेशी विकसित होण्याचा धोका वाढतो. संशोधनातून असे दिसून आले की, मुले आणि तरूण प्रौढ रेडिएशनला अधिक संवेदनशील असतात. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनेक स्कॅनमुळे भविष्यात कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

सीटी स्कॅनमुळे कॅन्सरचा धोका कसा वाढतो?

Award Banner

आजकाल रोगांचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन हे सर्वात अचूक माध्यम आहे. मात्र वापरल्या जाणाऱ्या आयनीकरण किरणोत्सर्गाबद्दल नेहमीच वाद होत आहेत. संशोधनातून असे दिसून आले की, रेडिएशनच्या हाय डोसमुळे पेशींच्या डीएनएचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. जर डीएनए खराब झाला तर पेशी अनियमितपणे वाढू लागतात आणि कॅन्सर विकसित होऊ शकतो. आपले शरीर डीएनए दुरूस्त करू शकते मात्र रेडिएशनच्या सतत किंवा वारंवार संपर्कामुळे धोका वाढतो.

कोणत्या प्रकारचे कॅन्सर धोका वाढवतात?

  • फुप्फुसांचा कॅन्सर
  • कोलन कॅन्सर
  • रक्ताचा कॅन्सर
  • मूत्राशय कॅन्सर
  • मेंदूचा ट्यूमर
  • महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर
  • थायरॉईड कॅन्सर

कोणी जास्त काळजी घ्यावी?

  • गर्भवती महिला आणि गर्भातील बाळांना रेडिएशनचा धोका जास्त असतो.
  • ज्या लोकांना त्यांच्या आजारामुळे अनेक सीटी स्कॅनची आवश्यकता असते, त्यांनी एमआरआय किंवा अल्ट्रासाउंड सारख्या पर्यायांचा विचार करावा.
  • जर सीटी स्कॅनमध्ये कॉन्ट्रॅक्ट डाई वापरला असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांना माहिती द्या.

तज्ज्ञ काय सांगतात?

बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. माधवी नायर यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, एकच सीटी स्कॅन साधारणपणे निरूपद्रव असते. वारंवार सीटी स्कॅन केल्याने रेडिएशनचा संपर्क वाढतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. भारतात डॉक्टर फक्त आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन करतात. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, अपघात किंवा ट्यूमर निदान सारख्या गंभीर परिस्थितीत सीटी स्कॅनचे फायदे हे जोखमींपेक्षा जास्त असतात. जेव्हा स्कॅन वैध कारणाशिवाय किंवा वारंवार केले जातात तेव्हा समस्या उद्भवतात.