Mediterranean Diet : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही, पण उत्तम आहार आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तुम्ही मेडिटेरेनियन आहाराविषयी ऐकले आहे का? मेडिटेरेनियन आहार वजन कमी करण्यासह चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. आज आपण तज्ज्ञांच्या हवाल्याने या विषयी जाणून घेऊ या.

बंगळुरू येथील अॅस्टर महिला व बाल रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ वीणा व्ही. सांगतात, “मेडिटेरेनियन आहारामध्ये फळे, भाज्या, धान्ये आणि शेंगा यांसारखे पदार्थ खाण्यावर भरपूर भर दिला जातो. या पदार्थांवर कमीत कमी प्रक्रिया केली जाते आणि हे पदार्थ हंगामी, ताजे आणि स्थानिक पातळीवर पिकवले जातात. ऑलिव्ह ऑईल फॅट्सचा प्रमुख स्त्रोत असतो.”

वीणा व्ही. सांगतात, ” मेडिटेरेनियन आहार घेतल्याने स्तनाचा कर्करोग, स्मृतिभ्रंश, नैराश्य, मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल वाढणे आणि स्मरणशक्ती कमी होणे इत्यादींचा धोका कमी होऊ शकतो. मेडिटेरेनियन आहार हाडांचे आरोग्य सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.”

ॲस्टर आरव्ही हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट सौमिता बिस्वास सांगतात, ” नवीन संशोधनानुसार, वनस्पती-आधारित मेडिटेरेनियन आहार घेणाऱ्या महिलांचा अचानक मृत्यूचा धोका २३ टक्क्यांनी कमी होत आहे. अमेरिकेतील २५ हजार महिलांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, या आहारामुळे कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.”

हेही वाचा : तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असतात ‘हे’ ८ लहानसे बदल; दात घासताना ‘असा’ करा तपास; ‘या’ अवयवांना सुद्धा होतात वेदना

मेडिटेरेनियन आहार

ऑलिव्ह ऑईल हे मेडिटेरेनियन आहारातील फॅट्सचा प्रमुख स्त्रोत आहे. या आहारात प्रामुख्याने बिया, फळे, भाज्या आणि शेंगा इत्यादींचा समावेश होतो.

“आहारात अंडी, दुग्धजन्य पदार्थांऐवजी ओमेगा-३ फॅटी अॅसिड समृद्ध मासे खाण्याची शिफारस केली जाते, पण त्याचे सेवन मर्यादित असावे”, असे वीणा व्ही. सांगतात. याशिवाय ऑलिव्ह ऑईल, लसूण आणि कधीकधी टोमॅटोचा वापर करून जेवण तयार करू शकता.

भारतीय आहार

कडधान्ये, भाज्यांचा मेडिटेरेनियन आहारात समावेश करून आरोग्याचा फायदा केला जाऊ शकतो. ब्राउन राइस, गव्हाच्या पीठाच्या पोळ्या खाव्यात.

लाल मांसचे मर्यादित सेवन करावे; तसेच मासे, दही आणि पनीर कमी प्रमाणात खावे. “भारतीय लोक ओट्स किंवा बेसन चिल्ला, चणा चाट, भाजलेले चिकन आणि ब्राउन राइस खाऊ शकतात”, असे सौमिता बिस्वास सांगतात.

कोणी आहार घेऊ नये?

वीणा व्ही. सांगतात, “काजू किंवा कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या सीफूडची अॅलर्जी असलेल्या लोकांनी हा आहार घेऊ नये. याशिवाय, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी पोटॅशियमयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन मर्यादित करावे.”

त्या पुढे सांगतात की, ऑलिव्ह ऑईल आणि नट्समध्ये कॅलरी भरपूर प्रमाणात असतात, याचे दैनंदिन आहारामध्ये सेवन न केल्यास वजन वाढू शकते.